गोपाळ गणेश आगरकर :
(१४ जुलै १८५६–‒१७ जून १८९५)
सर्वमान्य आगरकर
सनातनी शाहण्यांचा मूर्खपणा जगाला जाहीरपणे दाखवून देणारे, देवाचे अस्तित्व स्पष्टपणे नाकारणारे, जातीयसंस्थेवर जोरदार प्रहार करणारे, संमती वयाचा आग्रह धरणारे खरे खुरे सुधारक गोपाळ गणेश आगरकर
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यात झाला. खेळणे, पोहणे, वाचणे यांत त्यांचे बालपण गेले. हालअपेष्टांना तोंड देत कराड, रत्नागिरी, अकोला आणि पुणे येथे राहून ते एम्. ए. झाले. अकोल्याच्या विष्णू मोरेश्वर महाजनींचे त्यांस मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यात निर्माण केलेल्या जहाल विचारांच्या राष्ट्रवादी पंथास ते लोकमान्य टिळकांसह जाऊन मिळाले. लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी या तिघांनी पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ स्थापन केले (१८८०), तसेच केसरी आणि मराठा (इंग्रजी) ही पत्रे चालू केली (१८८१). न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले. त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून परिणामकारक लेखन आणि कुशल संपादन यांच्या जोरावर अल्पावधीतच केसरीला लोकप्रियता प्राप्त करून दिली. न्यू इंग्लिश स्कूलच्या चालकांनी स्थापन केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ च्या ‘फर्ग्युसन महाविद्यालया’चे प्राचार्य (१८९२) म्हणूनही त्यांनी अखेरपर्यंत काम केले.
रूढी व परंपरांची सूक्ष्म आणि तीक्ष्ण समीक्षा सुधारकाग्रणी प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर यांनी मानवतावाद व बुद्धिवादाच्या आधारे केली. या समीक्षेच्या दीर्घ सत्रामुळेच महाराष्ट्रात नव जागृती निर्माण होण्यास मदत झाली. आगरकरांचे जीवन रम्य किंवा अदभुत नसले तरी अनेक संघर्षांनी भरलेले होते. वर्तमानकाळाविषयी आगरकरांना असमाधान वाटत होते, पण निराशा मात्र वाटत नव्हती. लोकांच्या विवेकाला योग्य रीतीने आवाहन केल्यास तो जागा होऊन पारंपरिक श्रध्देवर मात करील यावर त्यांचा पक्का विश्वास होता. त्यातूनच त्यांनी लोकांचा विवेक जागृत करण्यासाठी धर्म, श्रद्धा, धर्मसमजुती, रूढी, परंपरा या बाबींची कठोर चिकित्सा त्यांनी केली. त्याबदल्यात त्यावेळच्या पुण्यातल्या कर्मठ सनातन्यांनी त्यांची #जिवंतपणी_प्रेतयात्राही काढली. पण आज आगरकर सर्वमान्य आहेत. प्रेतयात्रा काढणारांचा विचार त्यांच्या वारसांना आणि लोकांना देखील मान्य नाही.
आगरकरांनी त्यांच्या एका लेखात नेहमीप्रमाणे अत्यंत परखड शैलीत भारतीय मानसिकतेचा समाचार घेतला आहे. जो आजच्या परिस्थितीतही अधिक महत्वपूर्ण आणि लक्षवेधी आहे.
“जुन्या वेदांतापलीकडे वेदान्त नाही, जुन्या गणितापुढें गणित नाही, जुन्या अलंकाराहून अलंकार नाहीत, जुन्या व्याकरणापुढे गती नाही, जुन्या न्यायापेक्षा दुसऱ्या न्यायात अर्थ नाही, असल्या भ्रमामुळे आमचे डोळे बांधल्यासारखे होऊन आज कित्येक शतके तेलाच्या बैलांप्रमाणे आम्ही जुन्या शास्त्रांच्या आणि पुराणांच्या घाण्याभोवती घिरट्या घालीत आहोत. हे आमचे परिभ्रमण केंव्हा संपेल ते संपो, पण यातून आमची सुटका झाल्याखेरीज कोणत्याही शास्त्रात किंवा कलेत आमचे पाऊल पुढे पडण्याचा संभव नाही. पाणिनी, मम्मट, दंडी, चरक, सुश्रुत, भास्कराचार्य वगैरे फार मोठे पुरुष होवून गेले असे रोज सकाळी उठून म्हणा आणि त्यास आणि त्यांच्या ग्रंथास पाहिजे तर साष्टांग नमस्कार घाला. पण यापुढे त्यांच्या नावाचे पवाडे गात बसण्यात किंवा त्यांच्या ग्रंथांना पुनः पुन्हा कवटाळण्यात काय अर्थ आहे ? त्यात जेवढा ग्राहयांश असेल तेवढा अलबत घ्या व त्यांचे काळजीपूर्वक रक्षण करा. पण त्यांच्या कृतीत जी दोषास्थळे असतील ती काढून तींत नवीन भर टाकण्याच्या प्रयत्न केल्याशिवाय तुमचा निभाव कसा लागेल?”
आगरकरांच्या या सडेतोड भूमिकेमुळे ग्रंथांचे अवडंबर माजविणाऱ्या स्थितिप्रिय मंडळींची मोठी गोची झाली. समाजातील त्यांच्या तथाकथित वर्चस्वाला धक्का पोहचणार होता. या कारणामुळेच सनातन्यांचा आगरकरांवर रोष होता. त्यांना या समाजाने जवळ जवळ बहिष्कृत म्हणूनच वागविले. ग्रंथप्रमाण्य बाजूला सारतानाच आगरकरांनी प्रयोगनिष्ठ आणि डोळस बुद्धिवादाचे निकष सुधारणेसाठी लावले पाहिजे असे आवर्जून सांगितले. जे कोणत्याही काळात लागू आहे.
आगरकरांनी ज्या काळात आपले लेखन केले त्या काळात समाजावर रुढीचा किती जबरदस्त पगडा होता हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. समाजाच्या दृष्टीने निरीश्वरवादाचा पुरस्कार जाहीरपणे करणारा, वर्णाश्रम आणि जातीसंस्था यांच्यावर कोरडे ओढणारा माणूस समाजकंटकच होता. आगरकरांच्या या असल्या शिकवणीमुळे समाज रसातळाला जाणार, भ्रष्टाचार माजणार अशी हाकाटी सनातनी मंडळींनी सुरू केली. दुर्दैवाने लोकमान्य टिळकांसारख्या धुरीणांनी शास्त्राधारवादी (legalistic) भूमिका घेतल्यामुळे या सनातन्यांचे पारडे अधिक जड झाले. त्यामुळे आगरकरांच्या तात्विक भूमिकेवर हल्ला चढविण्यासाठी त्यांना अधिक बळ मिळाले. परंतु आगरकरांनी सर्व आक्षेपांना खंबीरपणे तोंड दिले. सनातनी विचारांमुळे चालू असलेल्या अन्यायाचे भयानक रूप समाजासमोर अधिक प्रखरपणे मांडले. आगरकरांच्या निष्कलंक चरित्र्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेणारांची मोठी पंचायत झाली. सोवळ्या-ओवळ्याचे स्तोम माजविणाऱ्या कांहीं शास्त्री-पंडितांची व्यसनाधीनता आणि आगरकरांचे पवित्र जीवन यातील फरक हळूहळू लोकांच्या ध्यानात येऊ लागला. त्यामुळेच आगरकर सर्वमान्य झाले.
संमतीचे वय आणि जुन्या लोकांचा खोटेपणा त्यांनी चव्हाटय़ावर मांडला, मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित केली, विवाहकाल आणि संभोगकाल यासंबंधी अधिक गांभीर्याने समाजात नवा विचार पेरला, सोवळ्यांची मीमांसा केली, संमती बिलास धर्मशास्त्र बाधक नसल्याचे अनेक पौराणिक दाखल्यांचा संदर्भ देऊन स्पष्ट केले, धर्मकल्पना नेमकी कुठून आली याबाबत वस्तुनिष्ठ अध्ययनाच्या आधारे नवी मांडणी केली, घटस्फोट आणि काडीमोड, थडगी आणि देवळे, मूर्तिपूजेचा उदभव आणि प्रकार, सामाजिक सुधारणा आणि कायदा अश्या कितीतरी काळाच्या पुढे घेऊन जाणाऱ्या विषयांची विविधांगी आणि समाजपयोगी मांडणी करणारे आगरकर आजही दुर्लक्षित आहेत हे मात्र दुःखद आहे.
महाविद्यालयीन जीवनातच जेरेमी बेंथम, जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संस्कारित झाल्यामुळे त्यांचा दृष्टीकोन उदारमतवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झालेला होता. याच दृष्टीकोनातून तत्कालीन समाजाची शिलावस्था त्यांना जाचत होती व समाज जागृती करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखांतून हीच भूमिका व्यक्त होऊ लागली. सामाजिक प्रश्नांच्या जाणिवेपेक्षा राजकीय प्रश्नांची जाणीव अधिक तीव्र असली पाहिजे, असे केसरी व मराठाच्या चालकमंडळींस वाटत असल्यामुळे, आगरकरांचा वैचारिक कोंडमारा होऊ लागला. परिणामत: ते केसरीतून बाहेर पडले (१८८७) आणि आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादन-प्रसारासाठी सुधारक हे पत्र त्यांनी काढले (१८८८). त्यात राजकीय व अर्थशास्त्रविषयक लेखही येत.
बुद्धिवादी दृष्टीकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानीत नसल्यामुळे समाजसुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते. नीतिमान आणि सदाचरणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म यांचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती. परोपकारादी सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले, अशी त्यांची भूमिका होती. बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता, स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टी, इहवाद आणि मानवतावाद या सप्त:सूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे. साहजिकच, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता आणि चातुर्वर्ण्य, जातिसंस्था, अस्पृश्यता, बालविवाह, ठरवून केलेले विवाह इ. गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या. मुला-मुलींस समान शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम व व्यवसायाभिमुख शिक्षण द्यावे, दुष्ट आचारांचे निर्मूलन करावे, सदाचाराचा प्रसार करावा, ज्ञानवृद्धी करावी, सत्यसंशोधन करावी, भूतदया राखावी यासाठी ते प्रयत्नशील होते. मनुष्यजातीचे ऐहिक सुखवर्धन हेच त्यांचे ध्येय बनले होते. तथापि निव्वळ इंद्रियसुखालाच ऐहिक सुख मानण्याइतपत त्यांची दृष्टी संकुचित नव्हती. नीतिमान आणि संयमी जीवनामुळे मनाला लाभणारे समाधानही या ऐहिक सुखात त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिस्वातंत्र्यामुळे स्वार्थ आणि स्वैराचार फैलावण्याऐवजी समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहितचिंतकच होतील, असे त्यांना वाटे. उलट व्यक्तिस्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती. परंपरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता; त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल, हे ते मान्य करीत; मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी, असे ते म्हणत. अशा रूढी आणि परंपरा स्वखुषीने सोडून द्यावयास समाज तयार नसेल, तर त्या सरकारी मदतीने कायदेशीर रीत्या नाहीशा कराव्या, असे त्यांचे मत होते. “ज्या देशातील हजारो पिढ्यांनी अनेक गोष्टीत मोठ्या कष्टाने केलेल्या अनेक सुधारणांचे फळ आपणास आयतेच प्राप्त झाले अशा अनेक देशांतील धर्मांचा, रितीरिवाजांचा व लोकांचा सर्वथैव त्याग करणाऱ्या मनुष्यास खऱ्या सुधारकाची पदवी कधीही शोभणार नाही”, हे त्यांचे म्हणणे महत्त्वाचे आहे. केवळ धर्मच नव्हे, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सारासार विचार करून आंधळेपणाने गतानुगतिक वर्तन नाकारून जाणीवपूर्वक योग्य त्या मार्गाची निवड करण्याचा पुरस्कार करणारे आगरकर बुद्धिवादी संत किंवा देव न मानणारे देवमाणूस मानले जातात.
आगरकरांचे विचार तत्कालीन अंधश्रद्ध सामान्यांना समजले नाहीतच. तथापि टिळकांसारख्या सुशिक्षित आणि चिंतनशील व्यक्तींचाही त्यांना पाठिंवा मिळू शकला नाही. जनतेचे लक्ष समाजक्रांतीवर केंद्रित करून त्यात तिची शक्ती वाया घालवण्यापेक्षा आधी राजकीय स्वातंत्र्यासाठी तिचा उपयोग करून घ्यावा, तसेच सामाजिक रूढींच्या प्रश्नावर लोकांची मने दुखवून राजकीय चळवळीत फूट पाडू नये, असे टिळकांना वाटे. ईश्वर आणि धर्म यांच्याविषयीचे आगरकरांचे विचार रा. गो. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांसारख्या सुधारक व्यक्तींनाही पटत नसत. सुधारकातील लेखांविरुद्ध चहुबाजूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. खुनाच्या धमक्या, प्रेतयात्रा काढणे इ. प्रकार झाले; परंतु ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’, या भूमिकेतून सामाजिक सुधारणांचा कडवा पुरस्कार त्यांनी आमरण चालू ठेवला. सुधारकातील लेखांतून त्यांचे समाजजीवनाच्या विविध अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन प्रत्ययास येते. स्त्री-पुरुषांचा पोषाख, विधवांचे केशवपन, सोवळे-ओवळे, अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार, केशकर्तन, पायतणे इ. विषय जसे त्यांत आहेत, तसेच देवतांची उत्पत्ती, मूर्तिपूजा, आत्म्याची मरणोत्तर स्थिती इत्यादींसारखे तात्त्विक आणि धर्माशी निकटचा संबंध असलेले विषयही आहेत. सामाजिक सुधारणा आणि कायदा यांचे संबंध काय असावेत, यासंबंधीची आपली भूमिका मांडण्यासाठी आणि समाजहितकारक कायद्यांच्या जोरदार पुरस्कारासाठी काही लेख लिहिले गेले आहेत; तर काही लेखांतून सामाजिक गुलामगिरीने जखडून गेलेल्या स्त्रियांच्या शिक्षणादी समस्यांविषयी मूलगामी विचार आलेले आहेत.
समाजोन्नतीचा ध्यास असल्याने समाजचिंतन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव होता. तसेच राजकीय विचारांच्या जहालपणात ते टिळकांच्या बरोबरच होते. राजकीय हक्क आणि राजकीय स्वातंत्र्य यांची तीव्र जाणीव त्यांच्या लेखांतून स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली आहे. चिपळूणकर निवर्तल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय विचारजागृती घडवून आणण्याचे काम केसरीतून बाहेर पडेपर्यंत त्यांनीच केले.
आपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंधसाहित्यात त्यांनी मोलाची भर घातली, पल्लेदार वाक्ये, मुद्देसूद प्रतिपादन, अन्वर्थक अलंकार आणि प्रासंगिक नर्मविनोद ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये. केशवसुत, ह. ना. आपटे यांसारख्या थोर साहित्यिकांवर आगरकरांचा वैचारिक व भाषिक प्रभाव होता. “ज्याने आपल्या बुद्धिसामर्थ्याने व साधुत्वाने जगास वश केले, तो खरा शास्ता” हे आगरकरांचे म्हणणे त्यांच्या वैचारिक व भाषिक क्षमतेचे निदर्शक आहे. त्यांच्या ‘कवि, काव्य, काव्यरति’ आणि ‘शेक्सपिअर, भवभूति व कालिदास’ यांसारख्या साहित्यविषयक निबंधांनी आजच्या काही टीकाकारांचे लक्ष वेधून घेतले असून त्यांनी आगरकरांना साहित्यशास्त्रातील काही मूलभूत तत्त्वांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणारे विचारवंत मानले आहे. काव्य आणि संवेदना यांचा विशेष संबंध, काव्यातील सत्य आणि शास्त्रीय सत्य, काव्यातील करुणरस, कविमन आणि काव्यनिर्मितिप्रक्रिया इत्यादींसंबंधीचे त्यांचे विचार या दृष्टीने कक्षणीय ठरतात. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : विकारविलसित अथवा शेक्सपीअरकृत हॅम्लेट नाटकाचे भाषांतर (१८८३), डोंगरीच्या तुरुंगांत आमचे १०१ दिवस (१८८२), शेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र (१९०७), वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण. विकारविलासिताच्या प्रदीर्घ प्रस्तावंनेत परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतरे कशी करावी, यासंबंधीची मते त्यांनी मांडली आहेत. ‘कोल्हापूर प्रकरणा’वरून १८८२त डोंगरी येथे टिळकांसह कारावास भोगत असतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी डोंगरीच्या तुरुंगांत मध्ये खेळकर आणि विनोदी शैलीत सांगितले आहेत. मराठी वाक्याचे निरनिराळे अवयव आणि त्यांचे परस्परसंबंध यांचा तपशीलवार विचार त्यांनीच मराठीत प्रथम आणला. त्यांचे केसरीतील निवडक निबंध (१८८७) आणि सुधारकातील वेचक लेख (निबंधसंग्रह १८९५) प्रसिद्ध झाले आहेत. साहित्य अकादेमीनेही त्यांचे काही लेख प्रसिद्ध केले आहेत. यशोदाबाई फडके यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या आगरकरांना दांपत्यजीवनात दु:ख, दारिद्र्य, संकटे आल्याने बौद्धिक वातावरण नसल्याची खंत होती. दम्याच्या विकाराने पुणे येथे ते निधन पावले.
