जगदलपुर पासून १५ किमी अंतरावर रायपुर हायवेवर बांबूच्या विविध वस्तू बनविण्याचे एक व्यावसायिक केंद्र आहे. एक तडफदारपणे बोलणारी शिक्षिका बाजूला वेटोळे करून बसलेल्या आदिवासी तरुण मुली व बाया ह्यांना बांबू छिनून लांब वेतापासून आकर्षक टोपल्या दिव्याच्या शेड्स, त्यावर कलाकुसरीचे रंगकाम ह्याचे शिक्षण देत होती. आदिवासी तरुण मुली व बाया बांबूच्या आकर्षक वस्तू बनिविण्याचे १५ दिवस शिक्षण घेऊन परत आपआपल्या खेड्यात व्यवसाय चालू करणार होत्या. ते सर्व विकण्याची जबाबदारी खाजगी कंपनी घेणार होती. बाई प्रांज्वळपणे सुरेख हिंदीत सर्व माहिती देत होत्या. प्रशिक्षण देणाऱ्या बाईंना मुंबई बद्दल कुतहूल होते.त्यात आम्ही विमानाने आलो, म्हणजे आकाशातून कसे आलो ह्या बद्दल त्या निरागसपणे प्रश्न विचारत होत्या. बाकीच्या बाया मुलींना आमचे बोलणे काहीच कळत नव्हते. त्या कामात दंग होत्या. फोटो मात्र काढून देत होत्या. आम्ही काढलेले फोटो दाखवताच त्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव मनाला भावले होते.
आमच्या सहलीत आज प्रथमच नक्षलवादींचा विषय निघाला. बाई बोलू लागल्या “गेले दोन दिवस नक्षलीनी बंद पुकारला आहे. सरकारनी तो उलथून टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यात नाहकपणे दोन पोलिस बळी गेले आहेत”. बेनच्या मते सरकारने नमते घ्यायला पाहिजे. ह्या भागात नक्षल लोकांना अंदरके लोग (जंगलात राहणारे) असे संबोधतात. त्यांचे समांतर राज्य आहे. ह्या दोन राज्य यंत्रणे मुळे भोळी भाबडी आदिवासी जनता भरडून निघत आहे. प्रशिक्षण देणाऱ्या बाईंचे बोलणे शांतपणे ऐकून घेण्याशिवाय आम्ही काहीच करणार नव्हतो. संपूर्ण परिसर अनेक डेरेदार वृक्षाने वेढला होता. त्यात बैठी घरे होती. ह्या घरांच्या पडवीत लांबच लांब बांबू तासण्याचे काम चालू होते.रस्त्याला लागून मोठी वस्तू दर्शनालाय (शोरूम) होती. ह्या वस्तूदर्शनालयात शेकडोंनी मूर्ती व अनेक कलाकुसरीच्या वस्तू विक्रीस ठेवलेल्या होत्या. सर्व पाहतांना लक्षात आले की छत्तीसगड राज्य एक प्रगत राज्य असून त्याचे भविष्य उज्वल आहे.
आदिवासींच्या चिंकपाल खेड्यातील आठवड्याचा बाजार:
बस्तर जिल्ह्यात ६० ते ७० टक्के आदिवासी राहतात.त्यांच्या अनेक पोटजाती आहेत. त्यातील काहीना भेटण्याचा योग एका बाजार भेटीत मिळाला.जगदलपुर पासून ३० किमी वर हायवे पासून अनेक छोटे रस्ते पार करत चिंकपाल खेड्यात भर दुपारी पोहचलो.वाटेत जाताना छोटी खेडी लागली त्या खेडयातअगदी १०/१२ व्यवस्थित बांधलेलीघरे होती. प्रत्येक घराला शौचालय होते. घरांना व्यवस्थित रंगरंगोटी केलेली होती. बाजार एक उघड्या मैदानात भरलेला होता. विविध वस्तू विक्री करण्याकरता बायका व पुरुष जमले होते.ह्या सर्वांना हिंदी अजिबात येत नव्हते. एक दोन माणसे आमच्याशी हिंदीत संवाद साधत होते.पहिल्याच गाळ्यात गुलाबाच्या पाकळ्यां सारखी भली मोठी रास होती. ती महुवा फुलेहोती. ही फुले चवीला आंबट गोड असतात. महुवा फुलेही तर बस्तर जिल्ह्यातील आदिवासींची जीव की प्राण वस्तू. ह्या फुलां पासून महुवा दारूबनते. पुढीळ गाळ्यात काळपट गुळाच्या छोट्या छोट्या ढेपींचीरास होती. हा रोज स्वयंपाकात वापरणारा गुळ होता. प्रथम कळतच नव्हते हा काय पदार्थ आहे. लालचुटुक गरगरीत हिरव्या देठाच्या पानासकट टोमॅटो, फ्लाँवर,कोबी, दुधीभोपळे अशा मोठया आकाराच्या कधीही न पाहिलेल्या भाज्या होत्या. ह्या भाज्यांची किमती २ ते ५रु होती. हाराभर भाजी विकत घेण्याचा मोह होत होता.ताजे लाल कांदे,धान्याच्या(लोंब्याच्या) हिरव्या गार जुड्या,सोयाबीनच्या कुरकुरीत बिस्किटा सारख्या वड्या,लसूण तर मोठया कांद्याच्या आकाराचा,लाल, पिवळ्या, निळ्या ,हिरव्या रंगाच्या काचेच्या माळांचे ढीग ह्या बाजारात लावले होते.आमची पावले ताजी ताडी विकणाऱ्या एका बाईकडे वळली. त्या ताडीलासाल्फी म्हणतात. एका मोठ्या अॅल्युमिनियमच्या पातेल्यात फेस आलेली दुधाळ रंगाची मोठया मापट्याने दोन स्टीलच्या बंपर मध्ये ती ताडी ओतली.ताडीचा वासाचा घमघमाट सुटलेला होता. १० रु. दोन ग्लास ह्या दराने ह्या ताडीची विक्री होत होती.आंबट गोड चव, वर रणरणते उनहोते.आम्हाला एका ग्लासातच वेगळीच किक आली.सर्व विक्रेत्या बायका पुरुष आमच्याकडे मिश्कीलपणे बघत होते. बाजूलाच एका मोठया कढईत कांद्याचे डाळवडे तळले जात होते. खमंग चव खुसखुशीत प्लेट मागे प्लेट फस्त होत होत्या.
बाजाराच्या एका कोपऱ्यात एक बाई महुआची दारू हिरव्या बाटलीतून ४० रु. विकत होती. या दारूबद्दल बरेच वाचलेले होते. आमच्या मनाची चलबिचल झाली पण मोह टाळला. म्हातारी आम्हा सर्वांकडे कुतहूलाने पण अतिशय केविलवाण्या नजरेने पाहत होती. माझ्या हातात १० रु. चे नवीन नाणे होते. मी ते नाणे पटकन तिला दिले. तिने घेतले पण तिच्या मनाची चलबिचल चालू झाली. मग लक्षात आले की या भागात अजून १० रु.चे नाणे आलेले नाही. मी पटकन १० रु.ची नोट तिला दिली. तिने प्रथम मला १०रु. चे नाणे परत केले व दिलेल्या नोटेला नमस्कार केला. त्या बाईने माझ्या कपाळाला हात लावून नमस्कार केला. तिच्या डोळ्यातील आनंद पाहून मी धन्य झालो. हा बाजार रहाटाचा विलक्षण आनंददायी अनुभव कायम स्मरणात राहणार होता.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply