13 जुलै 2018 रोजी आमच्या पारनाईक सरांचे निधन झाले होते, तेव्हा लिहिलेला लेख.
सरांना पत्र …..
आदरणीय पारनाईक सर .
अखेर तुम्ही या व्यवहारी जगाचा निरोप घेतलात . तुम्ही जे जे काही उत्तम छंद जोपासलेत त्यामुळे तुम्ही नुसते शिक्षक राहिला नाहीत हे आम्हा सर्वाना माहीत आहे . मला माहित आहे तुम्ही काय किंवा मी काय आपल्यासारखे छांदिष्ट या व्यवहारी जगात जगायला लायक आहोत का खरेच माहित नाहीत. परंतु तुम्ही मात्र आयुष्य आघात सोसूनही , परिस्थितीचे चटके बसूनही तुम्ही हसतमुख होतात , दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद मानत राहिलात . शाळेत असताना मला स्वाक्षरी जमा करण्याचा छंद आहे हे कळल्यावर तुम्ही मला आपुलकीने विचारले तेव्हा मनात एक खूणगाठ बांधली गेले अगदी नकळतपणे ध्यानीमनी नसताना, तुमच्यासारखा छंद जोपासायला , तुमच्यासारखी चित्रे काढायची पण छंद जोपासला गेला परंतु चित्रे काही बाप जन्मांत काढता आली नाहीत अर्थात काही गोष्टी वरून जन्माला येताना घेऊन यायच्या असतात. तुम्ही तर दणादण दोन्ही हातानी चित्रे काढत असताना आम्ही येड्यासारखे तुमच्याकडे बघत असायचो . परंतु स्वाक्षरीचा छंद मात्र चालू ठेवला , त्यावेळेला अनेक जणांनी माझी टिंगल केली होती माझ्या स्वाक्षरीच्या छंदाबद्दल , परंतु तुम्ही नेहमीच आदर केलात . अगदी तुमचा शेवटचा फोन आला होता माझा तिसरा लिम्का रेकॉर्ड झाल्यावर , तुम्हाला नीट ऐकू येत नव्हते , तुमचे शब्द मला फोनवरून कळत नव्हते परंतु खूप बरे वाटले होते.
खरे तर आमच्या मो. ह. विद्यालयाची तुम्ही शान होता. अहो सगळेच शिक्षकाची नोकरी करतात आणि नोकरी करता करता फालतू राजकारणात गुंतून रहातात तसे तुम्ही केले नाहीत हे महत्वाचे तुम्ही शिक्षक होतात ‘ शिक्षक राजकारणी ‘ नव्हता हे महत्वाचे. कारण शिक्षक म्हटले की त्या छोट्या का होईना विश्वात राजकारण नावाची कीड घुसतेच , आता सगळीकडे घुसते , काळच बदलला आहे .
सर , एक सांगू आता , जरा तुम्हाला , अर्थात तुम्हाला वाईट वाटेल , सर तुम्हाला ह्या व्यवहारी जगाचा व्यवहार कधीच जमला नाही आणि तिकडेच सर्व काही चुकले असे माझे प्रामाणिक मत आहे कारण सोन्याचा दागिना जेव्हा होतो तेव्हा त्यामध्ये दुसरा धातू मिसळावा लागतो , तेव्हाच तो दागिना होतो , सर तुम्ही तो मिसळला नाही आणि तिथेच काही गणिते चुकली परंतु तुमचे काय आणि माझे काय असेच आहे आपण एखाद्या गोष्टीत स्वतःला इतके झोकून देतो आणि काहीच भान उरत नाही . परंतु तुमच्या जाण्याने खरच मला आता काळाचे भान आले आहे असे वाटते .
सर ,सुखदुःखासह तुम्ही आयुष्य जगलात , प्रसंगी शाळेने , शाळेमधील मुलांनी तुम्हाला हात दिला , खूप बरे वाटले.
आता तुम्ही तिकडे आहात आमच्या कल्पनेपलीकडे ,
सगळ्यांना तिथेच यायचे आहे .,
पण तिकडे पण निश्चित भेटू काही वर्षाने,
परंतु तुमचा फोन काही मला परत येणार नाही,
हे मात्र मी miss कारेन .
तुमचा विद्यार्थी
सतीश चाफेकर
Leave a Reply