मला सर्वात जास्त आवडलेला कौटुंबिक हिंदी चित्रपट ‘वक्त’ हा आहे. तीन भाऊ, त्यांच्या वडिलांना स्वतःच्या कर्तबगारीवर अतूट विश्वास असतो. ते ज्योतिषाला, त्यांच्याबद्दलच्या भविष्याला थोतांड समजतात. त्याच रात्री भूकंपाने कुटुंबाची वाताहत होते. चित्रपटाच्या शेवटी बिछडलेले सगळे एकत्र येतात. तिन्ही मुलांच्या तीन सुनांना पाहून, आई वडील खुष होतात. या चित्रपटात राजकुमार बरोबर शशिकलाची जोडी होती. चित्रपटातील एका पार्टीमध्ये ‘आगे मी जाने न तू.’ हे गाणं होते. या चित्रपटात शशिकलाने फारच सुंदर अभिनय केलेला आहे.
चार एप्रिल 2021 ला दुपारी बारा वाजता ती ‘आगे’ निघून गेली.आणि तिच्या सिनेकारकिर्दीचा ठेवा तसाच ‘मागे’ राहून गेला.
१९३२ साली तिचा सोलापूर मध्ये जन्म झाला. तिचं बालपण श्रीमंतीत गेलं. १९४७ साली पहिल्यांदा चित्रपटात काम केलं. मात्र खऱ्या अर्थानं कारकिर्द सुरु झाली, १९६२ पासून. सत्तरचं दशक हा तिचा सुवर्णकाळ होता. नायिकेपेक्षा खलनायिकेच्या भूमिका तिच्या वाट्याला अधिक आल्या. खाष्ट सासू, नायकाच्या मोठ्या भावाला मोहजालात गुरफटवून ब्लॅकमेल करणारी खलनायिका तिने अनेक चित्रपटांतून साकारली.
विसाव्या वर्षी तिचं लग्न झालं. दोन मुलींची ती आई झाली. पडद्यावरील तिच्या उतरत्या काळात तिने चित्रसंन्यास घेतला. काही वर्ष या झगमगाटापासून दूर राहिली. मदर तेरेसाच्या कार्याचा तिच्यावर प्रभाव होता.
याच दरम्यान एकदा राजा गोसावींनी आम्हाला फोन केला. कॅमेरा घेऊन घरी या. आम्ही दोघेही राजाभाऊंच्या मुकुंद नगरमधील घरी गेलो. शशिकला त्यांना भेटायला घरी आल्या होत्या. राजाभाऊंनी आमची तिच्याशी ओळख करुन दिली. गप्पा झाल्या. फोटो काढले. आपली आवडती सिनेअभिनेत्री प्रत्यक्ष पहाण्याचा आमच्या जीवनातील तो सुवर्ण’वक्त’ होता.
अण्णासाहेब देऊळगावकर यांनी ‘लेक चालली सासरला’ चित्रपटात शशिकला यांना खाष्ट सासूची भूमिका दिली. चित्रपट रौप्यमहोत्सवी झाला. त्यावेळी त्या चित्रपटाची डिझाईन आम्ही केली होती.
तिचाच गाजलेला ‘फूल और पत्थर’ हा चित्रपट गणपतीच्या दिवसांत रस्त्यावर गर्दीत बसून पाहिला होता. ‘नीलकमल’ चित्रपटात ती होती. शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात तिने अविस्मरणीय भूमिका केल्या.
बऱ्याच वर्षांनंतर शशिकला पुन्हा चित्रपटात दिसू लागल्या. ‘खूबसुरत’ चित्रपटात रेखा सोबत त्यांनी काम केले. काही मालिकांमधून दिसल्या.
वय वाढत होतं. ग्लॅमर पूर्वीसारखं राहिलं नाही. त्यांनी या चंदेरी दुनियेपासून दूर रहाण्याचा निर्णय घेतला. पुण्यात काही वर्षे राहिल्या. शेवटी मुंबईत होत्या. आज दुपारी शशिकला जवळकर, ‘दूर’च्या प्रवासाला निघून गेल्या.
जेव्हा कधी ‘आगे भी, जाने न तू.’ या गाण्याच्या ओळी कानावर पडतील, घरंदाज मराठी अभिनेत्री शशिकलाची आठवण झाल्याशिवाय रहाणार नाही.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
Leave a Reply