बळवंत मोरेश्वर पुरंदरे उपाख्य बाबासाहेब हे झाड एका महापुरुषाने झपाटलेले होते – छत्रपती शिवाजी महाराज !
नव्वदी ओलांडलेले हे झाड त्या दिवशी सायंकाळी बरोबर सहा वाजता रंगमंचाच्या पूजेसाठी आणि आई भवानीला दंडवत घालण्यासाठी उपस्थित होते. बरोबर साडेसहा वाजता शिरस्ता न मोडता,”जाणता राजा ” चा प्रयोग सुरु झाला. ( १९९४-९५ मध्ये चिरंजीवांसह न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडच्या मैदानावर आणि त्यानंतर १९९९ मध्ये नाशिकला मित्राच्या कुटुंबियांसमवेत मी प्रयोग पाहिलेले ,पण ती वेळेच्या शिस्तीची परंपरा तेव्हाही अनुभवली होती.) फारसे उजेडात नसलेले कलावंत घेऊन नेहेमीच्या भव्यतेने हा १५३६ वा प्रयोग संपन्न झाला, त्यावेळी जुनाच थरार अनुभवाला.
महानायकाचे अभिजात मोठेपण तितक्याच वज्रासम हातांनी पेलायला हवे ना ?
त्या दिवशीचा नाट्यानुभव (दृक् -श्राव्य) तोही मोकळ्या मैदानात महानाट्याच्या रूपात आमच्या नातीसाठी नवा होता. वयाच्या पाचव्या वर्षी लावणी – कव्वाली , अभंग ,ओव्या, भजन, भारूड, पोवाडा या श्रीमंत परंपरा तिला एका छताखाली भेटल्या. बुरुज होता पण हिरकणीला ती शोधत राहिली.
गोष्टींमध्ये ऐकलेली बरीचशी पात्रं तिला अनुभवायला मिळाली. तिने वेळोवेळी ताल धरून दिलेली दाद आम्हीं उभयता एन्जॉय करीत होतो.
तिला हा प्रकार आवडेल की नाही याबाबत साशंक असलेले आम्ही, जेंव्हा निघताना ती “पुन्हा येऊ” असं म्हणाली तेव्हा पूर्ण भरून पावलो. महाराजांच्या काळात आमचे पूर्वज असतीलच, पण आज आमच्या वंशजांनाही “शिवाजी” नावाचे गारुड भुरळ घालतंय याबाबत बाबासाहेबांचे आभार मानायलाच हवेत.
– डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply