‘काय दादानू? कसल्या गजाली चलल्यात?’ मनोहरच्या प्रश्नाने दोघेही आपल्या विचारचक्रातून बाहेर आले. ‘काही नाही रे, संध्याकाळ झाली की जरा एकटेपणा वाटतो.’ संजय म्हणाला. ‘दिवस जातो मजेत. पण संध्याकाळला कातरवेळ म्हणतात ते उगीच नाही. मन सैरभैर होतं, कारणाशिवायच.’ सुजाताही म्हणाली.
‘बघितलंस ना? तुझ्या आजारपणात दोघांपैकी एक देखील येऊ शकला नाही. आपण मारे गावाकडला बंगला इतका वाढवून घेतला. विचार केला, सगळेच एकदम जमलो दिवाळीला किंवा मे महिन्याच्या सुट्टीत, तर कोणाची गैरसोय होऊ नये. लग्नं झालीत, मुलं झालीत. एक खोली एका मुला-सुनेला, एक नातवंडाना. एक दुसऱ्या मुला-सुनेला, एक त्या नातवंडाना आणि एक आपल्याला. शिवाय मनोहरचं कुटुंब वर्षानुवर्षं आपल्या बंगल्याची, बागेची देखभाल करत आलंय. एरव्ही ते आऊट-हाऊसमधे राहायचे. पण आता मनोहर-मंजूपण साठीच्या आसपास आलेत, म्हणून त्यांच्यासाठी पण स्वयंपाकघराच्या बाजूला एक झोपायची खोली अशा सहा झोपायच्या खोल्या, त्याही स्वयंपूर्ण बांधून घेतल्या. मग तेवढ्याच वरही चढवल्या. तळाच्या स्वयंपाकघराच्या बरोबर वर दुसरं स्वयंपाकघर. काय उपयोग? येतंय का कोण?’ सुजाताने सुस्कारा सोडला.
‘खंत करू नकोस सुजू . पक्ष्यांसारखंच झालंय हल्ली माणसांचं. मागे वळून पाहाताच येत नाही त्यांना. पण आता आपण मात्र जायचंच. निसर्ग सौंदर्य अनुभवायला माणसं कोकणात जाऊन हॉटेलात राहातात. आपलं तर स्वतःचं इतकं मोठं घर आहे. मला तर डॉक्टरही म्हणाले, गावी का जात नाही तुम्ही? तिथली प्रदूषण-विरहित हवा, फिरायसाठी मोकळी जागा, हिरवाई यांनी खूप फरक पडेल तुम्हाला. मुख्य म्हणजे तुम्ही खंतावलेलेही दिसता. जरा ताजे-तवाने व्हाल.’ मग संजय-सुजाताने थेट गाव गाठलंच. मनोहर-मंजूने घर अगदी लखलखीत ठेवलंय. तरीही बारा झोपायच्या खोल्या असलेल्या घरात संजय-सुजाता आणि मनोहर-मंजू! दिवसा बागेत आणि घरात छान वेळ जायचा.
नारळाची झाडं, आंब्याची झाडं, फणसाची झाडं. शिवाय जास्वंदीची दोन झाडं-एक गुलाबी, एक लालभडक. मदनबाण छान मोठ्या-मोठ्या फुलांनी डवरलेला, सुगंधाने घमघमलेला. शिवाय नीरफणस, अननस. कडीलिंब, कोथिंबिरीचा छोटासा वाफा. वर्षानुवर्षं मनोहर मशागत करत आलाय. वेळोवेळी आंबे-नारळ बसने पाठवत आलाय. कधी वास्तूचा किंवा बागेतल्या उत्पन्नाचा गैरफायदा घेतला नाही त्याने. रातांब्याची दोन झाडं आहेत. त्याचीही फळं काढून, सुकवून कोकमं पाठवायचा. गावचं घर आणि बाग पाहून दोघंही अगदी-अगदी सुखावली.
‘सेवानिवृत्त होऊनही वेड्यासारखे बसलो होतो चार खोल्यांच्या बंदिस्त घरात. बरं झालं आलो.’ त्या दिवशी संजय म्हणाला. ‘हो रे! पण संध्याकाळ झाली की मन उदास होतं. मुलं-नातवंडं नांदली असती घरात, तर घर भरल्यासारखं वाटलं असतं. मनोहरच्या मुली पण लग्न होऊन गेल्या ना! त्यामुळे भारीच शुकशुकाट वाटतो. पूर्वी तुझे मित्र यायचे. माझ्याही मैत्रिणी यायच्या. नातलग यायचे कधीतरी. आता जो-तो मुलांची मुलं सांभाळायला फॉरेनला धावतो.’ सुजाताच्या बोलण्यावर संजयला हसूच आलं.
‘त्याना कसली हसतेस सुजू? आपणही नाही का धावायचो मुलांच्या अडी-अडचणीला? पण पोचलं का कोणी आपल्यासाठी? ते आता आपापल्या करिअरमधे आणि मुलांच्या शाळा- कॉलेजांत बुडलेत. व्हिडिओ कॉलवरून बोललं-पाहिलं की झालं, असं वाटायला लागलंय त्यांना.’
‘काय दादानू? कसल्या गजाली चलल्यात?’ मनोहरच्या प्रश्नाने दोघेही आपल्या विचारचक्रातून बाहेर आले. ‘काही नाही रे, संध्याकाळ झाली की जरा एकटेपणा वाटतो.’ संजय म्हणाला. ‘दिवस जातो मजेत. पण संध्याकाळला कातरवेळ म्हणतात ते उगीच नाही. मन सैरभैर होतं, कारणाशिवायच.’ सुजाताही म्हणाली.
‘एक सांगू?’ मनोहरने जरा दबकतच विचारलं.
‘बोल रे! तुला कधीपासून परवानगी हवी झाली?’ संजयच्या प्रश्नावर मनोहरने म्हटलं, ‘नाही. सूचना जरा गंभीर आहे. म्हणून विचारात पडलोय.’
‘बोल-बोल. उगीच उत्सुकता ताणू नकोस.’
‘नाही. आपला बंगला असा रिकामाच आहे. आता नवीन इंजिनीयरिंग कॉलेज निघालंय ना पलीकडच्या रस्त्याला. त्यातल्या फारच कमी विद्यार्थ्यांची राहायची सोय झालीय. बाकी मुलं अशीच कुठली हॉटेलं, कुठली लॉजिंग- बोर्डिंग अशी राहाताहेत. काहींची तर कॉलेजपासून इतक्या लांबच्या ठिकाणी राहायची सोय झालीय, की प्रवासातच जातोय त्यांचा किती-किती वेळ. मुलींचे तर खूपच हाल होतायत. त्या वाटेल तिथे नाही ना राहू शकत! खात्रीचंच ठिकाण हवं त्याना राहायला.’
‘अरे, ते देवळाच्या बाजूचं कॉलेज का? आपल्या इथून पाचच मिनिटांवर तर आहे.’
‘हो ना! म्हणूनच म्हणतोय, आपल्याकडे वर सहा आणि खाली चार अशा दहा जणांची सोय करू शकतो आपण. मुलगे वर राहातील. मुली खाली आपल्या देखरेखीत राहातील. दोन-दोन मुलं एकेका खोलीत पण राहू शकतात ना? घरगुती जेवण पण देऊ शकतो आपण. मंजूला एकटीला नाही जमायचं. पण हाताखाली मुलगी ठेवली तर होऊन जाईल.’ मनोहरने मनातल्या मनात मनोहारी चित्र पूर्णपणे रंगवून ठेवलं होतं.
‘विद्यार्थ्यांना खोल्या भाड्याने देणे आहेत.’ मनोहरने ताबडतोब पाटीवर लिहून पाटी गेटवर अडकवली देखील. कोणी एकाने पाहायची खोटी. हां-हां म्हणता मुलं यायला लागली. भाडं तर अत्यंत वाजवी होतं. ‘पैसे कमावणं’ हा मूळ हेतू नव्हताच. शिवाय राहातं घर म्हटल्यावर मुलांची आणि पालकांचीही पहिली पसंती होती या बंगल्याला. हां-हां म्हणता खोल्या भरायला लागल्या. एकेका खोलीत दोन-दोन मुलं राहायला तयार होती. भाडंही विभागलं गेलं असतं. शिवाय आधार आणि सोबतही झाली असती.
‘हल्ली मुलांमध्ये अभ्यासाचा ताण सहन झाला नाही, की आत्महत्या करण्याचं प्रमाणही वाढलंय ना! दोघं-दोघं राहातील, तर एकमेकांबरोबर बोलून ताणही कमी होईल ना.’
सुजाताचं म्हणणं बरोबरच होतं.
पालक स्वतः येऊन बंगला, बंगल्यातली माणसं पाहून जात होते. परत येताना मुलं- मुलांचं सामान असं सगळं घेऊनच येत होते. विद्यार्थिनींच्या तर आयाही येत होत्या बरोबर. मुलीला कुठे ठेवायचं म्हणजे जोखीमच. तावून-सुलाखून घेतलेलंच बरं. हां-हां म्हणता बंगला गजबजून गेला. मुलं तर अजूनही येतच होती. पण आता त्यांना जागेअभावी निराश होऊन परतावं लागत होतं.
कॉलेज सुरू झालं. दिवसभर कॉलेजात असलेली मुलं संध्याकाळी परत येत. त्यांच्या किलकिलाटात तिन्हीसांजेची कातरवेळ कधी उलटून जायची, कळायचंही नाही. मुली तर ’काकी-काकी’ करत सुजाताच्या मागे-पुढे नाचत असायच्या. सुट्टीच्या दिवशी तर मुलं मंजूला स्वयंपाकात मदत करायलाही तत्पर असत. परीक्षा असली की जो-तो चिडीचूप. आपापल्या पुस्तकांत-वह्यांत मुंडी खुपसून बसलेला. कधी रात्री-अपरात्री मुलाना अभ्यासासाठी जागरण करायची हुक्की यायची. मंजूला उठवण्याऐवजी मग सुजाताच त्यांची खुडबूड ऐकून स्वयंपाकघरात जायची आणि कॉफी करायची मुलांसाठी.
मग तिला आपले अमीत-सुमीत शिकत होते तेव्हाच्या आठवणी यायच्या. कसे आपण मुलांबरोबर जागायचो. नोकरी करत असूनही, दिवसाभराचे थकलेले असूनही त्यांच्याबरोबर रात्रीची जागरणं करायचो, त्याना कॉफी करून पाजायचो. कसं ‘चारला उठव हं’ सांगून मुलं झोपायची आणि कसं त्याना चारला उठवायचंय या तणावाखाली आपण चार वाजायची वाट बघत जागत बसायचो. मुलं शिकली-सवरली, नोकरी-धंद्याला लागली आणि भुर्र उडून गेली. शेवटी पती- पत्नींना एकमेकांची साथ-सोबतच खरी.
संजयच्या आजारपणात सुजाता खरीखुरी खचली. मुलं तिच्या मदतीला पोहोचलीच नाहीत. आता पुन्हा मुलं- त्यांच्या परीक्षा, त्यांचे ताण-तणाव, त्यांचे अभ्यास, त्यांची जागरणं, त्यांची कॉफी. पण ही मुलं तिची नाहीत. तिच्या बंगल्यात भाड्याने राहाणारी मुलं आहेत.
दिवस जात होते. दोन सेमिस्टर्स झाल्या आणि मुलं मोठ्या सुट्टीसाठी गाशा गुंडाळून आपापल्या घरी गेली. मुलीही माहेरी परतल्या जणू. पुन्हा संजय-सुजाता, मनोहर-मंजू.
मग सुट्टीत देऊळ, आसपासची लेणी, समुद्रकिनारा असं सगळं अनुभवायला पर्यटक येऊ लागले. मनोहरने पुन्हा गेटवर पाटी लावली. खोल्या भाड्याने मिळतील. कॉलेज सुरू होईपर्यंत महिना-दीड महिना पर्यटक येत राहिले. साथ-सोबत मिळत राहिली. बंगला गजबजलेला राहिला. सुट्टी संपता-संपता मुलं पुन्हा हजर झाली. मागील अंकावरून पुढे चालू. सुरुवातीला रिमझिमत राहिलेल्या पावसाने पाहाता- पाहाता रौद्ररूप धारण केलं. कडकडाट-गडगडाट. आकाशात वीज चमकायला लागायची- इथे गावातली वीज जायची. मिट्ट अंधार. पंखे बंद. मुलांचा अभ्यास बंद. इनव्हर्टर लावला होता. पण त्याचं कार्यक्षेत्र मर्यादितच.जोडीला जनरेटर लावला. त्याचाही आवाज. तीन दिवस सतत हैदोस घातला पावसाने. तिसऱ्या रात्री अचानक संजयला दरदरून घाम सुटला. छातीत दुखायला लागलं. पहिल्यासारखीच सगळी लक्षणं. सुजाता थरकली. गेल्या वेळी शहरात होतो. आता या गावात. डॉक्टर- हॉस्पिटल किती दूर! अॅम्ब्युलन्स बोलावली तरी येईपर्यंत काय…
‘मनोहर…, मंजू’ सुजाताने हाका मारल्या. दोघंही धावली. मनोहरही वयस्कच. शिवाय अननुभवी. वरच्या मजल्यावरच्या यशने ऐकलं. यशचे वडील डॉक्टर. यश, सात्त्विक, प्रणव, सुजय धडाध्धड दहा-बारा जण हजर झाले. मुली आधीपासूनच होत्या. गाडी होतीच. मुलांनी अलगद उचलून संजयला गाडीत ठेवलं. सुजाता थरथरत होती. ती कसली गाडी चालवणार? प्रणवला गाडी येत होती. त्याने पटकन चावी हातात घेतली. दहा मिनिटांत हॉस्पिटल. पटापट सूत्रं हलली. अँजोग्राफी झाली. दोन ब्लॉकेजेस निघाली. अँजोप्लास्टीचा निर्णय झाला. स्टेंटस् टाकल्या गेल्या. तीन दिवस संजय- सुजाताबरोबर मुलं रात्रंदिवस आलटून- पालटून सेवेला हजर होती. मनोहर- मंजूने घरची सगळी सूत्रं हातात घेतली होती. सुजाताला जेवण पाठवणं, वापरलेले कपडे घरी नेऊन नवे कपडे पुरवणं सगळं सुरळीत चालू ठेवलं होतं.
चौथ्या दिवशी संजय घरी आला. दाराला फुलांचं तोरण बांधून मुलं वाट पाहात होती. मुलींनी कुंकुमतिलक लावून, ओवाळून दोघांचं घरात स्वागत केलं. सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
…रात्री अमीत-सुमीतबरोबर व्हिडियो-कॉल झाले. ‘कसा आहेस बाबा? कशी आहेस आई? मी आलो असतो रे. पण जरा…’ दोघांकडेही न येऊ शकण्याची कारणं होती .
‘काही हरकत नाही. आमच्याबरोबर आमची मुलं आहेत. आमचा बंगला मुला-बाळांनी गजबजलाय. मनोहर तुझा निर्णय किती योग्य होता. तू आम्हाला नवं कुटुंब मिळवून दिलंस. तू ग्रेट आहेस मनोहर. यू आर ग्रेट!’
डॉ. सुमन नवलकर
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply