करिअरची निवड करताना तर अनेकांच्या बाबतीत अनेकदा काही घडायच्या ऐवजी बिघडतेच. करिअर निवडताना केवळ भावनेच्या आहारी जाऊन आणि त्यांतील ग्लॅमरमुळेच अनेकजण त्याकडे आकर्षित होताना दिसतात. पण ग्लॅमर नाही तर ग्रामर महत्वाचे असते, हेच समजत नाही, इतर उणिवांपैकीच ही एक उणिव असल्याचे म्हणावे लागेल. अगदी अलीकडच्या काळांत सिनेनाट्य आणि जाहिरात क्षेत्र, अनेकांच्या अधिकच आकर्षणाचा विषय बनत चालला आहे. अर्थात तो पूर्वी आकर्षणाचा विषय नव्हता असे नाही, पण अलीकडच्या काळांत त्या क्षेत्रांत खाजगी दूरचित्रवाणी, जाहिरात क्षेत्र, सिनेनाट्य क्षेत्रांतील वाढती मागणी आणि त्या अनुषंगाने उपलब्ध होत असलेल्या विविध संधी, ह्यामुळे अगदी जन्मलेल्या तान्ह्या बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला ह्या क्षेत्रांत काम करायची इच्छा उत्पन्न होत आहे.
व्यावसायिक अभिनेता अथवा अभिनेत्री बनण्यासाठी लहान मुला-मुलींपासून अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येक व्यक्ती केवळ उत्सुकच नाही, तर उतावीळ झालेली असते. खरे तर सर्वानाच या क्षेत्रातल्या ग्लॅमरचे आकर्षण असते. अभिनय क्षेत्रात मिळणारा नावलौकिक आणि पैसा यामुळे प्रत्येकजण या क्षेत्राकडे आकर्षित होत असतो. या क्षेत्रातल्या ग्लॅमरपेक्षा अभिनयाचे ग्रामर किती महत्वाचे आहे? याचा विचारच अनेकजण करू शकत नाहीत, हीच त्यांच्यातील उणिव आहे. अभिनय कलेला स्वत:ची अशी एक थेअरी आहे, प्रॅक्टीकल्स आहेत, गणिताप्रमाणे सूत्र आहेत आणि म्हणूनच ती कला तर आहेच पण त्यागोदर ते शास्त्र आहे, ह्याची जाणीव होणे जरुरीचे आहे. अभिनय हा कलेच्या माध्यमातून परंतू शास्त्राच्या चौकटीत सादर करायचा असतो. अभिनय ही कला असूनही शास्त्रोक्त पद्धतीने ती साकारावी लागते. आपण भ्रम आणि संभ्रमांत गुरफटल्यामुळे त्याकडे अभ्यासपूर्वक बघतच नाही.
अलीकडच्या काही काळात “कास्टिंग काऊच”, “मी-टू” (#Metoo) सारख्या काही धक्कादायक घटना आणि अत्यंत गंभीर विषय चव्हाट्यावर येत असल्याचे आपण बघितल्या आहेत. ग्लॅमरच्या आकर्षणाचे आतापर्यंत असंख्य बळी ठरले असतील. प्रलोभनाच्या आहारी न जाण्याची वेळीच जाणीव होणे जरुरीचे असते. अभिनयातील ग्रामर शिकले, तर ग्लॅमर आपल्या पायाशी येऊ शकते, हे जाणून घेणे सद्य:स्थितीत अत्यंत महत्वाचे आहे. ज्यायोगे केवळ आभासीकरण आणि त्याच्या आकर्षणाचा बळी पडण्याची वेळ येऊ शकत नाही.
विद्यावाचस्पती विद्यानंद
ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com
Leave a Reply