नवीन लेखन...

नजर डायबेटिसवर

सामान्य माणसांच्या रक्तात प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या ग्लुकोजच्या अनियंत्रित पातळीला ‘हायपरग्लायसेमिया’ असे म्हणतात. काही प्रकारच्या रक्तचाचण्यांची पडताळणी करून डायबेटिसची पातळी ठरविली जाते. खूप तहान लागते आणि सतत लघवीला जावेसे वाटणे, ही हायपरग्लायसोमियाची प्रमुख लक्षणे आहेत.

या उलट रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण प्रमाणापेक्षा कमी झाल्यास त्या स्थितीला हायपोग्लासोमिया म्हणतात. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण ७२mg/dl पेक्षा कमी असल्यास हायपोग्लायसेमियाचे निदान होते. अशा वेळेस साखर खावी. गोड पदार्थ खाऊन ग्लुकोजची पातळी पटकन नियंत्रणात आणता येते. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी झाल्याने डोके दुखणे, एकाग्रता कमी होणे, गोंधळ होणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येतात. मधुमेह असलेल्या रुग्णामध्येही हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. म्हणूनच घराच्या बाहेर पडताना जवळ चॉकलेट, गोड बिस्कीट, खडीसाखर ठेवण्याचा सल्ला त्यांना नेहमी दिला जातो. मधुमेह किंवा डायबेटिस हा आजार अनुवंशिकतेशिवाय चुकीची आहार पद्धती आणि चुकीच्या जीवनशैलीमुळेसुद्धा होऊ शकतो. डायबेटिसचे प्रमुख चार प्रकार आहेत.

(१) गरोदरपणात होणारा डायबेटिस:-गर्भधारणेसाठी आवश्यक असणारे हार्मोन्स शरीरातील इतर हार्मोन्सवर परिणाम करू शकतात. उदा. इन्सुलिन, थायरॉक्झीन, गर्भधारणेतील हार्मोन्स इन्सुलिनला साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास अडथळा निर्माण करतात. प्रसूतीनंतर गर्भधारणेसाठी लागणारे हार्मोन्स तयार होणे बंद झाल्याने त्याची रक्तातील साखरेची पातळी आपोआप नियंत्रणात येते. म्हणूनच गरोदरपणात होणाऱ्या डायबेटिसला Gestational diabetes म्हणतात. परंतु अशा स्त्रियांना किंवा त्यांच्या बाळाला भविष्यात डायबेटिस होण्याचा धोका असतो. गर्भधारणेच्या वेळी असणारे स्त्रीचे जास्तीचे वजन, अनुवंशिकता किंवा कर्बोदकांच्या चयापचय प्रक्रियेत झालेला बिघाड यामुळे गरोदरपणात डायबेटिस होतो. बाळाची योग्य वाढ होण्यासाठी प्रसूती होईपर्यंत अशा स्त्रीला आहारात योग्य काळजी घ्यावी लागते. अशा स्त्रियांची मुले जास्त वजनाची असू शकतात.

(२) प्री-डायबेटिक: – ज्यांची रक्तातील ग्लुकोजची पातळी नेहमी जास्त असते, पण एवढीही जास्त नाही की त्यांना डायबेटिस आहे, असे म्हणता येईल. प्रीडायबेटीक अवस्थेकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने डायबेटिस होतो. प्रीडायबेटिस स्थितीत जीवनशैलीत आणि आहारात थोडासा योग्य बदल केल्यास डायबेटिसला आपण वेळीच रोखू शकतो. प्री-डायबेटिसमध्ये फास्टिंग शुगर १००-१२५mg/ dl असते. सतत लघवी होणे, खूप तहान लागणे, विनाकारण थकवा येणे, डोळ्यांनी अंधुक दिसणे अशी प्री-डायबेटिसची प्राथमिक लक्षणे आहेत.

(३) टाइप वन म्हणजेच इन्सुलिन डिपेन्डंट डायबेटिस: – शरीराला ऊर्जा पुरविताना ग्लुकोजला पेशींच्या आत जाण्यासाठी इन्सुलिन नावाचे हार्मोन लागते. अनुवंशिकता किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे स्वादुपिंडातील पेशी गरजेपेक्षा कमी प्रमाणात इन्सुलिन तयार करतात. अथवा तिथल्या पेशींना हानी झाल्याने इन्सुलिन तयार होत नाही. अशावेळेस रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नेहमी इन्सुलिन घ्यावे लागते. अशा प्रकारचा डायबेटिस लहान मुलांमध्ये किंवा किशोरावस्थेत आढळून येतो.

खूप भूक लागणे, थकवा येणे, तहान लागणे, वजन कमी होणे, लहान मुलांमध्ये रात्री झोपेत लघवी होणे अशी लक्षणे दिसून येतात. या प्रकारच्या डायबेटिसला जुवेनिल डायबेटिस म्हणतात.

(४) टाइप टू म्हणजेच नॉन इन्सुलिन डिपेन्डंट डायबेटिस: – वयानुसार आदर्श वजनापेक्षा २० टक्के जास्त वजन असणाऱ्यांना टाइप टू होण्याचा धोका असतो. कर्बोदकांच्या चयापचय प्रक्रियेत झालेला बिघाड आणि इन्सुलिन पेशींमध्ये जाऊ न शकल्याने रक्तात ग्लूकोजची वाढती पातळी दिसून येते. याशिवाय चुकीच्या जीवनशैलीमुळे, अयोग्य आहार पद्धती आणि अपचनासारखे आजार दीर्घकाळ राहिल्याने रक्तात ग्लुकोजची पातळी वाढते. टाइप टू डायबेटिस `हा प्रौढावस्थेत आढळून येतो. थकवा येणे, तहान लागणे, भूक लागणे, सतत इन्फेक्शन होणे, लहान जखमा नैसर्गिकपणे भरून न येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. टाइप टू डायबेटीजमध्ये फास्टिंग शुगर १३० mg/ dl पेक्षा जास्त असते.

सतत कार्यक्षम आणि सतर्क राहण्यासाठी योग्य प्रमाणात कर्बोदित पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आहारात कर्बोदित पदार्थांचे सतत जास्त सेवन केल्यास मधुमेह, रक्तातील चरबी वाढणे किंवा वजन वाढणे असे आजारही होऊ शकतात. वजन जरी वाढले नाही तरी शरीरांतर्गत होणारे बदलही तितकेच महत्त्वाचे असतात. कर्बोदिकांच्या अतिसेवनाने शरीरातील जीवरासायनिक साखळीत बिघाड होतो. जास्तीची साखर यकृतामध्ये साठवली जाते. तसेच जास्तीची ऊर्जा शरीर चरबीच्या स्वरूपात पेशींमध्ये साठवून ठेवते. ही क्रिया घडवून आणण्यासाठी इन्सुलीन नावाचे हार्मोन लागते. इन्सुलीन हार्मोन जास्त वाढले तर प्रतिकारशक्ती कमी होते. एकाग्रता साधण्याची शक्ती कमी होते. शरीरातील क्षारांचा समतोल बिघडून हाडे ठिसूळ होऊ शकतात. या उलट शरीरातील इन्सुलीन कमी प्रमाणात तयार होत असेल तर कार्बोदित पदार्थांपासून तयार झालेली जास्तीची साखर रक्तात दिसून येते. रक्तातील साखरेच्या ठराविक पातळीपेक्षा जास्त असणारी साखर शरीर लघवीवाटे बाहेर टाकते. अशा रितीने मधुमेहाची सुरुवात होते. अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या निर्देशानुसार रॅनडम ग्लुकोज टेस्ट ८०-१६०mg/dl असल्यास डायबेटिस नाही आणि १६०-२००असल्यास प्रीडायबेटिक आहे, असे समजावे. रात्रीच्या जेवणानंतर बारा तासांनी सकाळी उपाशी असताना रक्तातील .ग्लुकोजची तपासणी केल्यास त्याला फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट म्हणतात. सामान्य व्यक्तीची फास्टिंग ब्लड शुगर १००mg/dl पेक्षा कमी असते. फास्टिंग ब्लड शुगर १००-१२५ mg/dl असेल तर प्रीडायबेटिक आणि १२५mg पेक्षा जास्त म्हणजे डायबेटिक समजले जाते. सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणानंतर दोन तासांनी केलेल्या तपासणीला पोस्ट लंच ब्लड शुगर टेस्ट म्हणतात. डायबेटिस असलेल्यांची पोस्ट लंच १४० mg/dl पेक्षा जास्त असते. HbA1c यालाच हिमोग्लोबीन A1 c टेस्ट म्हणतात. या रक्त तपासणीत मागच्या दोन ते तीन महिन्यांची रक्तातील ग्लुकोजची पातळी समजते. डायबेटिस नसलेल्या व्यक्तींची HbA1c ची पातळी ५.६% पेक्षा कमी असते. ५.६-६.४ % पेक्षा जास्त पातळी असलेल्यांना डायबेटिसचा धोका असतो. ६.५% पेक्षा जास्त पातळी असणे डायबेटिस आहे, असे समजावे. मधुमेह झाला आहे, असे निदान झाल्यास योग्य पद्धतीने आहारात परिवर्तन करून त्या व्यक्तीला सुखाने व आनंदाने जगता येते.

पुष्पलता डुंबरे

डायटिशियन

(मराठी विज्ञान परिषद)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..