इथपर्यंत आमचा बराच चढ चढून झाला होता. वरखाली जायला दगडी पाय-या होत्या, पण एकसारख्या नव्हत्या. आता आम्ही मोर्चा वळवला ‘कॉंडॉर’च्या देवळाकडे. एका गुहेच्या तोंडाजवळ प्रचंड मोठ्या शिळेतून अगडबंब कॉंडॉर पक्षी जमिनीला चोच लावलेल्या स्थितीत, पंख पसरून झेपावलेला दिसतो. याच्या मागच्या गुहेत एकच टनेलसारखी खिडकी आहे. त्यातून डिसेंबरमध्ये काही दिवसच सूर्यप्रकाश गुहेत येतो. एरवी ही गुहा पूर्ण अंधारात असते. ही गुहा पूर्व भागात आहे.या गुहेत व आसपास बरीच मानवी हाडे, बायकांच्या ममीज सापडल्या आहेत. यावरून ही जागा स्त्रियांचे बळी देण्याची व सांगाडे राजासाठी काम करणा-या कामगारांचे असावेत असा कयास केला गेला आहे.
राजवाड्याच्या मागे एक आयताकृती दगड ठेवलेला आहे. त्याला ‘सेरेमोनियल रॉक’ म्हणतात. सूर्य देवतेला प्रसन्न करण्यासाठी या दगडावर बळी देण्याची पद्धत असावी. त्यामागे उंच खडकावर सर्वत्र नजर ठेवता यावी या हेतूने बनवलेले सुरक्षा रक्षकाचे घर आहे. त्याच्या खिडकीतून माचूपिचू, वायनापिचू, सर्व लोकांची घरे, राजवाडा वगैरे सर्व परिसर छान पहाता येतो. राजवाड्याच्या ब-याच खालच्या पातळीवर जन्सामान्यांची घरे, धान्याची कोठारे, शेतीची मोकळी जागा इ. आहेत. माचूपिचूचा पूर्व भाग रहाण्यासाठी व पश्चिम भाग धार्मिक गोष्टींसाठी वापरलेला दिसतो.
सर्व ठिकाणी हिंडून पहात असताना आपण खूप वर्षांपूर्वी नांदत असणा-या इन्कांचा त्या काळच्या शहरात वावरत आहोत ही भावनाच खूप ‘ग्रेट’ वाटत होती. इन्कांनी याबद्दल काही लिहून ठेवलं असतं तर खूपच इतिहास उलगडला असता. सगळे पोटभर पाहून झाल्यावर वायनापिचूचीही नजरभेट झाली. तसे आम्ही सुदैवीच , कारण रोज दुपारी सनगेटवर हमखास जमा होणारे धुके व ढगांचा दाट पडदा आला नव्हता. त्यामुळे माचुपिचू शहरात उभे राहूनही सनगेट पाहता आले. वायनापिचूला फक्त सकाळी ७ ते १० पर्यंतच जाता येते व तिथून माचूपिचू व सनगेटकडे पाहता येते. रोज फक्त ४०० पर्यटकांनाच येथे येता येते, कारण वाईट हवामान, पाऊस या बरोबरच माचूपिचूला भेट देणा-या पर्यटकांमुळेही या अवशेषांचा -हास होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. २०११ पासून माचूपिचूला भेट देणा-यांची संख्याही २५०० ला मर्यादित केली आहे. १९८३ मध्ये या स्थानाचा समावेश ‘जागतिक वारसा’ मध्ये करण्यात आला आहे.
जितके पाहता आले ते सर्व पाहिले, पण एक प्रश्न अद्यापही मनात घर करून राहिला आहे……. जर इंकांना लेखन लिपी अवगत नव्हती, चक्र माहीत नव्हते, आजच्या सारखी कोणतीही आधुनिक अवजारे हाताशी नव्हती, तरी त्यांनी इतक्या अवघड ठिकाणी, इतक्या उंचावर हे शहर का व कसे बांधले असेल ? त्या मागचा हेतू नक्की काय ? कुठेही काहीही लिहिलेले नसल्याने आपण केवळ अंदाज बांधायचे. उत्तर कधीतरी सापडले तर सापडेलही. पण माचूपिचूच्या भेटीने ‘अद्वितीय’ म्हणजे काय असते ते समजले. २००८ मध्ये याचा समावेश जगातील सात आश्चर्यात केला गेला आहे. ५०० वर्षांपूर्वीच्या इतिहासात चक्कर मारून जिथून आत गेलो तिथूनच बाहेर पडलो.
कुझ्कोला परतलो तरी डोळ्य़ांपुढचे माचूपिचू हलत नव्हते….आजही नाही !! इन्कांच्या राजधानीत गेल्याचे समाधानच खूपशी माहिती सांगून गेले.
Dear madam,
Very nice information in proper wording.
Thank you.
Thanks Swapnil for the comment.