ग्रुप ऍडमिन / टोळी मुकादमाच्या मानसिकतेचा अभ्यास…..
ग्रुप वरील सदस्यांच्या भिन्नकभिन्न मानसिकतेचा सांगोपांग विचार, एक शोध, अनेक बोध..
प्रबंध लिहून तो डॉक्टरेट साठी सबमिट करायचे ठरले आणि मी विषयाच्या शोधात वणवण करू लागले ही वणवण केल्यामुळे माझे अंगठे दुखू लागले कारण ही वणवण मी नेटवर केली. कॉपी आणि पेस्ट चा पर्याय होताच पण थोड्याच वेळापूर्वी चहा घेतल्याने तो बेत रहित केला. पेस्टी थोड्या वेळाने खायचे ठरले. वणवण करायला कॉपी च्या विचाराने पुन्हा हुशारी आली आणि मी माझ्या Phd प्रबंधासाठी पुन्हा विषय शोधार्थ निघाले.
या मार्गतही असतात अडथळे मला याची जाणीव होतीच. मी ऑनलाइन बघून माझ्या बहिणीने माझ्या कोर्टात एक चेंडू टाकला मी फार वेळ तो चेंडू बघूनही न बघितल्यासारखं केलं. तर लगेच मम्मीचा फोन वाजला आणि फोन उचलल्यावर मागोमाग मला ऐकू आलं आहे की ? का ग? तेच ते हातात आहे फोन आणि बसल्या त्यात मान घालून या तिच्या उत्तराने मी समजायचे ते समजलं तिने विचारलं असणार, राजू कुठेय? काय करतेय? आज सुट्टी असेल ना? काय दुसरा काम धंदा नाय का तिला? या सर्व प्रश्नांची मम्मीने उत्तरे देऊन ठेवली होती.
खरंतर माझंच चुकलं होत फोन आल्या आल्या मी त्या संतूर च्या जाहिरातीमधील मुलीसारखी मम्मी $ $ $ $ $ अस म्हणत पळत जाऊन तिचा फोन ढापायला पायजे होता पण असो. मी मग तायडीने मघाशी माझ्या नेटवर टाकलेल्या चेंडूला हिरवा सिग्नल दिला आणि तो चेंडू डोळ्याखाली घातला. तिने लिहिलं होतं सकाळी सकाळी काय दुसर काम नाही का ? ऑनलाइन काय करतेस सारखी ? म्हणजे तिला कितीच्या काय विचारायचं होत या दोन वाक्यात.
मी तिला काय उत्तर द्यावे या विचारात गुंग. एक मन म्हणाले तू आत्ता या प्रश्नाचे उत्तर देऊ नको प्रलंबित ठेव. दुसर मन म्हणाले प्रलंबित ठेवायला ती काय फाईल आहे का? तिसर्या मनाने कारण नसताना या वादात उडी घेतली आणि म्हणाले तुझ्याकडे एक आणखी छान पर्याय आहेच. तू प्रश्नाचे उत्तर न देता प्रतिप्रश्न विचार.
मी यावर विचार न करता प्रति या शब्दावर विचार करू लागले. प्रति प्रति अनेक प्रति. मग आठवलं एका महत्त्वाच्या कागदाच्या किती प्रति काढू अस मला कुणी विचारलं तर दोन बर तीन काढा.. नको नको चार काढा बर… बरोबर पाच प्रति द्या. म्हणून आपण किती कागद मात्र करतो.
का काढतो आपण एवढ्या प्रति. असाव्या आणि लागतील म्हणून…छे असाव्या काय असाव्या. पाच पाच प्रति असाव्या म्हणून. तू स्वतःला निसर्ग प्रेमी नाही म्हणवून घेऊ शकत आजपासून म्हणे असाव्या.. लोणचे घाल त्या प्रतिचे. मी या विचारातून पुढे वहात जाऊन स्वतःचा निसर्गप्रेमी हा दर्जा स्वतःच्या हाताने प्रतिस सॉरी धुळीस मिळविला….
(क्रमशः)
© राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१९/०८/२०१८
Leave a Reply