MENU
नवीन लेखन...

शिक्षणातील टर्निंग पॉइंट

अनेक मुलां-मुलींना शिक्षण सोडून पोटासाठी बालमजुरी, घरकाम, फुटकळ कामांकडे वळावे लागले. पर्यायाने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले. कडक निर्बंधांमुळे लग्नाचा खर्च कमी झाल्याने टाळेबंदीच्या काळात शाळकरी मुलींची लग्ने लावण्यात आली. यामुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील शैक्षणिक दरी अधिकच रुंदावली.

कोविड-19 महामारी या शतकातील सर्वांत मोठ्या आपत्तीने 2020 मध्ये जगभरातील मानवजातीवर आक्रमण केले. या आकस्मिक व अनपेक्षित संकटापासून बचाव करण्यासाठी एकीकडे त्यावरील उपचाराबद्दल अपुरे ज्ञान, अपुरी वैद्यकीय व्यवस्था आणि उपाययोजनांबद्दलचे अपुरे संशोधन अशी गोंधळाची परिस्थिती होती. मार्च 2020 पासून कोरोनाने जगभरातील लाखो जीवांचा अकाली बळी घेतला. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त, निराधार झाली. एकूण जनजीवन अनिश्चित, असुरक्षित झाले. मृत्यूच्या छायेत जीव मुठीत घेऊन दीर्घकाळ चाललेल्या लॉकडाऊनमध्ये कसेबसे एकेक दिवस ढकलण्याशिवाय लोकांना गत्यंतर उरले नाही. रोजच्या बातम्यांतून फक्त कोरोना संक्रमित रुग्णसंख्या आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या… हे सर्व सुन्न करणारे! प्रत्येकाच्याच मनामध्ये आपण कुणीही कुठल्याही क्षणी कोरोना संकटाचे बळी ठरू शकतो, या भीतीने कायम ठाण मांडलेले. अशा या परिस्थितीमध्ये कडक निर्बंध, टाळेबंदी, कर्फ्यू, लसीकरण या मार्गांनी कोरोनाशी मुकाबला करणे एकीकडे सुरू होते आणि दुसरीकडे नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालये, कार्यालये सर्वच व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले.

या साथीच्या काळात वरवर न दिसणारा गंभीर परिणाम झाला आहे तो शिक्षणावर. भारत जगातील दुसऱया क्रमांकाचा मोठा देश असून एकट्या भारतात 32 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर या कोरोनामुळे परिणाम झालेला आहे. लागोपाठ दोन वर्षे या पिढीतील 25 कोटी विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत.

मार्च 2020 मध्ये बंद झालेल्या शाळा व महाविद्यालये वगळता एव्हाना अन्य सर्व व्यवहार जवळपास सुरू झालेले आहेत. या दिवाळीनंतर शाळा सुरू होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता 4 ऑक्टोबरपासून अंशत: शाळा सुरू होतील. एकंदर गेले 19 महिने शाळांची दारे बंद आहेत. याच काळात फळा, खडू ऐवजी कॉम्प्युटर क्रीन, मोबाइल हातात धरून शिकणे-शिकवणे सुरू झाले. घरबसल्या ऑनलाइन शिक्षणाची ही व्यवस्था या काळात जरी स्वीकारली गेली तरी मुलांनी शाळेत जाऊन प्रत्यक्ष शिकण्याला हा सर्वस्वी पर्याय ठरत नाही, हे वास्तव या काळातील अनेक सर्वेक्षणांतून स्पष्ट झाले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. सामाजिक कौशल्यांचा विकास हा मानसिक, बौद्धिक विकासाइतकाच महत्त्वाचा आहे. 24 तास घरातच अडकून पडल्याने मुलांचा सर्वांगीण विकास साध्य करणे अवघड झाले. त्यांच्यात चिडचिड, नैराश्य निर्माण झाले. पालकही पूर्णवेळ घरीच असल्याने त्यांचे सतत मुलांवर लक्ष ठेवणे जाचक ठरू लागले.

पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची चिंता भेडसावते आहे. मुलांपाशी स्मार्ट फोन, लॅपटॉप, टॅब यांसारखी साधने नसणे, नेटवर्क नसणे यामुळे शिक्षण फारच थोड्या मुलांपर्यंत पोहोचू शकले. चाचपडत ऑनलाइन शिक्षण सुरू झाले खरे पण या शिक्षणासाठी ना शिक्षकांकडे पुरेसे तांत्रिक कौशल्य होते आणि ना विद्यार्थ्यांकडे. शाळा बंद झाल्याने 6 टक्के ग्रामीण कुटुंबातील व 25 टक्के शहरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना संगणकाच्या मदतीने शिक्षण घेता आले. ग्रामीण भागात फक्त 17 टक्के तर शहरी भागात 42 टक्केच कुटुंबाकडे इंटरनेट सुविधा होती.

‘शाळा बंद’च्या या कालावधीतील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्यायचा तर सतत येणाऱया उलटसुलट सूचना, निर्णय यामुळे अस्थिर व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

मार्च 2020 मध्ये दहावीच्या भूगोल विषयाच्या एका पेपरचा अपवाद वगळता दहावी, बारावीच्या परीक्षा पार पडल्या. मात्र शाळांतून घ्यावयाच्या वार्षिक परीक्षा न होताच सर्व विद्यार्थी वरच्या इयत्तेमध्ये गेले. त्यानंतर 2020-2021 हे पुढचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले; मात्र शाळा बंद राहिल्या आणि मार्च 2021 च्या दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अन्य शिक्षण मंडळांनी घेतला व त्यानंतर राज्य मंडळानेही घेतला. 11वी चे प्रवेश प्रामुख्याने गुणवत्तेनुसार होत असल्याने सर्व विषयांची एक सामायिक परीक्षा (CET) घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि ICSE किंवा CBSE सारख्या इतर शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित CET परीक्षा देणे अडचणीचे वाटल्याने मा. उच्च न्यायालयापुढे आलेल्या जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार CET रद्द ठरविण्यात आली. परीक्षा न घेताच मागील वर्षाच्या इयत्ता 9 वी व 11 वी च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संपादणूक व शाळास्तरावर केलेल्या श्रेणी, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांची 10वी, 12वी परीक्षेतील उत्तीर्णता ठरवण्यात आली. बोर्डाच्या निकालाची टक्केवारी 85 टक्क्यांवरून 98 टक्क्यांवर गेली. मात्र या गुणांची खात्री देता येणार नाही, ही जाणीव विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांनाच होती. एकीकडे कोरोना परिस्थितीमुळे शिकण्याची गुणवत्ता घसरली तरी दुसरीकडे विद्यार्थ्यांची गुणांची टक्केवारी मात्र वधारली. पुढील टप्प्यावरील शिक्षणासाठी आवश्यक अभ्यास पूर्ण न होताच वरच्या इयत्तेमध्ये गेल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया कच्चा राहिला. आधीच आपल्या देशातील शिक्षणाचे चित्र फारसे चांगले नाही. ‘असर’च्या सर्वेक्षणातून ते वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. इ. 3 री, 4 थी च्या विद्यार्थ्यांची क्षमता लेखन, वाचन, गणित यामध्ये इ. 1 ली च्या स्तरावर आहे.

आता कोरोना भयाने शाळा बंद राहिल्याने होणाऱया शैक्षणिक नुकसानामुळे त्यात मोठ्या प्रमाणात भर पडली. आधीच वंचित असलेल्या मुलांसाठी हा फटका खूप मोठा आहे. मध्यान्ह भोजनाची सोय सरकारी शाळांमध्ये असल्याने मुलांची उपस्थिती नियमित होत असे. आता मात्र शाळा नसल्याने त्यांची एक वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली. कामधंदा नसल्याने आईवडिलांसोबत अनेक मुले-मुली शाळा सोडून आपापल्या गावाकडे स्थलांतरित झाले. अनेक मुला-मुलींना शिक्षण सोडून पोटासाठी बालमजुरी, घरकाम, फुटकळ कामांकडे वळावे लागले. पर्यायाने ग्रामीण व शहरी भागांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले. कडक निर्बंधांमुळे लग्नाचा खर्च कमी झाल्याने टाळेबंदीच्या काळात शाळकरी मुलींची लग्ने लावण्यात आली. यामुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील शैक्षणिक दरी अधिकच रुंदावली. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणासाठी नेटवर्क नसणे, साहित्य साधने नसणे यातून शहरी व ग्रामीण ही दरीसुद्धा रुंदावली.

या काळात कौटुंबिक ताणतणाव, प्रियजनांचा मृत्यू, आर्थिक ओढाताण, शिकण्यासाठी साधनसुविधांचा अभाव यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध मानसिक समस्यांचे प्रमाण वाढले. त्यातून येणाऱया नैराश्यातून आत्महत्यांसारख्या दुर्दैवी घटना घडणे हे खरोखरीच दुःखदायक आहे. या परिस्थितीमध्ये मुलांना शिकण्यास मदत होण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ या मालिकेद्वारे ऑनलाइन शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले. ‘दीक्षा अॅप’ मधील निवडक पाठांचे प्रसारण केले. ‘टिली मिली’सारखा कार्यक्रम दूरदर्शनच्या माध्यमातून प्रसारित केला. मात्र हे दोन्ही उपक्रम घाईघाईने केलेल्या निर्मितीमुळे असेल कदाचित पण फारसे दर्जेदार नसल्याने अपेक्षित परिणामकारक ठरले नाहीत. याउलट अन्य राज्यांमध्ये कोरोनापूर्व काळात सातत्याने दूरदर्शनच्या शैक्षणिक वाहिन्या पूर्णवेळ शालेय अभ्यासक्रमावर आधारित कार्यक्रम देत होत्या. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात दूरदर्शनवरील अशा कार्यक्रमांमुळे त्या राज्यांतील मुलांना खूपच फायदा झाला. महाराष्ट्रात दुर्दैवाची गोष्ट ही की शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करणारी बालचित्रवाणी संस्था काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आली.

दहा वर्षांपूर्वी 2012 मध्ये माहिती व तंत्रज्ञान राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आले त्यानुसार शिक्षकांनी दैनंदिन अध्यापनात तंत्रज्ञानाची जोड देणे व शिकवताना विविध दृश्राव्य माध्यमांची जोड देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात या धोरणाची अंमलबजावणी करण्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्याचाच परिणाम म्हणून शिक्षक आणि विद्यार्थी अपेक्षेनुसार तंत्रसाक्षर झाले नाहीत आणि आवश्यक तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यात मागे राहिले. कोरोना महामारी संकटकाळात गरजेपोटी नाइलाजाने या माहिती-तंत्रज्ञानाला शरण जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये दिल्यानुसार आगामी काळातील शालेय शिक्षण हे तंत्रज्ञान आधारित असणार आहे यापुढे वर्ग अध्यापनात खडू-फळा याच्या जोडीने डिजिटल शिक्षणाची जोड दिली जाणार आहे आणि पुस्तकाबाहेरील माहिती, उदाहरणे, संदर्भ, चित्रफिती, सहजपणे पडद्यावर पाहून शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे आकलन अधिक प्रभावी व परिणामकारक ठरेल ऑनलाइन व दूरस्थ शिक्षण पद्धतीचा उपयोग उच्च शिक्षण या प्रमाणे शालेय शिक्षणामध्ये केला जाईल संकट काळात या निमित्ताने ऑनलाइन शिक्षण स्वीकारले गेले ही एक जमेची बाजू म्हणायला हवी.

आकस्मिकपणे उद्भवलेल्या या परिस्थितीमध्ये विद्यार्थी-शिक्षक यांना ऑनलाइनवर शिकणे-शिकवणे यासाठी खूपच संघर्ष करावा लागला. याचे मुख्य कारण तांत्रिक कौशल्यांचा अभाव. मात्र चाचपडत अन्य सहकाऱयांची मदत घेत का होईना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ऑनलाइन वर्ग घेऊ लागले. ऑनलाइन शिक्षण बऱयाचदा नीरस, कंटाळवाणे ठरले. कारण शिक्षक नेहमीच्या पद्धतीने पाठाचे वाचन करून गृहपाठ देत राहिले. ऑनलाइन शिक्षणाचे प्रश्न फारच वेगळे. वर्गात मुलं समोर… ज्यांच्यात हसत खेळत शिकणं, संवाद होई. ऑनलाइन बहुतेक वेळा एकतर्फी. शिकणाऱया मुलांची ऑनलाईन वर्गातील हजेरी अलीकडे वीस-पंचवीस टक्क्यांवर येऊन ठेपलेली. याशिवाय शहरी किंवा ग्रामीण भागातील वंचित घटकातील तळागाळातील मुलांकडे लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाइल, टॅब ही साधने नाहीत. नेटवर्क आणि खंडित वीज पुरवठा या समस्या वेगळ्याच. एकंदर या दीड वर्षात मुलं किती शिकली, मागच्या इयत्तेतील कितीसं स्मरणात राहिलं, या प्रश्नांची उत्तरे सर्वेक्षणातून समोर आली.

25 ते 30% मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोचले. याशिवाय या ऑनलाइन शिक्षणामध्ये इतरही अनेक अडचणींतून मार्ग शोधावे लागत होते. 24 तास मुलं घरी पालकांबरोबर असल्याने सतत पालकांकडून प्रत्येक बाबतीत शिस्त लावणं, रागावणं, तसंच बाहेर जायला खेळायला बंदी असल्याने शाळा व शाळेनंतर शिकवणी वर्ग ऑनलाइन यामुळे तासन्तास क्रीनसमोर बसून राहिल्याने कंटाळलेली. त्यातून नैराश्य, चंचलता, चिडचिड यांसारख्या वरवर न दिसणाऱया मानसिक, भावनिक समस्या. बऱयाच शिक्षकांच्या दृष्टीने हा काळ खूप कठीण आणि आव्हानात्मक ठरला. ऑनलाइन पाठ घेण्यासाठी भरपूर पूर्वतयारी करावी लागली. पीपीटी बनवणे, लिंक शोधणे, तांत्रिक बाबींची जुळणी करणे, मोबाइलवरून गृहपाठ देणे, तो तपासून देणे यासाठी नवीन तंत्रांशी/पद्धतींशी जुळवून घेणे तसेच शाळेच्या ऑनलाइन सभा, प्रशिक्षणे, इतरांकडून नवनवीन पद्धतींची माहिती घेणे, कौशल्ये शिकून घेणे, यातून शिक्षकांची दमछाक होत राहिली. महिला शिक्षिकांना प्रापंचिक जबाबदाऱयांच्या जोडीने हे सारे करावे लागत असल्याने त्यांच्यावरील ताण अधिकच वाढला. पालकांसाठी हा कोरोना काळ अधिक तणावपूर्ण ठरला. एकीकडे ऑफिसचे काम घरून करीत असताना मुले ऑनलाइन वर्गात नीटपणे शिकत आहेत किंवा कसे यावर लक्ष ठेवणे, त्यासाठी योग्य वातावरण राखणे, मुलांना मदत करणे, त्याच जोडीला धुणीभांडी, केरवारा करणाऱया कामवाल्यांशिवाय घरातील ही अधिकची कामे करावी लागणे, हे सारे विशेष करून महिलावर्गाला दमविणारे ठरले. मात्र बहुतेक कुटुंबांतील सदस्यांनी जबाबदारीने शक्य तितका आपला सहभाग या कामामध्ये उचलला, हेसुद्धा दिलासा देणारे.

तथापि या काळामध्ये अनेक उपक्रमशील शिक्षकांनी मुलांनी शिकत राहावं यासाठी उत्साहाने प्रयोग केले. स्वयंस्फूर्तीने विविध विषयांच्या घटकांवर स्वत:चे पाठ तयार केले. इतर शिक्षकांना त्याचा उपयोग करता आला. अनेक वॉट्सअॅप ग्रुपवरून सातत्याने विविध माहिती, महत्त्वाच्या संकल्पना, संबोध यांचे परस्परांशी शेअरिंग सुरू झाले. एरवी आपापल्या शाळेच्या चौकटीत राहून शिकवणाऱया शिक्षकांचे क्षितिज एकाएकी विस्तारले. शेकडो शिक्षक एकमेकांच्या संपर्कात आले. तांत्रिक बाबी, संदर्भ साहित्य निवड करणे इत्यादी एकमेकांकडून अप्रत्यक्षपणे शिकणं सुरू झालं.

शहरातीलच नाही तर अतिशय दुर्गम भागातील शिक्षकांनीही ज्ञानदानाचे व्रत अविरत ठेवण्यासाठी जी धडपड केली ती कौतुकास्पद आहेच. मेधा कुळकर्णी यांनी लेखात दिलेली ही काही उदाहरणे पाहिली की याची प्रचिती येते.

कोविडच्या स्थितीतही विद्यार्थ्यांनी शिकत राहावं, यासाठी शिक्षकांनी नवनव्या पद्धती शोधल्या, अडचणींतून वाट काढली, शक्य तिथे तंत्रज्ञानाची मदत घेतली, ते शक्य नव्हतं तिथेही डिजिटल विषमतेवर मात करण्यासाठी कल्पना लढवल्या, धोके पत्करले, कधी स्वखर्चाने, कधी लोकांकडून मदत गोळा करून विद्यार्थ्यांना सुविधा पुरवल्या. अशा किमान दोन-तीन हजार शिक्षकांनी विषयमित्र, शिक्षकमित्र अशी नावे देऊन गावातल्या जाणत्या व्यक्ती, विद्यार्थ्यांची मोठी भावंडे, नोकरीधंदा गमावल्याने शहरांतून गावांत परतलेले तरूण यांना मुलांचं मित्रत्व स्वीकारायला लावलं, शिकवण्यात, त्यांचा अभ्यास घेण्यात, मुलांवर लक्ष ठेवण्यात गुंतवलं. शाळा बंद झाल्या तेव्हा सर्वाधिक भीती होती मुलं शाळाबाह्य होण्याची. विशेषत गरीब मुलंमुली शाळेपासून तुटतील आणि त्यांची शाळा सुटेल. जिल्हा परिषदच्या अनेक शिक्षकांनी हेच रोखण्यासाठी जिवाचे रान केले, हे पुढील काही उदाहरणांवरून दिसून येईल.

तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार. सातपुड्याच्या कुशीत  पावरा समाजाची वस्ती असलेली गावं. ना इंटरनेट, ना स्मार्टफोन, ना साध्या मोबाइल फोनवरून बोलायला गावात रेंज. एकमेव पर्याय, अभ्यासक्रमाचे कागद मुलांच्या हाती देणं. रूपेशकुमार नागलगावे सरांनी झेरॉक्स प्रती किराणा दुकानात ठेवणं. सामानासाठी गेल्यावर पालकांनी त्या उचलणं. आठवड्यातून एकदा सरांनी मार्गदर्शनासाठी जाणं. झेरॉक्सच्या देवाणघेवाणीचे निरोप देण्यासाठी फोन करायचा तरी डोंगरावर चढून रेंज शोधायची. उमराणीखुर्द, उमराणीबुद्रुक, काल्लेखेत शाळांत चार-पाच किलोमीटरवरील गावातूनही मुलं येतात. पटसंख्या 168. शारीरिक अंतर राखून घरांच्या ओट्यावर बसून गटागटाने मुलं अभ्यास करतात. शिक्षकांची अभ्यासओट्यावर फेरी असतेच. ‘उलगुलान ओटलू’- म्हणजे (शिक्षणाच्या) क्रांतीचा ओटा हा मंत्र आहे. मे महिन्यात आढळलं की, सात-आठ मुलं कुठल्याही गटात नाहीत.  लॉकडाऊनमध्ये गुराखी नसल्याने ही मुलं गुरं चारायला डोंगरात जात होती. मग चार शिक्षकांनी गुंडाळी फळे, खडू, पुस्तक घेऊन डोंगर गाठला. सातपुड्यातील चौथी रांग. टेकडीवर पोचताच शिक्षकांनी शिट्टी वाजवायची. आवाज डोंगरादऱयांत घुमायचा. मुलगा त्या झाडाखाली आल्यावर फळा लटकवून वर्ग सुरू.

कोविडकाळ सुरू झाला तेव्हा, धुळे जिह्यातल्या अंचाडेतांडा शाळेतली लेकरं गावात आणि तो ऊसतोडणीचा मोसम असल्याने त्यासाठी गेलेले त्यांचे आई-बाप गुजरातेत अडकलेले. मुख्याध्यापिका अरूणा पवार यांनी घरोघर जाऊन अन्नधान्य, तेल-मीठ-मसाला, औषधं हे सारं मुलांना आणि आजी-आजोबांना पुरवलं. कोविडचा धोका पत्करून त्या संपूर्ण तांड्यावर हिंडल्या. गुजरातेत अडकलेले पालक आणि मुलं- आजी-आजोबा यांचे बोलणं फोन/व्हिडिओ कॉलवर करून दिलं. चार-चार विद्यार्थी गटागटाने अंतरा-अंतरावर घरांच्या ओट्यावर बसवत शाळा सुरू केली. शिक्षकांची ही धडपड पूर्ण गावाने पाहिली. त्याचाच परिणाम असा की, यावर्षी एकाही पालकाने दिवाळीनंतर मुलांना ऊसतोडणीला सोबत नेलं नाही. मुलं गावातच घरी थांबून अभ्यास करत आहेत. पालकांनी इतका विश्वास शिक्षकांवर टाकून शिक्षकांच्या कामाची पावतीच दिली.

तुलनेने, कराड हे सुस्थितीतल्या पालकांचं गाव. 12 जूनला कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 (अर्जुन कोळी हे मुख्याध्यापक) टिव्हीवर सुरू झाली. केबल चॅनल-फीचा पहिल्या दोन महिन्यांचा खर्च शाळाव्यवस्थापन समितीसदस्यांनी आणि त्यानंतरचा पालक उचलत आहेत. शाळेच्या इमारतीत थाटलेल्या तात्पुरत्या स्टुडिओत केबलवाल्यांच्या मदतीने चित्रीकरण केलं जातं. शाळेच्या 2,561 विद्यार्थ्यांसाठी हा खटाटोप. पण हे केबल नेटवर्क कराड आणि पाटण तालुक्यात जिथे जिथे पोचलंय, तिथल्या सगळ्याच मुलांना, ते शाळा क्र 3 चे विद्यार्थी नसूनही, या वर्गांचा लाभ मिळतोय. असे सुमारे 50 हजार विद्यार्थी आहेत. खरंच, शिक्षणाने शाळेच्या भिंती ओलांडल्या, असं शब्दश घडलंय इथे.

याच काळात गणिताचे शिक्षक शमशुद्दीन आत्तार (शिरगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग) यांची गणित अध्यापनाची ऑनलाइन सत्रं इतकी विद्यार्थीप्रिय झाली की, दिवसभर ते झूमद्वारे वेगवेगळ्या वर्गांचे तास घेण्यात गुंतलेले आहेत. त्यांच्या शाळेतल्या आठवी-नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना ते शिकवतातच. पुणे, सांगली, सावंतवाडी इथले विद्यार्थीही सरांच्या ऑनलाईन वर्गात हजेरी लावतात. ‘सोप्पं गणित’ही त्यांनी सुरू केलेली चळवळ आधीचीच आहे. पण कोविडकाळात चळवळ आणखी बहरली. इंटरनेट आणि कॉम्प्युटर तंत्रज्ञानाची भुरळ पडल्याने त्याचा वापर करून गणित सोप्या पद्धतीने, खडू-फळ्याशिवाय शिकवण्याचे, मुलांना गणितात रमवण्याचे प्रयोग करत त्यांनी एक क्रांतीच घडवली आहे. आत्तार सर दररोज 10 प्रश्नांचा गुगल फॉर्म विद्यार्थ्यांना पाठवतात. त्याची उत्तरं मुलांनी सोडवली की त्यांना किती गुण पडले ते कळवतात. ते सांगतात, “गाव दुर्गम. पालकांची स्थिती बेतासबात. पण मुलांची शिकण्याची जिद्द वाखाणण्याजोगी. गावात नेटवर्क नाही तर, इंटरनेटच्या रेंजसाठी आमचे विद्यार्थी डोंगरावर तात्पुरत्या झोपड्या बांधून अभ्यासासाठी तिथं येत आहेत. हे पाहिलं की, माझी जिद्द आणखी वाढते. तंत्रज्ञान आणि चांगल्यात-चांगलं शिक्षण आमच्या खेड्यापाड्यातल्या मुलांपर्यंतदेखील पोचवायलाच हवं, म्हणून मी आणखी जोमाने कामाला लागतो.”

सरकारी म्हणजे काहीतरी हिणकस असं समजणाऱयांनी कोविडकडून जरूर धडा शिकावा. सरकारी काम फक्त मंत्रालयातल्या आदेशाबरहुकूम चालतं, हा ग्रह बरोबर नाही. इथेही मोकळीक मिळते. अन्यथा, ही शिक्षकमंडळी इतके प्रयोग करूच शकली नसती. शाळेच्या तालुका-जिह्यातल्या स्थानिक स्थितीला, भिन्नतेला अनुरूप असे निर्णय शिक्षक-मुख्याध्यापकांनी कोविडकाळात क्षणोक्षणी घेतले. चेंबूरपेक्षा जालन्यातल्या तांड्यावर वेगळी रीत, तांड्यापेक्षा आदिवासी मुलांसाठी निराळी, त्याहून अलग कोकणात असं घडलं. बजेट, फाइल इकडून तिकडे पोचण्यातला वेळ, मंजुरी वगैरे  काहीच आड आलं नाही. जिल्हा परिषद शाळा आणि तिथले शिक्षक यांच्याबद्दल, त्यांच्या दिसण्या-बोलण्यापासून पेहरावापर्यंतची दूषित मतं संबंधितांनी त्वरेने दुरुस्त करून घ्यावीत. त्यांच्या त्याच दिसण्या-बोलण्यातून त्यांनी मुलांशी गहिरं नातं जोडलंय. या काळातल्या कित्येक प्रयोगांना राज्य, देश आणि जगाच्या पातळीवर  वाखाणलं गेलंय.  याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांत अधिक मुलं येण्यात होत आहे.  प्रथम फाउंडेशनचा 2020 सालाचा असर (ASER – Annual status of education report 2020) अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यातही याला दुजोरा देणारी निरीक्षणं मांडलीयेत.

इंटरनेट-स्मार्टफोन-ऑनलाइनच्या जमान्यात शहरवासीयांना जुनी वाटली तरी ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक, फिल्म्स, प्रोजेक्टर अशी साधनंही किती उपयोगाची आहेत, हे कोविडकाळाने अधोरेखित केलं. अनेक गावांनी देवळातला ध्वनिक्षेपक, भोंगा गावातल्या मुलांना शिकण्यासाठी उपलब्ध केलाय. भोंगाशाळा असंच नाव पडलंय या शिकण्याला.  प्रथम संस्थेची निर्मिती असलेल्या ‘शाळाबाहेरची शाळा’ हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरवरून प्रसारित होतोय. 40 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचणारा हा कार्यक्रम अनेक गावांत भोंग्यावरून ऐकवला जातोय.

अहमदनगर जिह्यातील हिरवेबाजार येथील पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल. स्थानिकांच्या सहकार्यामुळे यशवंत माध्यमिक विद्यालय ही जिल्हा परिषदेची शाळा 15 जूनला सुरू करण्यात आली. त्या आधी गावात करोनाचे सावट होते. कित्येक रुग्ण अत्यवस्थ होते. पण गावकऱयांनी एकजुटीने प्रयत्न करून गाव कोरोनामुक्त केले आणि मुलांच्या भवितव्याचा विचार करून शाळा सुरू करण्यासाठी कंबर कसली. त्यामुळे मुलांचे शिक्षण सुरळीत सुरू राहिले.

ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा असल्या तरी त्यामुळे काही सकारात्मक बदल नक्कीच झाले आहेत. शिक्षक तंत्रस्नेही झाले आहेत. पालकांचा मुलांच्या शिक्षणातील सहभाग वाढला आहे. मोबाइल, लॅपटॉप यांच्या मदतीने गेमव्यतिरिक्त शालेय शिक्षण, तसेच अमर्याद ज्ञान विद्यार्थ्यांसमोर खुले झाले आहे. त्याचा सकारात्मक वापर करून विद्यार्थ्यांना क्षमता विकास साधता येईल.

देशातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींबाबत बरीच उलटसुलट चर्चा झाली, त्यात सुधारणा झाल्या. हे आक्षेपार्ह नाहीच; परंतु देशाचे भवितव्य उज्ज्वल करणारी सक्षम पिढी घडविणारी शिक्षण व्यवस्था मात्र या काळात दुर्लक्षित राहिली, हे खरे.

आता शाळा सुरू होताना अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे जवळजवळ दोन वर्षांच्या अभ्यासाची तूट कशी भरून काढता येईल याचे नियोजन जसे आवश्यक तसेच ठळक संबोध संकल्पनांची उजळणी करून घेणे हे महत्त्वाचे ठरेल कारण आधीच्या इयत्तांच्या अभ्यासाचा पाया कच्चा राहिला असेल तर पुढचे समजणे विद्यार्थ्यांना नक्कीच अवघड जाईल चाचण्या वार्षिक परीक्षा दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा यासाठी अभ्यासक्रम परीक्षा पद्धतीचे स्वरूप याबाबत तत्परतेने निर्णय घ्यावे लागणार आहेत जेणेकरून ऐनवेळी गोंधळाची परिस्थिती उद्भवणार नाही. खेरीज शिक्षण विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून शाळांनी प्रतिबंधात्मक व सुरक्षिततेच्या उपाय योजनांची योग्य अंमलबजावणी करणे याला प्राधान्य द्यायला हवे.

मोठ्या गॅपनंतर शाळा सुरू होताना मुलांना काही दिवस तरी शाळेत येण्याचा, सवंगड्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा आनंद व मोकळीक मिळायला हवी. त्यांनाही नवीन वातावरणात रुळण्यासाठी थोडा अवधी द्यायला हवा. लगोलग अभ्यास, चाचण्या, परीक्षांचा ससेमिरा त्यांच्या मागे लावणे उचित होणार नाही. कोरोनाच्या भयसंकटातून मुक्त व्हायला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तोवर कोरोनाच्या बातम्या माध्यमातून येतच राहतील. पण त्यामुळे न डगमगता शाळा सुरू राहतील यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना आश्वासक वाटेल अशी ठाम भूमिका शिक्षकांनी, शाळांनी व प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

— डॉ. बसंती रॉय 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..