आदरणीय महात्माजी,
विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ जगतवंद्य विभूती आपणांस मानले जाते. विलक्षण निर्भयता, नम्रता, कमालीची साधी राहणी, दीन-दलितांविषयी अथांग करुणा आणि शोषितांबद्दल सहानुभूती या गुणांचा संगम आपल्या ठिकाणी होता. तत्वज्ञान ही जीवनाबरोबर विकसीत होणारी गोष्ट आहे, हे आपल्या बाबतीत खरे आहे. नैतिकता हेच संस्कृतीचे अधिष्ठान, संयम व त्याग हाच तिचा आत्मा. सुखोपयोगी साधने वाढविण्याची संस्कृती सध्या निर्माण होत आहे. श्रमप्रतिष्ठेची पीछेहाट होत आहे.
“आपले पुतळे पाडून नथूरामाचे उभारा” असंही म्हटलं गेलं. आपली आदर्श समाजाची कल्पना ‘रामराज्य अवतरेल का? सर्वोदय होईल का? रामराज्यापेक्षा राममंदिर महत्वपूर्ण बनलं आहे. नवनवीन नेतोदय रोज होत आहे. राजकारणात नसलेले कारणाशिवाय राजकारणात येत आहेत. सोनियाचा दिवस येतील यावर लोकांची अटळ श्रध्दा होती. निवडणूक प्रक्रिया उपचार ठरत आहे. निवडीचे सोपस्कार पाळले जात नाहीत, कायदा न पाळल्यामुळे हे घडत आहे, काय द्याचं बोला हे महत्वपूर्ण ठरत आहे, गुंडांनी गुंडांकरवी गुंडांसाठी ठोकशाही चालविली आहे, कमी, भ्रष्ट निवडणं एवढंच लोकांच्या हाती आहे, निवडणुकीला उभारणारे बहुतांश भ्रष्ट असतात किवा नंतर होतात, युतीची आताशा भिती वाटत आहे, अभद्र युती होत आहे, शत्रूंची युती होत आहे, मित्रांची भीती वाटत आहे, मित्र व शत्रूचे शब्दकोशातले अर्थ सोयीनुसार बदलले जात आहेत, सत्तेसाठी युतीच्या दावणीला कुणालाही बांधलं जात आहे.
व्यक्तिमत्व हा ज्याचा प्रांत, पण राजकारणात व्यक्तिमत्वं विरघळून चाललीत, तत्वांसाठी प्रसिध्द असलेले पक्ष सत्तेसमोर लोटांगण घालत आहेत. आदर्शचा कित्ता गिरवायचा असतो, सत्ताप्राप्ती हाच आदर्श झाल्यामुळे कित्ता गिरवायचा कुणाचा? ते देशाचे राजकारण ठरवत आहेत. लाट हीच या देशाच्या ललाटात लिहिली आहे. राजकारणाचा चेहरा मोहराच बदलत चालला आहे. आपण सत्याचे प्रयोग केले. आज राजकारण म्हणजे असत्याचे प्रयोग, हे समीकरण रुढ होत आहे. राजकारण म्हणजे सेवा करण्यासाठी नसून मेवा खाण्यासाठीच की काय? असा समज होत आहे. आपले असामान्य व्यक्तिमत्व अनेक सामान्यांना प्रेरणा देणारं आहे. आपल्या आयुष्यातील अनेक क्षण आपले नव्हतेच, दुसर्यांसाठी आपण ते खर्च केले. शिक्षणाचे धिडवडे उडाल्यातच जमा आहेत. शिक्षणाने स्वावलंबन अपेक्षित आहे. पण शिक्षक व विद्यार्थ्यांचे परस्परावलंबन वाढत आहे. चारित्र्यसंवर्धन करण्यात शिक्षक अपयशी ठरत आहेत. तणावाचे प्रसंग येत आहेत, विद्यार्थी भावी आयुष्याच्या तणावाखाली, वर्तमानातल्या ओझ्याखाली दबत आहेत. अभ्यासक्रम कठिण, तणाव यामुळे मुले आत्महत्या करीत आहेत. चारित्र्यसंवर्धनाचे बालेकिल्ले ढासळल्यातच जमा आहेत. चारित्र्यावरुन पूर्वी माणसं ओळखली जायची. आता कपडे बदलावीत त्याप्रमाणे चारित्र्य बदलत आहे. माणसे सरड्यापेक्षाही जलदगतीने रंग बदलत आहेत. सकाळचं विधान दुपारी बदलत आहेत. “कणकण मे है भगवान, फिर भी मंदिर यही बनायेंगे” हे कसं काय? चारित्र्यवान व्यक्तीचा म सध्या फक्त पुतळ्यातच काय तो शिल्लक आहे.
यशोगाथेचे biopic पेक्षा गुन्हेगारीचे उदात्तीकरणाचे biopic चालतात. डॉ. बाबा आमटे, डॉ. तात्याराव लहाने वरचा biopic किती चालला?
आशयापेक्षा विषयाला महत्व येत आहे. नायकाने किती स्त्रिया पटवल्या, भोगल्या ही अभिमानाची बाब बनत आहे. स्त्रिया भोगलेले संत, मनुष्यहत्या, प्राणीहत्या करणारे नायकच लोकांना हवे असतील तर तुम्ही आम्ही काय करणार? समुहाच्या ताकिर्कतेपुढे मानसशास्त्र थिटे पडत आहे. अफवेवरुन लोक जनावरांसारखे नाहक मारले जात आहेत. अपराधीकरणाचे निरपराधीकरण करणार्या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
शिक्षण म्हणजे एका परिपक्व व्यक्तिमत्वाचा दुसर्या अपरिपक्व व्यक्तिमत्वावर उमटलेला ठसा होय. पण आज एक परिपक्व व्यक्तिमत्व दुसर्या अपरिपक्वावर ठसा उमटविण्यास असमर्थ ठरत आहे. शिक्षकांची निवड व विद्यार्थ्यांची आवड वेगळ्या मार्गाने जात आहे. परिपत्रकाने शिक्षण व मूल्ये लादली जात आहेत. लादलेल्या गोष्टी संक्रमित होत नाहीत. ज्ञानाचं संक्रमण होणं आवश्यक आहे, केवळ आक्रमण नको. ज्ञानविस्ताराच्या प्रचंड आक्रमणातून नेमके कोणते ज्ञान संक्रमित करायचे याचे भान हवे. अभ्यासक्रम अवघड म्हणून जीवनक्रम संपवणार्या विद्यार्थ्यांना हे आक्रमण पेलवत नाही.
श्रमप्रतिष्ठा आजच्या शिक्षणपध्दतीतून रुजत नाही. गुण व त्याने येणारी प्रतिष्ठा महत्वपूर्ण बनली आहे. श्रमप्रतिष्ठा हे सातत्याने होणार्या संस्कारानेच रुजतात. केवळ राष्ट्रीय सेवा योजनेत आठ दिवस श्रमदान करुन महाविद्यालये धन्यता मानतात. प्रशासन व परीक्षा हेच महाविद्यालयाचे मुख्य काम राहिले आहे. त्यातही प्रचंड गोंधळ, स्नेहसंमेलनाची यात्रा व जत्रा झाली की संपले. नोंदणी व परीक्षासाठी महाविद्यालये उरली आहेत. अनेक लता आहेत, हवाय तो आधार, तसेच अनेक आशा आहेत त्या पल्लवित होणे आवश्यक. सुप्त गुणांना वाव देणारी परिस्थितीचं, कर्तृत्वाचं इंद्रधनुष्य अवतरायला मदत करते. आजच्या शैक्षणिक संस्था केवळ गुणांना वाव देणार्या ठरत आहेत, त्यासाठी जीवाचे रान त्या करत आहेत.
शिक्षणाद्वारे व्यक्तीने धर्मातील संकुचिततेचा त्याग केला पाहिजे, इतर धर्मांचा आदर केला पाहिजे. धर्माद्वारे श्रेष्ठतम सत्याचे दर्शन घडते व अहिंसेचा मार्ग मोकळा होतो. सत्यातच अहिंसा समाविष्ट झाली पाहिजे. धार्मिक वागणुकीतून सद्गुणांची निर्मिती होत असल्यामुळे शिक्षणापासून धर्माला वगळता येत नाही. शिक्षकांनी धार्मिक सहिष्णुता विद्यार्थ्यांना शिकवायला हवी. कोणत्याही प्रबोधनाची सुरुवात धर्मचिकित्सेने होते असे मार्क्स म्हणतो. परंतु धर्मचिकित्सा विधायक, इतिहासाशी, संस्कृतीशी नाते सांगणारी हवी. जे इतिहास विसरतात ते भविष्य घडवू शकत नाही. आजच्या पिढीसमोर इतिहास येत नाही. आला तो विपर्यस्त असतो. आपल्याला राष्ट्रपिता महात्मा म्हणून संबोधण्याचा काहींचा आक्षेप आहे. आपण वापरलेल्या “हरिजन” शब्दाने वादळ उठले. एक वेगळे शैक्षणिक वातावरण तत्वज्ञान आपण दिले पण स्वतःच्या मुलाला अपेक्षित शिक्षण नाकारले. बेवारशी प्रेत म्हणून त्याला जावं लागलं. आपल्या समाधीपुढे शपत्र घेतल्याशिवाय राजकारणाचं पान हालत नाही. मनाविरुध्द घडले की, आपण आत्मक्लेष करत. सत्याग्रह करत, मौन बाळगत, उपोषण करत. भ्रष्टाचारात अटक झाली तरी निर्ढावल्याप्रमाणे हसणे, जामिनावर सुटणे, निवडणूक लढवणे हे ध्येय आजच्या राजकारण्यांचे आहे.
जेलमध्ये जाऊनही नेते पुन्हा सुखप्राप्तीसाठी तयार असतात. लालू पुन्हा कंदील घेऊन दिशा दाखवायला तयार. बोफोर्सचा फोर्स काम करेनासा झालाय. रॅफेलचे वादळ सत्ता मिळविण्याचे साधन बनत आहे. मायावतीचे मायाजल पुन्हा आहेच. या सर्व पार्श्वभूमीवर आपलीर आठवण येतेय. आपल्या बाबतीत काही गोष्टी अनाकलनीय वाटतात. आपण ईश्वरावर श्रध्दा ठेवली किवा त्याची भत्त््ती केली. परंतु ईश्वराची चिकित्सा केली नाही. आपण मंदिरात विशेष जात नसत, मूर्तीपूजा मानीत नसत, परंतु रामाची व कृष्णाची प्रार्थना करत. आपण स्वतःला सनातनी हिदू म्हणत. राजकारण धर्म साधण्याकरता आहे असे आपण म्हणत. आपण मनाने धार्मिक हिदू असले तरी व्रतवैकल्ये करत नसत व परंपराचे अंधपालन करीत नसत. तर सर्वधर्मसमभाव मानत. सत्य म्हणजेच ईश्वर आपण म्हणत असत. आपण अस्पृश्यता हे पाप मानले. सर्व धर्मग्रंध ईश्वराने दिलेल्या स्फूर्तीतून निर्माण झाले आहेत असे आपण मानले, म्हणजेच ईश्वर मानवाच्या ऐहिक जीवनात दखल घेतो, मार्गदर्शन करतो, हस्तक्षेप करतो असे त्याचे अर्थ निघतात. यावरुन आपण ईश्वरवादी, मानवतावादी नव्हे असे काहींचे म्हणणे. सत्य म्हणजे ईश्वर असेल तर त्याची प्रार्थना कशाला? पण आपण जात, वर्ण, पंथ विभाग असे भेद न करता सामान्य जनतेसाठी झगडला तेव्हा हा थोर मानवतावादी नव्हता असे कसे म्हणता येईल असे काहींचे म्हणणे. थोडे संभ्रम आहेत. कर्ज काढून व देशातून पलायन करणारी नवीन जमात उदयास आली आहे. भ्रष्टाचार, बलात्कार हे शिष्टाचार झाले आहेत. इतकी नैराश्यता असतांना आपले तत्वज्ञान जगण्यात न आणता त्याला फक्त कागदात व नोटात बंदिस्त केलंय. काहींना म. गांधी हवेत, आदर्श सांगण्यासाठी, जगण्यासाठी नव्हे. विकृतीचं उदात्तीकरण, सवंग प्रदर्शन करुन पैसा, प्रसिध्दी मिळत असेल तर तत्वज्ञानाला कोण विचारणार?
समाजाला उंची देणारेच खुजे होत आहेत. स्थिर सरकार देणारेच अस्थिर झालेत. चेहरा व मुखवटा यातलं अंतर वाढलं की व्यक्तिमत्व दुभंगतं. दुभंगलेले व्यक्तिमत्व अनेक प्रश्न निर्माण करते. अनेक प्रश्न निर्माण झालेल्या समाजाला एखादा विचार; तत्वज्ञानाच तारतं, पण एखादे तत्वज्ञान कवटाळून चालत नाही. तसं टाळूनही चालत नाही. आपल्या पश्चात आपला वारसाही कसाही वापरला जात आहे. “वैष्णव जन तो तेने कहीये, पिड पराई जाने रे।” म्हणत फसवणं चालू आहे याचं वाईट वाटतं.
आपल्या आचार विचारातून अनेकांना आयुष्यभर दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन लाभलं आहे. हे आजही नाकारता येत नाही.
– डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन, कोथरुड, पुणे ४११ ०३८.
Very nicely important information a mahtma Gandhi is great person??