दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या जोडीला आता राज्याच्या शिक्षण विभागाचे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळही स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचं शिक्षण मंडळ अर्थात एसएससी, एचएससी, केंद्रीय शिक्षण मंडळाचं सीबीएससी यांबरोबरच आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी या प्रमुख शिक्षण मंडळांच्या जोडीला आता ‘एमआयईबी’, म्हणजेच महाराष्ट आंतरराष्टीय शिक्षण मंडळाची भर पडणार आहे.
राज्यात सध्या शंभर निवडक शाळा या आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न करून, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याची मोहिम शिक्षण विभागाने आखली आहे. पुढे या संलग्नतेत आणखी शाळांची भर पडत जाईल. मराठी बरोबरच इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराथी, तमिळ, तेलगू, कन्नड या माध्यमांतील शाळांनाही भविष्यात या मंडळाची संलग्नता मिळू शकेल, अशी बातमी वाचनात आली होती. पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंत म्हणजेच चार वर्षे ते १८ वर्षांच्या मुलांना या शाळांमध्ये शिक्षण घेता येऊ शकेल. या मोहिमेस मिळणारा प्रतिसाद पाहून परराज्यातील किंवा परदेशातील शाळांनाही संलग्नता देण्याची तरतूद करण्यात या योजनेत करण्यात आली आहे.
शासनाच्या या प्रयोगात मला एक गोष्ट मात्र अत्यंत सकारात्मक दिसते, ती म्हणजे या नव्या मंडळाच्या अभ्यासक्रमात मुलांच्या नैसर्गिक क्षमतांवर जास्त लक्ष पुरवण्यात येणार आहे. प्रत्येक मुलात निसर्गाने काहीतरी वेगळं कौशल्य बहाल केलेलं असतं, गरज असते ती ते कौशल्य ओळखून ते जोपासणाऱ्या शिक्षकांची, मार्दर्शकांची. नेमकी हिच त्रुटी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत असल्याचं हेरून, शासनाने ह्यात बदल करण्याची भुमिका घेतली आहे.
ह्या मंडळाने ‘स्थायी समिती’च्या सदस्यपदी माझे मित्र आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे सुलेखनकार श्री. अच्युत पालव, सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, डॉ. अनिल काकोडकर आणि लडाखसारख्या दुर्गम भागात शिक्षण पद्धतीत कल्पक बदल केलेले श्री. सोनम वांगचुक या तिघांची केलेली नेमणूक. या तीन सर्जनशील व्यक्ती महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीत दाखल होऊ पाहाताहेत, हेच अत्यंत महत्वाचे आहे. महाराष्ट्र शासन शिक्षणाकडे गांभिर्याने पाहू लागलंय, हेच यातून ध्वनित होतं.
मला ही बातमी कळताच मी अच्युतजींना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं आणि ही कल्पना नेमकी काय आहे, ते विचारलं. या नविन शिक्षण मंडळाच्या माध्यमातून देण्यात असणाऱ्या शिंक्षणाच्या ज्या कल्पना मला अच्युतजींनी सांगीतल्या, त्या सर्वच्या सर्व जर राबवण्यात आल्या तर, आपल्या शिक्षण व्यवस्थेत एक सकारात्मक बदल येत्या काही वर्षात दिसून येईल. मला त्या कल्पनांतलं सर्वच समजलं असं नाही, परंतु त्यातल्या दोन गोष्टी मात्र मला चांगल्याच लक्षात आल्या, त्या म्हणजे, या मंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणात मुलाच्या अंगभूत कौशल्याकडे लक्ष ठेवून, अभ्यासासोबत त्या कौशल्याला जोपासण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, मुलांच्या मातृभाषेला प्राधान्य देण्यात येणार आहे आणि पुस्तकातला धडा किंवा कविता त्या मुलांच्या वर्गातल्या भिंतींवर जिवंत होणार आहे आणि तो धडा किंवा ती कविता त्या मुलांना येता जाता सतत दिसत राहाणार आहे. मुलांना देण्यात येणाऱ्या शिक्षणातल्या गोष्टी जर मुलांना त्यांच्या वातावरणात अनुभवता आल्या आणि त्या त्यांना त्यांच्या शब्दातून वा कृतीतून व्यक्त करता आल्या, तरच ते शिक्षण मुलांची वैचारिक आणि अंगभूत क्षमता वाढवतं व परिणामी विचारी आणि सृजनशील नागरीक घडवतं, असं म्हणता येतं. विद्यार्थी मार्क्स मिळवण्याचं मशिन न होता, व्यक्त होणारा माणूस व्हावा या दृष्टीनेच या शिक्षणक्रमाची आखणी या तिघांच्या मदतीने करता येणार आहे.
आपल्या कॅलिग्राफिच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या श्री. अच्युत पालवांचा प्रवासही या दृष्टीने अत्यंत स्फुर्तीदायी आहे. लालबागच्या गिरणी कामगार वस्तीत जन्मलेला अच्युत एक साधारण मुलगा. आज तो आंतरराष्ट्रीय किर्तीला प्राप्त झाला आहे, तो त्याच्या बेहतरीन कॅलिग्राफीमुळे. अच्युतच्या अंगात हे कौशल्य निसर्गत:च होतं, परंतू त्या कौशल्याला ओळखून, जोपासून वाढवणारं वातावरण त्याच्या घरात किंवा परिसरातही कुठे नव्हतं. शिक्षण घेऊन रितसर नोकरी करुन मुलाने घर सांभाळून संसाराला लागावं, एवढीच अपेक्षा त्या काळच्या बहुतांश पालकांमधे असायची, तशी ती अच्युतच्याही पालकांची होती. अच्युतची वाटचाल अश्याच रहाटगाडग्याच्या दिशेने सुरू असताना, अच्युतच्या बोटातलं हे कौशल्य त्यांच्या शिक्षकांनी हेरलं आणि त्या शिक्षकांनी अच्युतला प्रोत्साहन दिलं. अच्युतच्या शिक्षकांनी मग अभ्यासाबरोबरच त्याचं हे कौशल्य एखाद्या कुशल माळ्याच्या नजाकतीने जोपासलं, त्याला खत-पाणी घालून वाढवलं आणि मग त्यातून आजचा आभाळाएवढा झालेला अच्युत, नव्हे, सुलेखनकार श्री. अच्युतजी पालव आपल्यासमोर उभा ठाकला. अच्युत ते आंतरराष्ट्रीय किर्तीचे सुलेखनकार श्री. अच्युत पालव हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता, परंतू यशस्वी झाला तो केवळ उत्तम शिक्षकांच्या तेवढ्याच कुशल मार्गदर्शनामुळेच. श्रीं अच्युत पालव आता त्यांच्या शिक्षकांचं त्यांच्यावर असलेलं गुरूऋण, स्वत: विद्यार्थी मार्गदर्शकाच्या भुमिकेत शिरून फेडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मला खात्री आहे की, अच्युतजी आणि त्यांच्या सोबत कार्य करण्यास सज्ज झालेल्या काकोडकर आणि वांगचुक यांच्यासारख्या कुशल कारागिरांच्या हातून येत्या काही वर्षांत पैलू पाडलेले काही हिरे देश पातळीवर आपली चमक दाखवू लागतील.
माझे मित्र म्हणून मला श्री. अच्युत पालव यांचा अभिमान वाटतो. किंबहूना, मी त्यांचा मित्र आहे याचा मला अधिक अभिमान वाटतो. श्री. अच्युत पालव, सोनम वांगचुक आणि अनिल काकोडकर आपल्या शिक्षण व्यवस्थेत काहीतरी सकारात्मक बदल घडवू इच्छित आहेत यासाठी त्यांचं आणि ही कल्पना सुचल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचंही अभिनंदन..!
मित्र या नात्याने अच्युत पालवांच मनापासून अभिनंदन आणि त्यांना त्यांच्या या क्षेत्रातील योगदानासाठी शुभेच्छा.।!
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply