१९७६-७७ च्या आसपास पुण्याच्या भनाम मध्ये रात्री मामेभावाबरोबर तेंडुलकरांचे ” पाहिजे जातीचे ” कां बघायला गेलो, माहित नाही. त्याकाळी वर्तमानपत्रात रिव्ह्यू किंवा आजच्यासारखी आपल्यावतीने निर्णय घेणारी माध्यमे नव्हती. महिपती बब्रूवाहन पोरपार्नेकर अशा पुळचट नांवाचा भिडस्त प्राध्यापक ( विहंग नायक) आणि त्याच्यासमोर स्टेजभर धिंगाणा घालणारा ( विद्यार्थी टोळीचा प्रमुख) नाना पाटेकर ! दोघांचेही हे पहिलेच नाटक पण धमाल !
त्यानंतर हा गृहस्थ सांगलीच्या जनता नाट्यगृहात दिसला – दळवींच्या “महासागर ” मध्ये ! विक्रम, नीना, दिलीप अशा तगड्या स्टारकास्टसमोर मेणचटलेला नाना ! मी आणि परममित्र जयंत असनारे प्रथेप्रमाणे मध्यंतरात सगळ्यांच्या सह्या घ्यायला गेलो. आगाऊपणे नानाच्या दाढीबद्दल त्याला विचारले. तोही सहज म्हणाला- ” मला गालाच्या कातडीचा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी गुळगुळीत दाढी करीत नाही.”
विजया मेहेतांच्या विद्यापीठातील हा आज्ञाधारक विद्यार्थी ! त्यांच्याबरोबर तो “हमीदाबाईची कोठी ” मध्ये दिसला. नंतर पाहिलं बालगंधर्वच्या “पुरुष ” मध्ये- रीमा बरोबर ! याच्या यशाची कमान सतत चढती. सिनेमातही अमिताभ (कोहराम), राजकुमार (तिरंगा) वगैरे तोडीसतोड दिसला. अगदी अलीकडच्या “काला” मध्ये दक्षिण दैवत -रजनीकांत बरोबर कोठेही कमी नाही. स्वतःची अटीट्युड, स्वतःच्या अटी ! मोकळाढाकळा, मध्यंतरी VJTI मध्ये तरुण पिढीशी निवांत गप्पा मारणारा, at ease – पायजमा /झब्बा या मराठी पोषाखाची लाज न बाळगणारा.
“थोडासा रुमानी” नावाची कविता बळकट खांद्यांवर मिरवणारा. तसा तो “प्रहार” मध्येही आवडून गेला. भावला नाही फक्त ” नटसम्राट ” मध्ये! तिथे सचिन खेडेकर किंवा गेलाबाजार विक्रम चपखल बसला असता. तेथे तो अगदी वाणसामानाच्या दुकानातल्या काउंटरवरचा वस्तू विकणारा ( दाढी आणि मळकट टोपी) माणूस वाटला, सोबतीला विसंवादी उग्र संवाद ! आधीच्या पुरुषोत्तमांना (लागू ते दुभाषी व्हाया भट) पाहिलेले असल्याने मला नाना कोठेच नटसम्राट वाटला नाही.
दुसरी भूमिका प्रकाश आमटेंची ! प्रकाश आमटे अतिशय सौम्य,ऋजू आणि शांत व्यक्तिमत्व ,नाना मात्र तसा भासला नाही. “काटकोन त्रिकोण ” वर आधारीत “आपला माणूस “मध्येही आणि “सिंहासन “मध्येही तो गरम डोक्याचाच होता.
आता “नाम “नांवाचा अवयव त्याला जोडला गेला आहे. त्याला त्याच्या स्वभावातील सर्व गुणदोषांसह प्रेक्षकांनी स्वीकारलंय- मीही ! तो “आपला “वाटतो- अंतरंगी खरा, बराचसा आपल्यासारखा!
पत्नी नीलकांती पाटेकर (पूर्वाश्रमीची हलदुले – मुपो नाशिक) हिने सचिनच्या “आत्मविश्वास “मध्ये बहारदार काम केले. मला एका राजकीय व्यक्तीचा डायलॉग आठवतो-
” आपुनने एकही मारा, लेकिन क्या सॉलिड मारा!”
पती-पत्नीच्या पडद्यावरील कर्तृत्वाचे हे सोपे निखालस वर्णन वाटते मला !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply