आज आमच्या आजोबांचा काही वेगळाच होता नूर
आजीला म्हणती चल जाऊया, फिरायला खूप दूर
काठी सोडून हाती घेतला
तिचा सुरकुतलेला हात
तिच्या इश्श मध्ये कळली, तिची अंतरीची साथ
नाना-नानी पार्क सोडून
धरली चौपाटीची वाट
जूने दिवस आठवले, पाहून झेपावणारी लाट
ओलसर वाळूचा बसायला घेतला पाट
दुखत नव्हते आता, कंबर-ढोपे-पाठ
अहो दात नाहीत तरी घेतले
चणे-दाणे चघळायला
गजराही घेतला आजोबांनी
तिच्या ईवल्या आंबाडयांत माळायला
आजूबाजूच्या तरुणाईची दखल कुठली दोघांना?
निसटून नव्हत दयायच नं ह्या मोरपंखी क्षणांना
बोलता बोलता क्षितीजावर
चढू लागली लाली
आणि साक्षीला चंद्राची स्वारी देखील आली
आता खट्याळपणाला रंग चढला
आजोबांच्या रोमरोमात
आजीला म्हणती नभीचा चंद्र , दिसतोय तुझ्या डोळ्यात
अहो आज नाही तुमचा माझा
वा वाढदिवस लग्नाचा
मग शिळ्या कढीला म्हणते मी
एवढा ऊत आलाय कशाचा?
अग, फार दिवसाची इच्छा होती
तुला माहीत नसेल वेडे
जाण्यापूर्वी वाटल, आपणही साजरा करावा कि
एखादा व्हॅलेंटाईन डे, एखादा व्हॅलेंटाईन डे
— सौ. अलका वढावकर
Leave a Reply