
लोकांच्यामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर तो विशिष्ठ पद्धतीने घडवून आणावा लागतो. त्यांची चेष्टा करून त्यांच्या भावनांची टर उडवून लोक अधिकाधिक कट्टर होतात आणि सुधारणांचा हेतूच मातीमोल होतो.
आपल्याला आपल्या सुदैवाने अतिशय समंजस आणि बुद्धिवान संत लाभले, त्यामुळे हळूहळू का होईना आपण मनापासून सुधारणा स्वीकारत गेलो आणि आज आधुनिकीकरणाच्या नव्या नव्या पायऱ्या चढू लागलेलो आहोत.आपले तालिबानीकरण टळले.
लोकांच्या डोक्यात सर्वात अढळ अंधःश्रद्धा असते ती देवाबद्दल. माणूस आधुनिक विचारांचा करायचा असेल तर त्याच्या डोक्यातले हे अंधःश्रद्धेचे ब्लॉक्स विरघळविणे आवश्यक असते. देवाच्या भोवती अनेक सण वार गुंफलेले असतात, अनेकांचे व्यवसाय देवावर अवलंबून असतात, अनेक राजसत्ता देवावर भिस्त ठेऊन उभ्या असतात. हा असा सर्व डोलारा क्षणार्धात उधळून टाकला तर समाज त्या व्यक्तीला उधळून टाकतो आणि अधिक कट्टर होत जातो.
माणसांच्या मनातील हि देवाची प्रतिमा बदलण्याची सुरुवात संपूर्ण भारतामध्ये सर्वप्रथम संत ज्ञानेश्वरांनी केली. आपल्या अलौकिक प्रतिभेने त्यांनी ती प्रतिमा अशी रंगवली की लोकांना गणेशाची मूर्ती अधिक सुंदर का माऊलींचा हा अक्षर गणेश अधिक सुंदर असा प्रश्न पडला. कोणत्याही कार्याची सुरुवात हि गणेश पुजनाने होते आणि गणेश स्तवनाने होते, हे प्रकरण माऊलींच्या बुद्धीला पटणारे नव्हते. पण लोकांच्या भावनांचा अनादर करून त्यांना सुरुवातीपासूनच आपल्या लेखनाच्या मूळ हेतूपासून दूरही जायचे नव्हते.
साहित्याचे मूळ म्हणजे अक्षर आणि लेखनाचा हेतू ज्ञानदान याची सर्वप्रथम पूजा केली. ज्ञान कंटाळवाणे असते, उपमा अलंकार, रस आणि सुरस कथा यांच्यामध्ये ते गुंफून लोकांना दिले तर ते सहजगत्या आत्मसात होते, ते दीर्घकाळ लक्षात राहू शकते आणि लोकशिक्षणाचा हेतू नकळतपणे साध्य होतो.
भाषेतील ज्ञानाला या चातुर्याने सजविणाऱ्या आणि ते पचनासाठी अगदी सहज आणि हलक्या करणाऱ्या चतुर्याची देवता शारदा हिची पूजा करतात.
ज्ञानेश्वरीतील पहिल्या काही ओव्या वाचल्या कि माऊलींच्या प्रतिभेची ताकत लक्षात येते. आणि आपण किती नकळतपणे आपला देव अक्षर रुपात पाहू लागतो, याची आपल्याला कल्पनाही येत नाही.
स्मृती ह्या त्या मूर्तीचे देखणे अवयव आहेत, पुराणातील साहित्य हि मणिभूषणे आहेत, त्यातील पद लिहिण्याच्या पद्धती मधून तत्वज्ञानाच्या प्रमेयांची रत्ने खोवलेली आहेत.साहित्याकडे बघण्याचा माणसाचा दृष्टिकोन स्वच्छ करणाऱ्या या ओव्या अगदी सुरुवातीला लिहून माउलींनी आपल्याला कोणत्याही लेखनाचे रसग्रहण कसे करावे त्यातून नेमकी अर्थांची रत्ने कशी शोधावी? उपमांच्या कथांमधून अर्थांचे मंजुळ ध्वनी कसे ओळखावेत? जटिल तत्वे लेखनाच्या बारीक कलाकुसरीतून कशी समजून घ्यावीत? तर्कांचे परशू चालवून ज्ञान कसे पारखून घ्यावे आणि विरोधी मते भग्नदंताच्या स्वरूपात कशी बघावीत, याचीही दृष्टी ते आपल्याला देतात.
ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवी पासून सुरू होणारे ज्ञानरसाचे सेवन ज्ञानेश्वरी संपली तरीही संपूच नये असे वाटत राहते. कुठलेही अपचन न होता, त्याच्या चवीचा कंटाळा न येता, हे सेवन सतत सुरू राहते. पुढे पुढे आपण आपल्या रोजच्या कृतीमध्ये ज्ञानेश्वरी वाचू लागतो, आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांतून ज्ञानेश्वरी दिसू लागते आणि आयुष्यातील कसोटीमध्ये आपली भूमिका ती तर्कशुद्ध आणि बुद्धिनिष्ठ करते.
आपण सायन्सचा अभ्यास करीत असलो मॅनेजमेंटचा अभ्यास करीत असलो, वकिलीचा करीत असलो किंवा इतर कोणताही आधुनिक अभ्यास करीत असलो तरीही माउलींनी सांगितलेली वाचनाची हि पद्धत विषय आकलन करून घेण्याची हि पद्धत समजून घेतली तर माणूस आयुष्यात कसलाही अभ्यास अगदी लीलया करू शकतो, हे मी स्वानुभवाने सांगतो आहे.
माऊलींच्या साहित्य कौशल्याच्या प्रेमात पडूनच महाराष्ट्रात अनेक संत पुढे आले, त्यांनी आपापल्या परीने मराठी साहित्य लिहिले आणि आपणही माऊलींचा दृष्टिकोन थोडाफारतरी मिळविला आहे हे महाराष्ट्राला सांगितले.माउलींनी मराठी लोकप्रिय केली, तोंडातोंडी केली, अधिकृत केली आणि ती राजभाषा केली.
माउलींनी पुढे जाऊन लोकांचा देवही बदलला, ऋषी मुनींनी लिहिलेल्या विद्वानांनी रचलेल्या अगम्य अशा संस्कृत मंत्रातील देवाच्या प्रार्थना जाऊन त्या साध्या सुध्या बोली भाषेतील अभंग आणि ओव्या बनून आल्या, त्या तुमच्या माझ्या अशिक्षित आजीने आणि आईने रचलेल्या होत्या, कष्टकरी बापाने आणि काकाने रचलेल्या होत्या, त्या सहजपणे समजतही होत्या. त्या स्वानुभवातून स्फुरलेल्या होत्या.सगळ्या अशिक्षित भक्तांची अशुद्ध पण भावपूर्ण आणि अर्थपूर्ण भाषा समजणाऱ्या देवाची वारी करून त्यांनी सगळ्यांच्या खांद्यावर एकच झेंडाही दिला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला जन्म दिला.
मराठी भाषेत अलौकिक साहित्य तयार करणाऱ्या या आद्य मराठी भाषाप्रभूला विनम्र अभिवादन.
— विनय भालेराव.
Leave a Reply