नवीन लेखन...

आ लौट के आजा मेरे मित..

१९५७ साली मुंबईत घडलेली ही गोष्ट आहे. आई वडील व मुलगा असं तिघांचं छोटं कुटुंब. वडील हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन करणारे प्रख्यात कवी. एके दिवशी सकाळीच बापलेकात किरकोळ कारणावरून वाद झाले. मुलगा संवेदनशील असल्याने तो घरातून निघून गेला. आई-वडिलांना वाटलं, डोकं शांत झाल्यावर येईल घरी संध्याकाळी. एक दिवस गेला, आठवडा गेला, महिना व्हायला आला. बापाला काही सुचेनासे झाले. कशातही त्यांचं मन रमेना. वर्तमानपत्रामधून, रेडिओ वरुन, पोस्टर लावून मुलाचा शोध घेतला, पण निराशाच पदरी पडली. अशातच एक चित्रपट निर्माता त्याच्या घरी आला व गीते लिहून देण्याबद्दल आग्रह करु लागला. वडील मुलाच्या विरहाने कासावीस झाले होते, त्यांनी निर्मात्याला निघून जायला सांगितले. तेवढ्यात त्यांची पत्नी तिथे आली व तिने निर्मात्यास दुसरे दिवशी पुन्हा येण्यास सांगितले.

पत्नीने कवीला समजावून सांगितले की, मुलाच्या विरहाच्या आठवणीसाठी का होईना, तुम्ही ही गीतं लिहाच. त्यांना ते पटलं आणि दुसरे दिवशी त्या निर्मात्याचे काम स्वीकारुन गीत लिहिण्यासाठी कवीने पेन उचलले. ‘जरा सामने तो आओ छलिये..’ चित्रपट होता ‘जनम जनम के फेरे’. या गीतातून त्यांनी आपल्या मुलास घरी परत येण्यासाठी साद घातली, जी ऐकून तो घरी परत येईल अशी त्यांची ठाम समजूत होती. परंतु तो काही आला नाही. या गीतानं मात्र ‘बिनाका गीतमाला’मध्ये त्या वर्षीचा पहिला क्रमांक पटकावला. ते गीतकार होते, पंडित भरत व्यास! दरम्यान दोन वर्षे निघून गेली, मात्र घरातून निघून गेलेला मुलगा काही परत आला नाही. १९५९ साली ‘रानी रुपमती’ चित्रपटासाठी भरतजींनी गीत लिहिले, ‘आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते है…’ या गीतातील शब्दांमध्ये आर्त वेदना होती, तळमळ होती… या गीताने पंडित भरत व्यास यांचा मुलगा परत आला. सरस्वतीची कृपा व शब्दातील सामर्थ्याने परमेश्वराने त्यांचे गाऱ्हाणे ऐकले.

बिकानेर मधील चुरु या गावी १९१८ साली पंडित भरत व्यास यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिवदत्त व्यास हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. शिवाय ते गावात वैद्यकीही करायचे. पहिल्या महायुद्धानंतर प्लेगची साथ आली. काखेत गाठ आल्यावर माणसं पटापट मरु लागली. त्यांनी गावकऱ्यांवर उपचार केले. त्या साथीतच त्यांचाही मृत्यू झाला. काही वर्षांनंतर भरत यांची आईदेखील गेली. आजोबांनी या तीन भावंडांना सांभाळले. काकांनी भरतला इंग्रजी शाळेत घातले.

राजस्थानमधील वाळवंटात तारुण्यात पदार्पण केलेल्या भरतच्या मनात काव्याची हिरवळ फुलत होती. उच्च शिक्षणासाठी काकांनी त्यांना कोलकत्ताला पाठविले. तिथे भरतचा सांस्कृतिक विकास झाला. त्याचा एक काव्यसंग्रही प्रकाशित झाला. त्याने काही नाटकंही लिहिली.

बी. काॅम.चं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईस आला. १९४३ साली पहिला चित्रपट मिळाला, त्यांचं नाव होतं ‘दुहाई’. या चित्रपटात शांता आपटे नायिका होत्या. दरम्यान त्यांची गीतं असलेले काही चित्रपट प्रदर्शित झाले, मात्र भरतजींना प्रकाशझोतात आणलं, व्ही. शांताराम यांनी! ‘तुफान और दिया’ चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केले. इथंच त्यांचे संगीतकार वसंत देसाई यांच्याशी छान सूर जुळले. या चित्रपटातील सर्व गाणी गाजली.

त्यानंतर ‘दो आंखे बारह हाथ’ चित्रपट प्रदर्शित झाला. यातील ‘ए मालिका तेरे बंदे हम..’ हे गाणे आजही कित्येक शाळांमधून प्रार्थना म्हणून म्हटले जाते. ‘सैया झुठों का बडा सरताज निकला…’ हे संध्याच्या तोंडी असलेलं नटखट गाणं पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटणारं आहे.

व्ही. शांताराम यांनी ‘नवरंग’ हा चित्रपट कविराजच्या जीवनावर निर्माण केला. त्यातील नवरसावर आधारित असलेली सर्व गाणी व्ही. शांताराम यांच्या कल्पकतेची सर्वोत्तम उदाहरणं आहेत. प्रत्येक गीताचं लेखन, संगीत, छायाचित्रण, कलादिग्दर्शन, अभिनय, रंगभूषा, वेशभूषा या सर्वांचं उत्तम सादरीकरण म्हणजेच ‘नवरंग’! व्ही. शांताराम यांच्याच ‘स्त्री’ चित्रपटासाठी गीतं लिहिल्यानंतरचं ‘बूंद जो बन गये मोती’ या चित्रपटातील ‘ये कौन चित्रकार है…’ हे अप्रतिम गीत भरत व्यासांचच आहे. बापूंची ‘चानी’ (हिंदी) या आठव्या चित्रपटापर्यंतची सर्व गीतं भरत व्यास यांचीच आहेत.

‘गूंज उठी शहनाई’ मधील भरतजींची सर्व गाणी श्रवणीय आहेत. संगीतकार एस. एन. त्रिपाठी यांच्या सर्वाधिक चित्रपटातील गाणी भरतजींचीच असायची. धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक अशी सर्व प्रकारची गीतं त्यांनी लिहिली. साधी सोपी शब्दरचना हे त्यांच्या गीतांचं वैशिष्ट्य होतं. मराठीमध्ये ‘गदिमां’नी जशी प्रासादिक गीतं लिहिली, तशीच भरतजींनी हिंदीमध्ये एकूण अकराशेहून अधिक अप्रतिम गीतं लिहिली.

‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटातील ‘ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो…’ हे अप्रतिम गीत ऐकताना भरत व्यास यांचं हिंदी भाषेवरील प्रभुत्व जाणवतं. असे शब्दांचे जादूगार शतकातून एखादेच जन्माला येतात आणि त्यांच्या काव्य प्रतिभेनं ते शतकानुशतकं रसिकांच्या हृदयात राहतात….

– सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..