“चांगली राजकीय स्थिती ही चांगल्या गृहस्थितीचे व धर्मपद्धतीचे फळ आहे. सबब या दोहोंच्या सुधारणेस प्रथम लागले पाहिजे. कर्तव्यबुद्धी व परोपकारबुद्धी पूर्णपणे जागृत झाली असेल, त्यांनी आपापल्या देशाचा जीवनार्थ कलहात टिकाव लागण्यासाठी रात्रंदिवस निरपेक्ष बुद्धीने झटले पाहिजे”, असे आगरकर म्हणतात.
‘देवाची कल्पना माणसाचीच’ असे आगरकर म्हणतात. “आकाशातून देव येथे कधी आले नाहीत, येथून परत कधी गेले नाहीत. आम्हीच त्यांना येथल्या येथे निर्माण करतो, त्यांच्या गुणांचे पोवाडे गातो आणि चाहील (हवे) तेव्हा त्यांस नाहीसे करतो” असे त्यांनी ह्या संदर्भात नमूद केले आहे. “अनेकत्वानंतर एकत्वाची, स्थूलानंतर सूक्ष्माची, जड़ानंतर चिद्रूपाची, साकारानंतर निराकाराची, इंद्रियगोचरानंतर अतींद्रिय ज्ञानाची, व्यक्तानंतर अव्यक्ताची व गम्यानंतर अगम्याची कल्पना मनुष्याच्या अधिकाधिक विकास पावत जाणाऱ्या बुद्धीस येणे हेच अत्यंत स्वाभाविक आहे.” पुढे वेदान्त विचारांच्या कुंडात पेटलेल्या अग्नीत हे द्वैतही खाक होऊन जाते आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ एवढा अनिर्वचनीय विचारच फक्त शिल्लक उरतो. हा धर्मविचारांचा कळस होय. त्यामुळे धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अमानुष, अघोरी, जुलमी प्रकाराना त्यांनी कड़ाडून विरोध केला. “सोवळ्याओवळ्याचा बडेजाव करणे… म्हणजे व्यवहारात नसत्या अडचणी उपस्थित करणे आणि वर्गावर्गात सलोखा न होण्यासारखी अट घालून ठेवण्यासारखे होय.” मात्र “स्वभूमीत, स्वलोकात, स्वधर्मात आणि स्वचारात राहून अविचारी आणि अज्ञानी देशबांधवांच्या निंदेस किंवा छळास न भिता त्यांच्याशी कधी भांडून, कधी युक्तिवाद करून, कधी लाडीगोडी लावून अथवा सामर्थ्य असल्यास कधी त्यांना दटावून त्यांची सुधारणा करणे यातच खरी देशप्रीती, खरी बंधुता, खरा देशाभिमान, खरे शहानपण व खरा पुरुषार्थ आहे.”
‘यतो वाचो निवर्तन्ते…’ सारख्या औपनिषदिक वचन उद्धृत केल्याने आगरकरांना अज्ञेयवादी मानले जाते. परमतत्त्व निर्गुण निराकार अनिवर्चनीय म्हणजे अज्ञेय हे मान्य केले की, आगरकर स्पेन्सरप्रमाणे अज्ञेयवादी किंवा पारलौकिकाविषयी शंका उपस्थित केल्याने ह्यूमप्रमाणे संशयवादी मानले जातात. इहवादी, इहनिष्ठ, विवेकी असे हे समतेचे तत्त्वज्ञान अस्पृश्यता निवारणासाठी मोलाचे कार्य केले.
— संकलन
चंद्रकांत धोंडी चव्हाण ,पर्यवेक्षक
श्री वा.स.विद्यालय ,माणगाव,ता कुडाळ,जि.सिंधुदुर्ग
Leave a Reply