सातारा जिल्ह्यापासून अवघ्या २५ कि.मी अंतरावर वसलेलं, फुलांच्या विस्तीर्ण गालिच्याने लांबच लांब पसरलेल्या कास पठाराचं सौंदर्य म्हणजे निसर्गाने पश्चिम घाटावर, पर्यायाने महाराष्ट्रावर सिद्धहस्ताने केलेली फुलवड जणू. २०१३ साली या भागाला हेरीटेज म्हणून घोषीत करण्यात आलं, ते इथल्या अनोख्या वनसंपदेमुळेच ! हे पठार समुद्रसपाटीपासून साधारणत: १२१३ इतक्या उंचीवर स्थित असून सुमारे १७९२ हेक्टरवर पसरले आहे. यामध्ये वनखात्याची ११४२ हेक्टर तर ६५० हेक्टर जमिनीवर खाजगी मालकी आहे. सातारा शहरातील सह्याद्रीच्या पर्वतरांगातून या पठाराला भेट द्यावी लागते. इथल्या डोंगरांची वाट बर्यापैकी नागमोडी वळणाची असून डोंगरावरुन खोलवर दरी शहराची वस्ती, जलाशय आणि नद्या नजर वेधून घेतात. फुलापानांनी बहरलेला परिसर, वातावरणातला थंडावा मन मोहून टाकत चित्त अगदी प्रसन्न करणारा ! २०-२२ मिनिटांचा डोंगर सर केल्यावर अखेर कास पठारावर येऊन पोहोचतो, कास पठार हे कातळ खडकाचे व कमी मातीचे आणि अन्य द्रव्याने युक्त असे पठार आहे.
तिथे पोहोचण्यासाठी खासगी अथवा एसटी बसचा आधार घ्यावा लागतो. हेरिटेज दर्जा मिळाल्यामुळे त्याची जोपासना होत असल्याचं दिसून येतंय, तसेच प्रवेश फी देखील आकारली जात आहे. इथल्या प्रवेशद्वारावर आणि आसपासच्या परिसरात प्रवेश करताक्षणी चहुबाजुला नजरेस पडतो हिरवाईने नटलेला परिसर, फुलांनी बहरलेला विस्तीर्ण असा नयनरम्य आणि रंगीबेरंगी गालिचा. याचं एका शब्दात वर्णन करायचं झाल्यास पृथ्वीवरील फुलवन. जवळपास ८५० किंवा त्यापेक्षा अधिक प्रकारची फुलं सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या पंधरवडयापर्यंत पाहायला मिळतात. नुकतंच पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे आणि अधून मधून घडणार्या सूर्याच्या दर्शनाने इथल्या फुलापानांवर वेगळीच झळाळी व तेज पाहायला मिळतं. अगदी सकाळी म्हणजे साडेसात-आठच्या सुमारास जर का आपण इथे भेट दिलीत तर विविध रत्नांनी इथल्या फुलापानांवर शिंपण केल्याचा आभास होतो.
प्रवेश करतेवेळी अनेक रानफुलं डोलत, आपल्या स्वागतासाठी तयार असतात. पांढरी, जांभळी, लाल, गुलाबी, पिवळी, केशरी अशा अनेकविध रंगांनी झालेल्या फुलांच्या दर्शनामुळे आपण सृष्टीसौंदर्याचा खर्या अर्थाने आस्वाद घेतो. कास पठार हे विस्तीर्ण लांब आडवं दूरवर पसरल्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत फुलंच फुलं, सोबत दुरून दिसणार्या डोंगररांगा आणि गड. त्यामधोमध वसलेली दरी आणि पठारं याची नैसर्गिक रचनाच मुळी सुरेख आणि कल्पक तरी कशी ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
कास पठारावर जशी अनेक रंगांची फुलं, झाडं पाहायला मिळतात तशीच अनेक रानपाखरं, पक्षी, सरपटणारे किटक व प्राण्यांचं दर्शन घडत राहतं. अधूनमधून दिसणारे एक दोन ओढे व त्यावर तरंगणारी कमळं देखील सुबक वाटतात.
इथली रानपुष्प क्वचितच कुठेतरी पाहायला मिळत असतील. त्यातल्या काही फुलांची नावं घ्यायची झाल्यास निचुर्डी, दीपकांडी, अबोलिमा, नागफणी, शेषगिरी, डॉसेरा, सापकांदा, नभाळी आणि चवर. विशेष म्हणजे ही फुलं पाच सहा किंवा अनेक पाकळ्यांची नसून केवळ एक ते तीन पाकळ्यांची पाहायला मिळतात. हे कंदी पुष्पांच्या गटांमध्ये मोडतात. पण या सर्वांमध्ये आपलं लक्ष वेधून घेणारी फुलं म्हणजे मिकी माऊस फ्लॉवर्स. पिवळी, लाल रंगांची फुलं, त्याला मिकी माऊसच्या चोचीसारख्या पाकळ्या, बाजूला विस्तीर्ण कानांसारख्या पाकळ्यांमुळे ही फुलं सर्वांमध्ये उठून दिसतात. त्याव्यतिरिक्त गुलाबी व निळ्याशार रंगाच्या फुलांमुळे पठार अक्षरश: डोळ्याचे पारणे फिटून टाकतो.
पठार फिरुन बाहेर पडताक्षणी, आपण बाहेर जाण्यासाठीच्या मार्गाकडे कूच करतो, तिथून आपलं लक्ष वेधून घेणारा विस्तीर्ण खोलगट कास तलाव खुणावतो. स्वच्छ, निळाशार आणि काहीसा दुधी रंगानी तरलणारा हा तलाव म्हणजे पर्यटकांसाठी प्रेक्षणीय ठिकाण आहे. पण पाण्याची खोलता असल्याने चुकूनही पोहण्याचं धाडस करु नये. एकटं दुकट्यानं जाण्याचा हा परिसर नव्हे, याचं भानदेखील असू द्यावं.
कास व त्यालगतचा परिसर पाहाण्याचा उत्तम महिना म्हणजे सप्टेंबरचे शेवटचे दोन आठवडे व ऑक्टोबर महिन्यातील पंधरवडा. या चार आठवड्यात कास न्याहाळण्यात जी काही मजा आहे ती काही औरच आहे. इतरवेळी मात्र हा परिसर काहीसा कोमेजलेलाच असतो. विशेषत: उन्हाळ्यात.
निसर्गाची वैविधता काय असते आणि त्याचं स्वरुपही किती विस्मयकारक असू शकतं, हे जर का पाहायचं असेल तर किमान एकदातरी कास पठारला भेट द्यायलाच पाहिजे.
Leave a Reply