नवीन लेखन...

आभास (दिर्घ कथा)

अजयची बस रामगड थांब्यावर पोचली तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते. रामगड हे एक छोटे तालुक्याचे गाव होते. दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने आता थोडी विश्रांती घेतली होती. मात्र वातावरण कुंद होते व हवेत प्रचंड गारठा आला होता. बसच्या दिवसभराच्या प्रवासाने अजय खूप वैतागला होता. त्याने  भल्या पहाटे मुंबईला शासनाची बस पकडली होती. कोकणात येणारे रस्ते वळणा वळणांचे त्यातच पावसाची भर त्यामुळे रामगडला थांब्यावर संध्याकाळी ६ वाजता येणारी बस आज एक तासापेक्षा ज्यास्त उशिरानी पोचली होती. अजयला रामवाडी या छोट्या गावात जायचे होते तिथे अजून गाडी जात नव्हती. कारण गावात जायला अजून नीट गाडी रस्ता नव्हता. जंगलातून जाणारी खडकाळ बिकट वाट. रामगड या छोट्या तालुक्याच्या बस थांब्यावर  उतरून साधारण ७ मैल जंगल तुडवल्यावर एका ओढा लागे. या ओढ्याच्या पलीकडे रामवाडी हे छोटेसे गाव होते. ओढ्यावर गावात जाण्यासाठी साकव (लाकडी पूल) बांधला होता. रामवाडीत अजयचे दूरचे मामा राहायचे. बसमधून उतरताच अजयला थोडे आश्चर्य वाटले. कारण त्याला गावात नेण्यासाठी त्याच्या मामांकडून कोणीच आलेले दिसत नव्हते. असे कधी झाले नव्हते. आपण आज येणार हे अजयने कळवले होते. अजयचे मामा रामवाडीचे बडे प्रस्थ होते. यापूर्वी अजय जेव्हा जेव्हा गावी आला होता तेव्हा मामांच्या घरचा कोणीतरी गडी त्याला न्यायला यायचा. अजयने विचार केला की पावसामुळे आपल्याला न्यायला येणारा गडी कुठेतरी अडकला असावा. थोडावेळ वाट पहावी म्हणून तो बस थांब्यावरच्या झोपडी वजा  हॉटेल मधे शिरला. हॉटेल मध्ये थोडी गिऱ्हायाकांची वर्दळ होती. कढइत भजी तळली जात होती. त्याचा वास त्या पावसाळी वातावरणात लोकांची भूक चाळवत होता. हॉटेल मधे बसची वाट बघत बसणारे लोकं भज्यांवर ताव मारीत होते. अजयला भूक लागली होतीच. त्याने पण गरम भाजी व चहा याचा आस्वाद घेतला. आता त्याला जरा बरे वाटले. त्याने घड्याळात पाहिले सात वाजून पस्तीस मिनिटे झाली होती.आता चांगलाच अंधार झाला होता. स्ट्रीट लाईट लागले होते. पाऊस थांबला असला तरी वारे सुटले होते. त्याला आठवलं की पावसात ओढ्याला पूर येई तेव्हा कधी कधी साकवावरून पण पाणी जाई अशावेळी साकव ओलांडणे धोक्याचे असे. त्यामुळे हॉटेल मालकाकडे चौकशी करावी असे त्याने ठरवले आणि त्याने मालकाला विचारले “ मालक, मला रामवाडीला जायचंय, ओढ्याला पूर नाही ना आलेला ? “

अजयच्या प्रश्नावर त्याने विचित्र नजरेने अजयकडे बघितले व म्हणाला “ अहो पाव्हणे एवढ्या रात्रीचे तुम्ही त्या जंगलातून जाणार ? माझे ऐका आता रात्र इथेच काढा दिवस उजाडल्यावर जा रामवाडीत. सकाळी गावात जायला सोबत पण मिळेल खूप लांबचा रस्ता आहे तुम्हाला झेपणार नाही”

“अहो मला माहिती आहे त्या गावाची. पण आज बर्याच वर्षांनी येतोय एवढंच, तुम्ही फक्त सांगा की पूर नाही ना आलाय ओढ्याला ? साकवावरून पाणी जात नाहीये ना ?” अजयने विचारले.

“ अहो पावसाचे दिवसच आहेत ओढ्याला थोड पाणी ज्यास्त आहे पण पूर नाहीये आलेला. वाहतूक आहे चालू साकवा वरून पण तुम्ही इथले दिसत नाही म्हणून सांगतो एवढ्या रात्रीच्या वेळी त्या गावात एकटे जाऊ नका. तो ओढा आणि त्यावर गावात जाण्यासाठी असलेला साकव आठवतो का तुम्हाला ? मालकाने विचारले.

“हो सर्व आठवते खूप निसर्ग रम्य आहे तो ओढा आणि त्यावरचा साकव. आम्ही लहानपणी खूप पोहायचो त्या ओढ्यात. खूप मजा येई त्या ओढ्याच्या संथ व खोल पाण्यात पोहताना. शिवाय साकवावरून ओढ्याच दृश्य व आजू बाजूचा सर्व परिसर किती छान दिसायचा.” अजय जुन्या आठवणीत रममाण होत म्हणाला.

“अहो तुम्ही किती वर्षांनी येताय गावात ? तो ओढा  आणि त्यावरचा तो साकव आता झपाटलेली जागा झालीय. एका पोटुशा बाईने साकवावरून उडी मारली ओढ्यात आणि जीव दिलाय, साकवाजवळ तिचा आत्मा भटकतो आहे सूड घेण्यासाठी. ओढ्यातील त्या साकवाजवळ अनेक तरुणांना खूप विचित्र व भयानक अनुभव आलेत. काही जणांनी आपले प्राण पण गमावलेत म्हणून म्हणतो तुम्ही तुमचा जीव नका घालू धोक्यात उद्या सकाळी निघा” मालक अजयला आग्रह करत म्हणाला.

“हे पहा माझा नाही असल्या गोष्टींवर विश्वास मला फक्त ओढ्याला पूर नाही ना आलाय एवढीच माहिती पाहिजे होती तुम्ही नका काळजी करू मी जाईन बरोबर गावात.” अजय म्हणाला

“ ठीक आहे, शहरातली माणसे तुम्ही तुम्हाला नाही पटायचे.  मी तुम्हाला सावध करायचे काम केले. बाकी तुमची इच्छा” मालक म्हणाला हॉटेल मधल्या इतर माणसांनी पण त्याला दुजोरा दिला. पण अजय आपल्या मतावर ठाम होता. तो अजून ज्यास्त काही वाद न घालता  हॉटेल मधून बाहेर आला. आता परत पाऊस सुरु झाला होता. अजयने पाठीला सैक अडकवली व  रेन कोट चढवला आणि तो रामवाडीच्या रस्त्याला लागला. त्याला गावचा  रस्ता माहित होता, थोडावेळ गाडी रस्ता तुडवल्यावर एक छोटी पायवाट लागली त्या वाटेने तो जंगलात शिरला. पावसामुळे सगळी कडे चिखलाचे साम्राज्य होते, पाण्याचे ओहोळ वाहत होते. डोंगरमाथ्यावरून येणारे पावसाचे पाणी छोट्या छोट्या धबधब्यातून कोसळत होते. पाउस खूप जोरात नसला तरी अधून मधून विजा कडाडत होता त्याने आसमंत प्रकाशून जात  होता. जोरात वाहणारे वारे वातावरणात गारठा वाढवीत होते. निर्मनुष्य रस्ता, रातकिड्यांची किर किर, झाडांची सळसळ आणि बेडकांचे ओरडणे यामुळे वातावरणात एक अनामिक गूढता जाणवत होती. त्यातच पावसाळ्यात  सरपटणारया जीवाणूंची पण भीती  होतीच. अजय अजूनही मगाशी हॉटेल मालकाशी झालेल्या बोलण्याचा विचार करीत होता. आज तो जवळ जवळ दोन वर्षानंतर गावाला येत होता. त्याच्या डोळयासमोर जुन्या आठवणी उभ्या राहत होत्या. रामवाडी, गावाजवळून खळाळून वाहणारा ओढा,त्यामधून खळाळत वाहणारे पाणी, त्यावरून गावात जाणारा तो साकव, तिथून दिसणारा  त्याच्या आजूबाजूचा रम्य परिसर, सर्वांची आठवण येऊन जुन्या आठवणीत तो थोडावेळ हरवून गेला. याच गावात त्याला त्याच्या आयुष्यातील पाहिलं वहिलं प्रेम मिळाल होत.  तारुण्यातील प्रेमाचा कैफ धुंदी त्याने खूप अनुभवली होती. लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. पण म्हणतात ना नियतीच्या मनात काही वेगळंच असत. त्याच्या पुढे कोणाचाच काही चालत नाही. त्याची प्रेमिका त्याच्या पासून खूप दूर निघुन गेली होती त्याच्यावर रागावून गैरसमज मनात ठेऊन. तिचा गैरसमज आपणाला दूर करता आला नाही याची त्याला खंत वाटत होती. आज तिच्या आठवणीन त्याच मन उदास झालं होतं, आता आपली तिची भेट होणार नाही ही कल्पनाच त्याच्या मनाला त्रास देत होती. जड अंतःकरणाने तो त्या जंगलातील ती एकाकी वाट तुडवत होता. त्या जंगलातून चालणे काही सोपे नव्हते. तो काही त्याच्या सवईचा रस्ता नव्हता. एवढेच नव्हे तर वाट चुकली तर विचारायला पण कोणी भेटणार नव्हते.थोडावेळ सरळ सोट पायवाट तुडवल्यावर डोंगर उताराची वळणा वळणाची घसरणीची वाट लागली.ह्या वाटेवर मोठ मोठे दगड होते. डोंगरावरून वाहणारे पाणी त्या उतारावरून वाहत होते. पावसामुळे दगडांवर शेवाळे धरले होते. खूप जपून पाय टाकावे लागत होते. हीच वाट ओढ्याकडे जात होती. दूरवर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. गाव जवळ आल्याची ती खुण होती या जाणीवेने तो थोडा सुखावला. एवढ्यात त्याला आपल्यापुढे दूरवर कोणीतरी चालतंय अस वाटल त्याने विजेरीच्या प्रकाशात त्या दिशेला पाहायचा प्रयत्न केला पण पुढे एका वळणावर ती व्यक्ती दिसेनाशी झाली. अजयने आता चालण्याचा वेग थोडा वाढवला व तो ते वळण पार करून गेला तेव्हा त्याला दिसलं की त्याच्या समोर सात आठ फुटावर एक स्त्री शांत पणे चालत होती. पाठमोरी असल्याने तिचा चेहरा अजयला दिसत नव्हता. अजयचा भुता खेतांवर विश्वास नसला तरी निर्मनुष्य रस्ता, घनदाट जंगलातील ती वाट, पावसाळी वातावरण आणि अशा भयाण जंगलातून पावसाळ्या रात्री एकट्याने रस्ता चालणारी ती स्त्री पाहताच त्याला थोडी भीतीची जाणीव झाली. त्यातून अजय जेव्हा एस टी च्या थांब्यावरून गावात यायला निघाला होता तेव्हा गावात येणारा कोणी प्रवासी नव्हता मग ही बाई कुठून आली असा त्याला प्रश्न पडला. पण कदाचित आजू बाजुच्या गावातली पण असू शकेल अशी त्याने मनाची समजूत घातली आणि तो वेगात चालू लागला कदाचित त्याच्या चालण्याची तिला जाणीव झाली असावी कारण ती थबकली आणि तीने मागे वळून बघितले. अजयला बघून ती थोडी दचकली तिच्या चेहऱ्यावर थोडे आश्चर्य उमटले.  तिला तसे दचकलेले पाहून अजय म्हणाला  “अहो बाई घाबरू नका मी रामवाडीत चाललोय, तुम्ही पण वाडीत चाललाय का ? पण एस टी च्या थांब्यावर तुम्ही दिसला नाही आधीच्या एस टी ने आलात का ? मी चकित झालो तुम्हाला पाहून,

“ मी जवळच्या गावात राहणारी आहे. माझ्या घरी निघालेय, आज मला थोडा उशीर झालाय म्हणून जरा जोरात पावलं टाकत होते. तशी मी खरतर थोडी घाबरले तुम्हाला अस अचानक बघून पण बर सुद्धा वाटल कारण आता तुमची सोबत होईल” ती म्हणाली.

अजयने तिच्या कडे निरखून पाहिले तीचा वर्ण थोडा सावळा होता पण ती दिसायला देखणी होती. तिने पिवळ्या रंगाची साडी व त्याला शोभेसा ब्लाउज घातला होता.कपाळाला ठसठशीत कुंकू होते गळ्यात मंगळसूत्र पण दिसत होते. तिचे डोळे टपोरे होते. तिचे वय साधारण पंचवीस ते तीस असावे. तिच्या हातात एक छोटीशी कापडी पिशवी होती, एवढा पाउस असून पण तिच्याकडे छत्री किंवा रेनकोट या पैकी काहीच नव्हते. तिने आपल्या साडीचा पदर डोक्यावरून घेतला होता. अजयला तिची नजर खूप गूढ व भेदक वाटली.

“ अहो बाई मला आश्चर्य वाटते की एवढ्या पावसात तुम्ही छत्री न घेता चालताय पायात चप्पल पण नाहीये तुमच्या आणि किती वेगात चालत होता तुम्ही” अजय म्हणाला.

“ अहो पाव्हण आम्ही गावाकडची साधी माणसं. हा आमच्या पायाखालचा रस्ता आम्हाला पावसा पाण्याची सवय आहे. कशाला हवी आहे छत्री पण मला घाई होती लवकरात लवकर ओढा ओलांडण्याची कारण तिथून जाणे सध्या थोडे धोकादायक झालेय, एकटीने जाण्याची भीतीच वाटत होती बरे झाले आता तुम्ही  सोबतीला आहात.  ”. ती बोलली अजयला तिच्या चेहऱ्यावर थोडी भीतीची छाया दिसली.

“ काय हो मला सांगा त्या ओढ्याच्या परिसरात काही वेगळे घडलेय का ? तो हॉटेल मालक म्हणत होता की रात्रीचे जाऊ नका गावातील ओढ्याजवळच्या साकवाच्या परिसरात लोकांना म्हणे वेगळे अनुभव येतात. तुम्ही इकडच्या आहात तुम्हाला काही माहिती आहे का ? अजयने विचारले.

“ हो आहे थोडी फार. दोन वर्षा पूर्वी गावात ती घटना घडली आणि त्या परिसरात लोकांना वेगळे अनुभव येऊ लागले. तुमचा भुता खेतांवर विश्वास आहे का ? “  तिने विचारले.

“नाही माझा नाही विश्वास अशा गोष्टींवर” अजय म्हणाला.

“पण माझी गोष्ट ऐकाल तर तुमचा विश्वास बसेल सांगू का ? “ तिने विचारले,

अजयने मान डोलावली आणि ती सांगू लागली …….

“ही गोष्ट आहे  आमच्या गावातल्या एका गरीब शेतकऱ्याच्या देखण्या पोरीची. पोरीची आई लहानपणीच तिला सोडून गेलेली. बापान तिला काही कमी पडू दिल नव्हत. वयात आल्यावर तर ती अनेकांच्या दिलाची धडकन बनली. पुढे तिला भेटला  एक तरुण, शहरात राहणारा. दोघ एकमेकांच्या प्रेमात पडले. गावाजवळील ओढ्याच्या परिसरात त्याचं प्रेम फुलत होत. त्यांनी लग्नाच्या आणा भाका पण घेतल्या होत्या. प्रेमात दोघेही वाहवत गेले आणि अखेर शेवटी व्हायच तेच झालं, पोरीला  दिवस राहिले. शहरी बाबुला तिने हे गुपित सांगितले ते पण याच ओढ्याच्या काठावर. त्याला पण आनंद झाला. दोघांनी लग्न करायचं ठरवलं. तो शहरी बाबू आपल्या घरी सांगून लग्नाची तारीख ठरवून तुला मागणी घालायला येतो असे तिला सांगून शहरात गेला. पोरगी पण आनंदात होती. पण दिवसा मागुन दिवस गेले त्या शहरी बाबूचा पत्ताच नव्हता. बिचारी पोर आपल्या प्रेमाच्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार असणाऱ्या या ओढ्यापाशी तिच्या प्रियकराची वाट बघत बसायची पण त्तो आलाच नाही. जस जसे दिवस जाऊ लागले तसे हे सर्व लपवणे तिला अवघड झाले, शेवटी धीर करून तिने आपल्या बापाला सर्व सांगितले. तो तरी काय करणार. तो हादरला. आपल्या मुलीला कोणीतरी फसवले याचा त्याला राग आला. पण तो काय करणार होता. शहरी बाबुला कुठे शोधणार.आपले गाऱ्हाणे कोणाला सांगणार. आता सगळे आपल्या मुलीलाच दोष देणार. गावात आपली बदनामी होणार  या विचाराने त्याला काही सुचेना.पोरीच्या काळजी पाई त्याने हाय खाल्ली आणि त्याने अंथरूण धरले आणि तो हे जग सोडून गेला. पोरगी आता एकाकी झाली, त्यातून पोटात पोर. कोणाला सांगणार काय करणार शहरी बाबू निघून गेलेला. जवळचे असे कोणी नातेवाईक नवहते.गावात कुजबुज ऐकू येत होती.आता लोकांना कस तोंड द्यायच याचा तिला प्रश्न पडला. शेवटी तिने मनाचा निर्धार केला. अशीच एक पावसाळी रात्र होती. ओढ्याला पूर आला होता. ती मुलगी गावातून निघाली व दुथडी भरून वाहणाऱ्या या ओढ्याच्या साकवा पाशी आली आणि खोल पाण्यात उडी मारून तिने आपले जीवन संपवले. काही दिवस गावात चर्चा झाली. नंतर लोकं ती घटना विसरून पण गेले. या घटने नंतर महिनाभराने साकवा जवळच्या ओढ्यातील कोंडीत (ओढ्यातील खोल भाग) पोहायला गेलेल्या मुलांपैकी एक पाण्यात ओढला गेला त्याला जणु कोणी तरी पाण्यात खेचले होते. इतर मुलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो बुडालाच. वर आला तो त्याचा मृत देह,तो तरुण पट्टीचा पोहणारा होता.काही दिवसांनी पुन्हा असाच अनुभव अजून एका तरुणाला आला. मात्र तो नशिबाने वाचला, त्याने सांगितले की कोणीतरी त्याच्या पायाला पकडले तो एका बाईचा हात होता. हातात हिरवा चुडा होता. शहरातून येणाऱ्या काही तरुणांना म्हणे साकवावरून जाताना विचित्र अनुभव आलेत, काही जण तर ओढ्यात पडून जीवानिशी मेलेत. अशी चर्चा आहे  की त्या मुलीला धोका देणारा तो  तरुण शहरातला होता म्हणुन शहरी तरुणांवर तिचा राग आहे. त्यांना ती पछाडते. आता कोणीही त्या कोंडीत पोहायला जात नाहीत, एवढंच काय संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी एकटा दुकटा माणूस त्या साकवा जवळून यायला घाबरतो,…. ” अरे बोलता बोलता पोचलो की ओढया जवळ” गोष्ट संपवत ती बोलली.

अजयने पाहिले  ते  आता ओढ्याच्या परिसरात आले होते. ओढ्यातून खळ खळ वाहणारया पाण्याचा आवाज ऐकू येत होता. ओढयाच्या दोन्ही काठावर घनदाट झाडांच्या रांगा होत्या. त्या मधून पावसामुळे तुडुंब भरलेला ओढा खळाळून वाहात होता. मात्र ओढ्याचा प्रवाह  एकाजागी  खूप संथ झाला होता, ह्या जागी पाण्याची खोली खूप होती. त्यामुळे ओढ्याचा हा भाग एका तलावा सारखा दिसत होता. पावसामुळे ओढा  तुडुंब भरून वाहत होता. थोड्या दूरवर ओढ्यावर बांधलेला साकव दिसत होता. थोडावेळ अजय  ओढ्याकडे साकवाकडे त्यातील खोल पाण्याचे  निरीक्षण करत होता. परत एकदा भूतकाळातील आठवणींनी त्याच्या मनाचा कब्जा घेतला. त्या बाईने सांगितलेली हकीगत त्याला अस्वस्थ करीत होती. त्याचा अस्वस्थ पणा पाहून तिने अजय कडे रोखून बघत विचारले “ काय हो कशी वाटली माझी गोष्ट घाबरलात नाही ना ? एकदम गप्प झालात ? “. अजयला तिची नजर खूप भेदक वाटली.

“ विचार करतोय तुमच्याच गोष्टीचा. मला वाटत तुमच्या गोष्टीतील त्या मुलीने जीव द्यायला नको होता. तिचा तिच्या प्रेमावर विश्वास होता ना मग काही तरी मार्ग निघाला असता. तिने थोडी वाट बघायची. त्या मुलाची पण काही तरी अडचण असू शकेल” अजय बोलला.

“ अहो तुम्हाला काय बोलायला जातंय, अहो बदनामीला तिला तोंड द्यावं लागलं असत. हे शहर नाहीये लग्ना आधी आई होण कोणाला मानवल नसतं. गावान तिला वाळीत टाकलं असतं. तिला जगण नकोसं केलं असत. तो शहरी बाबू तिचा फायदा घेऊन तिला एकटीला संकटात टाकून पळपुट्या सारखा पळाला  जीव देण्याखेरीज तिच्याकडे दुसरा कुठला मार्ग होता सांगा ना” ती ठाम पणे बोलली आता तिच्या बोलण्यात राग जाणवत होता.

“ नाही मला खरच वाटतंय की त्या मुलाची काय तरी अडचण असेल त्याने नसेल फसवल तिला” तिच्याकडे थोडसं रोखून बघत अजय म्हणाला,

“पण तुम्ही का बाजू घेताय त्या मुलाची ? “ तुम्हाला काय आहे माहित त्या मुलाबद्दल ?थोड्या रागानेच तिने विचारले.

“कारण तुमच्या गोष्टीतल्या त्या मुलीचा म्हणजे मंजुळाला ज्या शहरी बाबूने फसवले असे तुम्हाला वाटते तो  मी आहे, मंजुळाच होत ना तुमच्या गोष्टीतल्या मुलीच नाव ?  एकेका शब्दावर जोर देत शांतपणे अजय म्हणाला.

“काय सांगता ! तुम्हीच ते  मंजुळेला फसवणारे शहरी बाबू ? आता तिच्या डोळ्यात अंगार दिसत होता. अजयकडे ती रागाने बघत होती. अजयला तिच्या नजरेला नजर देणे शक्य होईना.

“खर सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा  मी कसा फसवेन माझ्या मंजूला ? अहो माझ खूप प्रेम होत मंजुवर पण नियतीला ते मंजूर नव्हतं माझी पण बाजू ऐका आणि मग ठरवा मी गुन्हेगार आहे का ते अत्यंत आर्त स्वरात अजय म्हणाला आणि आपली हकीगत सांगू लागला “मंजूच्या आणि माझ्या प्रेमाची निशाणी तिच्या पोटात वाढतेय हे समजल्यावर आम्ही दोघेही सुखावलो आणी लवकरात लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला. मंजूला सांगून मी लग्नाची तारीख ठरवण्यासाठीच मुंबईला जायला निघालो.मी मोठ्या आनंदात होतो. मी माझ्या आई बाबांचा एकुलता एक मुलगा होतो. माझी पसंती तीच त्यांची, त्यांनी माझ्या लग्नाला मान्यता दिलीच असती. भावी जीवनाची स्वप्ने रंगवत मी माझ्याच नादात गाडी चालवत होतो आणि समोरून येणाऱ्या एका मालट्रकच्या हेड लाईट ने माझे डोळे दिपले आणि माझ्या गाडीचा अपघात झाला. माझ्या डोक्याला जबरदस्त मार बसला मी वाचलो खरा पण कोमात होतो चक्क एक वर्षाहून अधिक काळ, त्यानंतर कोमातून बाहेर आलो. तो पण एक चमत्कारच म्हणायला हवा. पण आता वाटतंय मी नसतो जगलो तर बर झालं असतं. कारण माझी मंजू आता या जगात नाही हे सत्य समजल्यावर मी पुरता कोसळून गेलो. माझ प्रेम, मंजु याबद्दल  मी आता कोणाला काय सांगणार होतो मी अगदी एकटा पडलो. मंजुशिवाय जगण मला असह्य झालं होत. गावाला याव  अस वाटतच नव्हत. पण  आज गावाला मुद्दामच आलोय. का माहिती आहे जेव्हा माझ्या कानावर या गोष्टी आल्या  की माझ्या मंजूच्या आत्म्याला शांती मिळाली नाहीये आणि तीचा आत्मा म्हणे इथे वावरतोय माझ्यावर सूड घेण्यासाठी. या ओढ्यात काही तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय आणि त्याला माझी मंजु कारणीभुत आहे. मला ते पटलंच नाही. कदाचित जे तरुण गेले ते त्यांच्या काही चुकीने ते पडले असतील ओढ्यात. कारण माझी मंजू खूप प्रेमळ होती.आमचं प्रेम खर होत मात्र  नियतीपुढे आम्ही हतबल ठरलो. मला मंजूची  अशी बदनामी मला नाही सहन होत.मला माहित आहे नकळत माझ्या मंजूच्या मृत्यूला मी जबाबदार आहे आणी तिच्यासाठी मी मरायला पण तयार आहे. कारण माझ्या मंजुशिवाय मी जागून तरी काय करू ?”  आणि त्याच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागली. अजयची हकीगत संपली होती आपल्या बोलण्यावर तिची काहीच प्रतिक्रिया नाही म्हणून त्याने समोर पाहिले त्याच्या समोर आता कोणी नव्हते. त्याच्याशी आतापर्यंत बोलणारी बाई जणू काही अदृश्य झाली होती.

त्याला जाणवले की आपल्या बाजूच्या वातावरणात बदल होतोय. अचानक सोसाट्याचा वारा सुटला,  झाडांची सळ सळ ऐकू येऊ लागली. त्यातच जोरात विजेचा कड कडाट झाला. भीतीने अजयच्या अंगावर काटा उभा राहिला. छातीत धड धड वाढली. त्याला समजेना कुठे नाहीशी झाली ती बाई !  त्या बाईच्या रुपात  मंजुळा तर नव्हती ना आली ! अजयचे भान हरपले आणि त्याने आर्त स्वरात हाक मारली “ मंजू कुठे आहेस तू ? का गेलीस मला सोडून ? माझ्या समोर ये मला तुला काही सांगायचंय माझ्यावर विश्वास ठेव मी नाही तुला फसवलं. तू माझी खूप वाट बघीतली असशील. तुला वाटणे साहजिकच आहे की मी तुला अशा परिस्थितीत एकट सोडलं. पण काय करणार नियतीच क्रूर पणे खेळली आपल्याबरोबर.  अजय जणू मंजुळा समोर आहे असे समजून बोलत होता. पण त्याचे हे बोलणे ऐकायला तिथे कोणच नव्हते. आता पावसाची भूर भुरू सुरु झाली होती काय करावे त्याला कळेचना. त्याची नजर त्या बाईला शोधत होती. आपण आतापर्यंत जे अनुभवत होतो तो भास होता की सत्य खरच ती गायब झालेली बाई मंजुळा असेल का विचार करून त्याच डोक फुटायची वेळ आली आणि तो हतबल होऊन साकवा वरून चालू लागला. त्याचे पाय लटपटत होते. खालून ओढ्याच्या पाण्याची खोली दिसत होती. याच ठिकाणी ओढ्यात उडी घेऊन मंजूने आपल्याला संपवले होते या विचारांनी तो व्याकूळ झाला. तो साकवावरून खाली खोल पाण्यात पाहू लागला जणू काही तो मंजुळेला शोधत होता. त्याचे भान हरपलेले होते अशा अवस्थेत असताना त्याला दोन दणकट हातानी पकडले.  “अजय बाबू काय करताय हे ?” भानावर या “ मामांच्या घरचा गडी तुकाराम अजयला गदागदा हलवीत बोलला पण अजय अजून त्याच्याच विश्वात होता तो म्हणाला “तिने उडी घेतली ओढ्यात !  आपण तिला वाचवले पाहिजे” तुकारामला त्याने ओळखले नाही “ अजय भाऊ असे काय करता तुम्ही मला ओळखले नाही मी तुकाराम मामांच्या घरचा गडी. पाहिले काम करा माझ्या मागे या असे म्हणून त्याने अजयचा हात पकडला व त्याला घेऊन साकव ओलांडून पलीकडे नेले आणि तिथल्या एका चौथर्यावर बसवले. आता अजय थोडा भानावर आला. त्याने तुकारामला ओळखले आणि विचारले “ अरे तुकाराम तू कधी आलास  इथे ? मी साकव ओलांडून इथे कसा आलो ?

“आल माझ्या ध्यानात शेवटी सापडलात तिच्या तावडीत अहो कसली बाई आणि काय घेऊन बसलात तुमच नशीब थोर म्हणून वाचलात नाही तर त्या बयेने तुमचा बळी घेतला असता. बाकी आज दिवसच वाईट पावसामुळे तुम्हाला गाडीवर घ्यायला यायला घरातून निघायला उशीर झाला त्यात ओढा ओलांडला आणि पाऊस सुरु झाला मी वाट चुकलो चकवा लागला गेले दोन तास वाट सापडत नव्हती फिरून परत परत एकाच जागी येत होतो. शेवटी एकदाचा पोचलो बसच्या थांब्यावर हॉटेल बंद होत आल होत मालक भेटला त्यांनी सांगितले  एस टी ची बस येऊन बरच वेळ झाला. तुम्ही एकटे निघाले आहात. घाबरलो म्हटलं मंजुळेने तुम्हाला धरायला नको. पण मला वाटते तिने धरलेच होते तुम्हाला. मी लांबून बघितले तर तुम्ही साकवा पाशी काही तरी हातवारे करीत कोणाशी तरी बोलता आहात, पण समजेना कारण तुमच्या बाजूला कोणाच नव्हते. मी तुम्हाला हाका मारल्या पण तुम्हाला ऐकू आल्या नसाव्यात आणि अचानक तुम्ही साकवावरून चालू लागला तुमचे पाय लटपटत होते. मी पकडले नसते तर ओढ्यात पडला असता. देवाचीच कृपा. चला आता घरी जाऊया मामा तुमची वाट बघत असतील”. तुकाराम म्हणाला.

तुकारामच्या त्या बोलण्याने अजय भानावर आला. म्हणजे आतापर्यंत आपण जे पाहिले अनुभवले तो एक स्वप्नवत भासच होता तर, जणू आपल्या मनाचे खेळ. मंजुळा आता या जगात नाही आता तिच्याशिवाय आपणाला दिवस काढायचे आहेत हे सत्य तर आपण स्वीकारल आहे. आज कोणाकडे तरी आपण मंजुळेच्या मृत्यूला अप्रत्यक्ष रित्या जबाबदार ठरलो असलो तरी आपण तिला फसवल नाही ही आपली बाजू मांडता आली ह्या विचाराने त्याच्या मनावरचा भार हलका झाला. मंजुळेचा आत्मा खरोखरच या परिसरात वावरत असेल तर सत्य समजल्यावर तिच्या आत्म्याला शांतीच लाभेल. आपण ज्याच्यावर प्रेम केल तो भेकड नव्हता त्याने आपल्याला फसवल नाही तर तो अजूनही आपल्यावर प्रेम करतोय ही बाब तिला नक्कीच सुखावेल.तिच्या आत्म्याला शांती लाभेल आणि यापुढे तरी त्या परिसरात लोकांना होणारे भास थांबतील या विचाराने अजयला बरे वाटले. तेवढ्यात एक वाऱ्याची छान झुळूक ओढ्यावरून  आली आणि अजयला अलगद स्पर्शून गेली त्याला वाटले मंजुळाला त्याचे बोलणे समजले होते आणि ती त्याचा प्रेमाने आणि समाधानाने निरोप घेत होती. त्याने एकदा साकवाकडे पहिले आणि तो स्वतःशीच हसला आणि तुकारामाला म्हणाला “चल निघूया मामा वाट बघत असतील’ आणि दोघेजण गावाची वाट चालू लागले…………

(कथेतील पात्रे प्रसंग स्थळ पूर्णतः काल्पनिक)

— विलास गोरे 

Avatar
About विलास गोरे 22 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..