नवीन लेखन...

एक अल्पायुषी बेट

टोंगा हा दक्षिण पॅसिफिक महासागरातला एक देश आहे. ऑस्ट्रेलिआच्या पूर्वेला असणारा, एक लाख लोकसंख्येचा हा देश सुमारे १७० बेटांचा मिळून बनला आहे. या बेटांच्या परिसरात, समुद्राच्या पाण्याखाली एक ज्वालामुखी वसला आहे. आत्ताच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात या ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाला. हा उद्रेक घडून येताना एक लक्षवेधी घटनाही घडली. या उद्रेकादरम्यान इथलं ‘हुंगा टोंगा-हुंगा हापाई’ हे बेट नाहीसं झालं. सन २०१५ साली, म्हणजे अलीकडेच जन्माला आलेल्या या बेटाला फक्त सात वर्षांचं आयुष्य लाभलं. अल्पायुषी ठरलेल्या त्या बेटाची ही गोष्ट…

टोंगा देशाच्या अधिपत्याखालील या बेटांच्या समूहात हुंगा टोंगा आणि हुंगा हापाई ही दोन छोटीशी, सुमारे दोन किलोमीटर लांबीची निर्मनुष्य बेटं जवळजवळ वसली आहेत. सन २०१४च्या डिसेंबर महिन्यात या बेटांच्या मधल्या भागात, पाण्याखालच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हा उद्रेक सुमारे पाच आठवड्यांपर्यंत चालू होता. यावेळी सुमारे चारशे मीटर उंचीपर्यंत राख आणि खडक फेकले जात होते. या उद्रेकात या दोन बेटांच्या मधल्या भागातील समुद्राखालची जमीन वर येऊ लागली. ती इतकी वर आली की, अखेर ती पाण्याबाहेर डोकावू लागली. एका नव्या भूभागाच्या निर्मितीची ही सुरुवात होती. राखेनं व्यापलेल्या या जमिनीनं दिनांक ७ जानेवारी २०१५ रोजी कमाल क्षेत्रफळ गाठलं. हा भूभाग आता उत्तर-दक्षिण दीड किलोमीटर आणि पूर्व-पश्चिम दोन किलोमीटर इतका पसरला होता. त्यानंतर या भूभागाची उंची वाढू लागली. वाढतवाढत दोन आठवड्यांनी ती तब्बल १२० मीटरपर्यंत पोचली…

ज्वालामुखीच्या उद्रेकातून एका बेटाचा जन्म झाला होता… या बेटानं हुंगा टोंगा आणि हुंगा हापाई या दोन बेटांना जोडलं होतं… नुकतंच जन्माला आलेलं हे बेट ‘हुंगा टोंगा-हुंगा हापाई’ या जोडनावानं ओळखलं जाऊ लागलं...

संशोधकांच्या दृष्टीनं हे बेट महत्त्वाचं होतं. त्यामुळे अनेक संशोधक या घटनांवर लक्ष ठेवून होते. लाटांच्या आघातामुळे आणि चक्रिवादळांमुळे होणारी या बेटाची धूप अभ्यासली जात होती. हे बेट लवकर नष्ट होईल असं संशोधकांना वाटलं. कारण अशी ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेली बेटं ही, धूपेमुळे काही महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकत नाहीत. परंतु हे बेट याला अपवाद ठरलं. अवघ्या दहा महिन्यांतच तिथे काही प्रमाणात जीवसृष्टीही निर्माण झाली. यात विविध प्रकारची झुडपं, गवत, कीटक, पक्षी यांचा समावेश होता. या जीवसृष्टीचा उगम हा अर्थातच बाजूच्या हुंगा टोंगा आणि हुंगा हापाई या बेटांवर होता. ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेली जमीन अत्यंत सुपीक असते. त्यामुळे इथल्या जमिनीत जीवसृष्टी सहजपणे तग धरू शकली.

टोंगा बेटांचा प्रदेश हा भूशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय प्रदेश आहे. इथे पृथ्वीच्या कवचातील दोन भूपट्ट एकत्र आले आहेत व त्यातील एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाच्या खाली सरकत आहे. अनेक ज्वालामुखींनी व्यापलेला, वारंवार भूकंप घडून येणारा, असा हा प्रदेश भूशास्त्रज्ञांकडून पूर्वीपासूनच अभ्यासला जात आहे. हुंगा टोंगा आणि हुंगा हापाई या बेटांनी गेल्या ११० वर्षांच्या काळात या पाण्याखालच्या ज्वालामुखीचे सहा उद्रेक अनुभवले आहेत. यातले याअगोदरचे उद्रेक हे २००९ आणि २०१४-१५ साली झाले. २०१४-१५ सालच्या उद्रेकानंतर संशोधकांनी हुंगा टोंगा आणि हुंगा हापाई या बेटांच्या परिसराचा तसंच नव्यानं निर्माण झालेल्या बेटाचा, तपशीलवार अभ्यास सुरू केला. यासाठी प्रत्यक्ष मापनांद्वारे तयार केले गेलेले नवे व जुने नकाशे तर वापरले गेलेच, परंतु विविध कृत्रिम उपग्रहांद्वारे तयार केलेल्या नकाशांचाही उपयोग केला गेला. हुंगा टोंगा-हुंगा हापाई बेट हे इथल्या पाण्याखालच्या ज्वालामुखीच्या विवराच्या कडेचा भाग असल्याचं, या अभ्यासावरून दिसून आलं. विवराची ही कडा जरी वरून लहान आकाराची दिसत असली तरी, विवराच्या तळाचा व्यास सुमारे पाच किलोमीटर इतका मोठा आहे. ज्वालामुखीचा समुद्रतळाजवळचा व्यास सुमारे वीस किलोमीटर इतका आहे. या ज्वालामुखीची समुद्रतळापासूनची उंची सुमारे पावणेदोन किलोमीटर इतकी भरते. सन २०१५मध्ये बेटाच्या स्वरूपात समुद्राबाहेर डोकावण्याच्या अगोदर, हा ज्वालामुखी पाण्याखाली सुमारे दीडशे मीटर खोलीवर दडला होता.

जवळजवळ सात वर्षांच्या शांततेनंतर, गेल्या डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस या ज्वालामुखीच्या नव्या उद्रेकाला हळूहळू सुरुवात झाली. त्यानंतर या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला वायू, राख, खडक यांचं अधूनमधून लक्षणीय प्रमाणात उत्सर्जन होऊ लागलं. याबरोबरच इथल्या भूभागातही आता बदल होऊ लागले. हुंगा टोंगा आणि हुंगा हापाई दोन बेटांचा आकार वाढू लागला. सुमारे तीन आठवड्यांत या बेटांच्या आकारात सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली. ज्वालामुखींमुळे या जमिनीवर मोठ्या प्रमाणात राखही जमा होऊ लागली होती. इथपर्यंत सगळं ठीक होतं – एखाद्या सर्वसाधारण ज्वालामुखीच्या बाबतीत घडतं तसंच… परंतु १३-१४ जानेवारीला या ज्वालामुखीचे एकामागोमाग शक्तिशाली स्फोट होऊ लागले. या ज्वालामुखीतून दहा किलोमीटरपेक्षा अधिक उंचीपर्यंत पदार्थ फेकले जाऊ लागले.

त्यानंतर १५ जानेवारीच्या सकाळी या स्फोटांची तीव्रता आणखी वाढली. अखेर हे स्फोट इतके तीव्र झाले की, आता या स्फोटांत चाळीस-पन्नास किलोमीटर उंचीपर्यंत पदार्थ फेकले जात होते. आकाशात निर्माण झालेल्या राखेच्या ढगाचा आकार आता सुमारे अडीचशे किलोमीटर इतका झाला होता. ज्वालामुखीच्या या उद्रेकात आजूबाजूच्या बेटांचं मोठं नुकसान झालं. जवळपासची सगळी बेटं राखेनं आच्छादली गेली. या बेटांच्या परिसरातलं आकाशही राखेनं काळवंडलं. ढगांत जशा विजा चमकतात, तशा या राखेच्या लोटांतून विजा चमकू लागल्या. या विजांमुळे निर्माण होणाऱ्या रेडिओलहरी जगातील अनेक मापनयंत्रांनी टिपल्या. अशा विजा ज्वालामुखींच्या उद्रेकांत नेहमीच निर्माण होतात. परंतु इथे विजांची संख्या खूपच वाढत गेली. उद्रेकाच्या सुरुवातीच्या काळात दिवसाला काही हजारांत असणाऱ्या या विजांची संख्या आता मिनिटाला काही हजारांत पोचली. स्फोटातून निर्माण झालेल्या हवेच्या दाबामुळे समुद्राचं पाणी ढकललं गेलं आणि त्सुनामी निर्माण झाल्या. या जोरदार लाटांनी जवळपासच्या सर्वच बेटांना तडाखा दिलाच, परंतु त्या अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरही पोचल्या. या स्फोटांमुळे वातावरणात निर्माण झालेल्या आघातलहरी या पंधरा हजार किलोमीटरहून अधिक अंतरावरील इंग्लंडमध्येही टिपल्या गेल्या.

आणि हे सर्व घडत असतानाच १४ जानेवारी रोजी हे बेट खचायला लागलं होतं… त्यानंतर या बेटाचे दोन तुकडे झाले व दोन्ही तुकड्यांच्या मधला भाग पाण्यानं व्यापला… दिनांक १५ जानेवारीच्या सकाळी हे तुकडेसुद्धा समुद्रात गडप होऊ लागले आणि दिवस अखेरीस ते पूर्णपणे नाहीसे झाले… सात वर्षांच्या अस्तित्वानंतर हुंगा टोंगा-हुंगा हापाई बेटाचा अंत झाला होता… हुंगा टोंगा-हुंगा हापाई बेट इतिहासजमा झालं होतं… मागे राहिली ती पूर्वीची हुंगा टोंगा आणि हुंगा हापाई ही दोन छोटी बेटं – पुनः स्वतंत्र स्वरूपात!

सन २०१४-१५च्या उद्रेकापेक्षा यावेळचा उद्रेक खूपच तीव्र होता. तेव्हा या ज्वालामुखीनं बाहेर फेकलेल्या पदार्थांची उंची मीटरमध्ये मोजली गेली होती. आता मात्र ही उंची कित्येक किलोमीटरमध्ये मोजावी लागली. या प्रचंड उद्रेकात उत्सर्जित झालेल्या उर्जेचं प्रमाण हे हिरोशिमावर टाकल्या गेलेल्या अणुबाँबच्या ऊर्जेच्या तुलनेत शेकडोपट – कदाचित काही हजारपट – असल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. सर्वसाधारणपणे समुद्राखालील ज्वालामुखीचे उद्रेक नेहमीच तीव्र असतात. कारण जमिनीतून उत्सर्जित होणाऱ्या शिलारसाचा पाण्याशी संपर्क येऊन, या पाण्याची त्वरीत वाफ होते. परंतु आताचा उद्रेक हा अपेक्षेपेक्षाही तीव्र असण्यामागच्या कारणाची संशोधकांनी मीमांसा केली आहे. हे नव्यानं निर्माण झालेलं बेट म्हणजे ज्वालामुखीचा भाग असल्याचं पूर्वीच दिसून आलं होतं. संशोधकांच्या मते या ज्वालामुखीच्या तळाखाली शिलारसानं भरलेली मोठी पोकळी असावी. या पोकळीला झाकणारा ज्वालामुखीचा तळ हा त्या पोकळीत कोसळला असावा व पोकळीत समुद्राचं पाणी जोरात शिरलं असावं. या पाण्याची वाफ झाल्यानंतर, पोकळीच्या बंदिस्तपणामुळे तिथं प्रचंड दाब निर्माण होऊन, ही वाफ अत्यंत विध्वंसक बनली असावी. ही परिस्थिती तिथल्या भूप्रदेशाची जडणघडण बदलण्यास – हुंगा टोंगा-हुंगा हापाई बेट नष्ट करण्यास – पुरेशी ठरली.

आता नजीकच्या भविष्यात अशी परिस्थिती पुनः निर्माण होईल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. संशोधकांच्या मते, इथे छोटे उद्रेक होतच राहतील. परंतु मोठा उद्रेक घडण्याची शक्यता नाही. असा उद्रेक साधारणपणे सहस्रकातून एकदा होतो. कारण पुनः असा उद्रेक होण्यास, ही जमिनीखालची पोकळी आता पुनः शिलारसानं भरायला हवी. ही भरण्यासाठी अनेक शतकांचा काळ जावा लागेल. या पूर्वीचा असा प्रचंड स्फोट ११०० साली, आणि त्याअगोदर २०० साली झाला असल्याचे पुरावे संशोधकांना इथल्या खडकांत पूर्वीच मिळाले आहेत. त्यामुळे यानंतरचा मोठा स्फोट हा ३००० सालाच्या आसपास होऊ शकतो. काय सांगावं… तेव्हाही कदाचित अशाच एखाद्या हुंगा टोंगा-हुंगा हापाईसारख्या बेटाची निर्मिती होऊ शकते आणि अल्पकाळात त्याचा मृत्यूही घडून येऊ शकतो!

चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/qIpSgWdId4w?rel=0

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: NASA/Dan Slayback, NASA, Tonga Geological Services

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..