चिंचेच्या पानावर देऊळ रचियले।
आधी कळस मग पाया रे।।
आज रसिक श्रोत्यांनी या संत एकनाथांचा अतिशयोक्ती अलंकारायुक्त अप्रतिम अभंगाचा अनुभव अक्षरश: याचि डोळा याचि देही घेतला.
हो, अजिबात अतिशयोक्ती नाहीए या टिपणीत. कार्यक्रमाच्या उत्तर रंगात, मराठवाड्यातील संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पुण्यपावन भूमीतून येणारे आपल्या संस्थेचे संस्थापक जेव्हा पहातात की, श्रीयुत सर्जेराव कुईगडे यांनी वाढदिवसमूर्ती श्रीयुत जयवंत पाटील यांचे स्वत: चित्रित केलेली चित्रकृती त्यांना भेट देताना, आज साकार झालेल्या, ‘आषाढस्य प्रथमदिवसे’ या कार्यक्रमस्थळी विमोचन केल्यावर, सभागृहात आश्चर्ययुक्त कौतुकमिश्रित एक लहर उमटली! संपूर्ण सभा अवाक झाली! हा कार्यक्रमाचा महत्वाचा कळसाध्याय!
सर्जेरावांनी लेखन करताकरता गेल्या काही वर्षात रंगांशी खेळता खेळता त्यांचे हात इतके सरावले की आज पर्यत त्यांनी केलेल्या पेंटिंग्सपैकी सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून जयवंत पाटलांच्या या चित्रांची गणना होईल, हे नक्की. संस्थेच्या लोभापोटी, आपली संस्था आपुलकीच्या नात्यांसवे सौहार्दपूर्ण कलाकारांच्या उन्नतीचे व्यासपीठ आहे. हा कळस होता आजच्या कार्यक्रमाचा!
याअगोदर, जयवंत पाटील यांनी कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था, सीवूड-नेरुळ संस्थेची साहित्य, वाचनसंस्कृती, सहली, विविध उपक्रमांची मार्गक्रमणा अधोरेखित करताना चारोळीच्या अनुषंगाने दोन हजार वर्षांपूर्वीच्या वेचक चारोळ्या उद्धृत करुन अभिजात मराठी भाषेचा दाखला दिला.
याअगोदर, संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष आजचे उत्सवमूर्ती श्रीयुत महादेव देवळे दाम्पत्याचा सत्कार श्रीयुत प्रवीण पाटील यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन झाला.
याअगोदर, वाढदिवस स्पेशल चारोळीकार महादेव देवळे यांच्या ‘‘मनापासून मनातले’या चारोळींच्या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवयित्री सन्माननीय प्रतिभा सराफ यांचे शुभहस्ते संपन्न झाला. पुस्तकांचे प्रकाशन जाहीर करताना प्रतिभा सराफ यांनी देवळेंचा हसतमुख चेहऱ्याचा विषेश उल्लेख करीत दुसऱ्याबद्दल चांगले बोलणारा लिहिणारा माणूस आणि इतर शेकडो जणांचा गुणांसहित यशस्वी कामगिरीचा उल्लेख त्यांच्या चारोळीत आढळतो असे प्रतिपादन केले. इतरांबद्दल वाईट सहजी बोलता येते, परंतु वाढदिवसानिमित्त गुणांची वाखाणणी करण्याची प्रवृत्ती विरळाच, ही गुणग्राहकता देवळेसरांकडे आहे आणि याप्रकारातील मराठीतील हे पहिलेच पुस्तक असे गौरवोद्गार काढले. महाकवी कालिदास यांची जन्मतिथी उपलब्ध नसल्याने आषाढाचा पहिला दिवस कालिदास जयंती म्हणून प्रसिद्ध असल्याची माहीती देताना, प्रमुख वक्त्या श्रीमती प्रतिभा सराफ यांचे भाषण विविध चारोळीकारांचा इतिहास, शैलीसह, चारोळी, कविता, गजलपंक्तींची पेरणी त्यांच्या विद्वत्तापूर्ण प्रतिपादनाने लक्षवेधी ठरली. वाचनालय संस्था सान्निध्याने देवळेजी यांची फुलणारी साहित्यप्रतिभा पुस्तकरुपाने प्रसिद्ध होणे, हा होता आजचा दुसरा महत्त्वाचा कळस! या अगोदर, वाशी येथील मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत सुभाष कुळकर्णी यांनी देवळे यांच्या संस्था ऊभारणी कार्यात झालेल्या मदतीचा आणि त्यांच्या अंगभूत मेहनतीचा, लेखनशैलीचा, कार्यमग्न वृत्तीचा बिनीचा शिलेदार असे कौतुक केले या अगोदर पूर्वरंगात ‘आषाढस्य प्रथमदिने’ कार्यक्रमात विविध कवी गायकांनी पावसाळी प्रसन्नतेचे इंद्रधनुषी रंग भरले. विविध अंगानी मोहरलेल्या या, कला, काव्य, गीतसंगीत, चित्रकला, पुस्तक प्रकाशन अशा अनेक लहरींवर हिंदोळे घेणाऱ्या सभेला आपल्या अलवार शब्दांनी एका माळेत लीलया ओवणारे सूत्रसंचलन लाभले ते अर्थातच श्रीमती प्रज्ञा लळींगकर यांचे जे वाचनालय संस्थेच्या प्रांगणात हे फुलतं!
विधात्याने सृजनतेने संस्थेच्या संस्थापकांकरवी नऊ वर्षांपूर्वी स्थापनेने रचलेल्या समाजाभिमुख कार्याचा सृजनशीलतेचा आजचा कळस म्हणजे, चिंचेच्या पानावर देऊळ रचियले, आधी कळस मग पाया रे, म्हणणे क्रमप्राप्त आहे!
लेखक – श्री घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/-
Leave a Reply