नवीन लेखन...

आगीशी झुंजताना

मुंबईत आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात. अग्निशमन दलातील जवान आणि अधिकारी आपला जीव धोक्यात घालून या आगी विझवतात. या विझवताना अनेकदा अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी जखमी तर होतातच पण काही वेळा तर त्यांना प्राणही गमवावे लागतात. ही जीवितहानी टाळायची असेल, तर अग्निशमन दलातील जवानांचे आणि अधिकाऱ्यांचे गणवेश हे परिपूर्ण असायलाच हवेत. अन्यथा, या घटना पुन: पुनः घडत राहतील आणि आगीशी झुंजणाऱ्या या योद्ध्यांचे हे बलिदान व्यर्थच ठरेल!

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील अभय गुजर यांचा हा पूर्वप्रकाशित लेख


‘युद्धस्य कथा रम्याः’ असे म्हटले जाते. युद्धाच्या गोष्टी ऐकायला रंजक वाटत असल्या, तरी युद्धभूमीवर लढणाऱ्या जवानांची आणि अधिकाऱ्यांची परिस्थिती किती गंभीर असते, याची सर्वसामान्य माणसाला तितकीशी कल्पना नाही. देशरक्षणासाठी लढणारे जवान आपले प्राण पणाला लावून लढत असतात आणि वेळ पडली, तर प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देतात आणि देशाचे रक्षण करण्याचे काम करत असतात. या सैन्यदलाप्रमाणेच शहरातील अग्निशमन दलेही काम करत असतात. जेव्हा शहरात मोठी आग लागते, तेव्हा तर या अग्निशमन दलाची परीक्षाच असते.

वाटेतील अनेक प्रकारच्या अडचणींमधून वाट काढत हे दल म्हणजे अधिकारी आणि जवान आग लागलेल्या ठिकाणी पोहोचतात. प्रथम आगीचा अंदाज घेऊन आगीशी लढण्याची व्यूहरचना आखली जाते, कामाचे वाटप होते मराठी विज्ञान परिषद पत्रिका आणि मग प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होते. या कामी जेवढा अनुभव जास्त, तेवढा त्या अधिकाऱ्याचा/ जवानाचा उपयोग जास्त. आणि म्हणूनच प्रशिक्षित अशा अग्निशमन दलातील अधिकारी प्राणाची पर्वा न करता आगीशी मुकाबला करायला पुढे सरसावतात.

यातूनच गोकूळ हाउस, काळबादेवी (मुंबई) येथे लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी श्री. सुनील नेसरीकर आणि त्यांचे उच्चस्तरीय सहकारी सुधीर अमीन, संजय राणे आणि महेंद्र देसाई यांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेत एका प्रकारे मुंबईच्या अग्निशमन दलाचे मोठेच नुकसान झाले. तद्वतच, हे नुकसान थांबवता आले नसते का? असाही प्रश्न उभा राहतो.

विविध प्रकारच्या आगींमुळे निर्माण होणारे तापमान हे त्या आगीत जळणाऱ्या पदार्थांचे गुणधर्म, त्यांचे प्रमाण, त्यांचा ज्वलनबिंदू आणि ज्वलनकाल या निकषांवर अवलंबून असते. आग जर घरगुती उपकरणांना लागली असेल, तर आगीचे तापमान २५० अंश सेल्सियस इतके होते. आग लाकडी फर्निचरला लागली असेल, तर तापमान २६० अंश सेल्सियस इतके असते. आग जर कापडाच्या साठ्याला लागलेली असेल, तर हेच तापमान सुमारे २८५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचते. मात्र, ही आग जर रसायने अथवा पेट्रोरसायने यांची असेल, तर तापमान ३०० अंश सेल्सियस ते ५५० अंश सेल्सियस या दरम्यान असते. म्हणूनच अशा आगीशी मुकाबला करायला जाणाऱ्या जवानाला या सर्व तापमानाला पुरून उरेल अशा अग्निरोधक पोशाखाची गरज असते.

मूलभूत सुरक्षा सिद्धान्त असे सांगतो, की आगीशी झुंजताना योग्य ती अग्निरोधक वस्त्रे, शिरस्त्राणे आणि पादत्राणे पुरवली, तर या जवानांची आगीशी लढण्याची क्षमता नक्कीच वाढू शकते आणि ती क्षमता या आगीला बळी पडणाऱ्या अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांचे प्राणही वाचवू शकते. किमान, बळींची संख्या तर नक्कीच कमी करू शकते.

मग आपल्याला प्रश्न पडेल, की या सर्वांची तरतूद या जवानांसाठी का केली नव्हती? त्या अग्निरोधक वस्त्रामध्ये असे विशेष काय आहे? अग्निशमन दलाच्या जवानांचे आगीपासून संरक्षण करणे हे या अग्निरोधक वस्त्रांचे कार्य आहे. अमेरिकेतील ‘ड्यू पॉन्ट’ या कंपनीने तयार केलेल्या नायलॉन वर्गातील बहुवारिकांवर (पॉलिमर) आधारित ‘नोमेक्स’ आणि ‘केवलार’ हे अग्निरोधक तंतू या पोशाखासाठी वापरतात. ‘अरॅमिड’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तंतूंचे मुख्य गुणधर्म हे त्यांना भरपूर ताणता येणे ( उच्चतन्यता), ताणल्यानंतर पुनः मूळ स्थितीत परत येण्याची क्षमता (स्थितिस्थापकत्व) आणि उच्च तापमानातही टिकून राहणारा मूळचा आकार (आकारस्थैर्य) हे आहेत. यांपैकी मेटाअरॅमिड तंतूंमध्ये अतिउच्च उष्णतारोधन आणि ज्वालारोधन क्षमता असते. हे तंतू ५० अंश ते ६०० अंश सेल्सियस तापमानाला तोंड देऊ शकतात, टिकाव धरू शकतात. म्हणूनच या तंतूंचा उपयोग अग्निरोधक कपडे
बनवण्याकरिता केला जातो.

हे तंतू अतिशय चांगल्या प्रतीचे रसायनरोधकही असतात. त्यांच्यावर सेंद्रिय द्रवपदार्थ, क्षार, आम्ल आणि अल्कली यांचा परिणाम होत नाही. त्यामुळे या तंतूंचा उपयोग हातमोजे, अॅप्रन, संरक्षक बूट आणि तापमानरोधक वस्त्रे, अशा सर्व उत्पादनांसाठी केला जातो. याचबरोबर लोकर, सुधारित अॅक्रिलिक (मॉडॅक्रिलिक) मेलामिन, कार्बन फोम, कोटेड नायलॉन हे अग्निरोधक तंतूंचे आणखी काही प्रकार उपलब्ध आहेत.

अग्निरोधक गणवेशामध्ये कोणते गुणधर्म असायला हवेत असा विचार केला, तर सर्वप्रथम आगीशी झुंजताना जवानाचे डोके, चेहरा आणि मान सुरक्षित राहणे आवश्यक आहे. मेंदू, डोळे, केस, नाक व कान हे शरीराचे महत्त्वाचे अवयव आगीशी झुंजताना शाबूत राहिले पाहिजेत. यासाठी ‘फायर फायटिंग हूड्स’ उपलब्ध आहेत. यांमध्ये शिरस्त्राण आणि मुखवटा (मास्क) या दोन्हींचा समावेश आहे. या शिरस्त्राणाचे कार्य दुहेरी असते. डोक्यावर एखादी जड वस्तू पडली तरी त्या आघातापासून डोक्याचे संरक्षण करण्याएवढे ते मजबूत हवे, तसेच ते शिरस्त्राण अग्निरोधक आणि उष्णतारोधकही असले पाहिजे.

दुचाकीवर बसल्यावर घालण्याचे शिरस्त्राण न वापरण्याकडे लोकांचा कल आहे. त्याची कारणे, ते वजनाला जड, वापरायला आरामदायी नसणे, डोक्यावर घातल्यावर घाम येऊन त्रास होणे अशी आहेत. त्यामुळे आगीशी झुंजताना शिरस्त्राण हे वजनाला हलके, उच्च उष्णतेला तोंड देऊ शकणारे आणि ताकदीने मजबूत असणे आवश्यक आहे. मुखवट्यासाठीसुद्धा याच प्रकारचे गुणधर्म असायला हवेत. अरॅमिडपासून बनवलेली अग्निरोधक शिरस्त्राणे आणि मुखवटे गेल्या चार दशकांपासून उपलब्ध आहेत. भारतीय मानक संस्थेने सुरक्षित शिरस्त्राणे म्हणून त्यांना तीस वर्षांपूर्वीच मान्यता दिलेली आहे. अशी सुरक्षित शिरस्त्राणे तयार करण्यासाठी अॅक्रिलोनायट्राइल बुटाडाइन स्टायरिन आणि हाय-इम्पॅक्ट पॉलिस्टरीन यांचाही वापर होतो. ही शिरस्त्राणे टणक व हलकी असतात, शिवाय उष्णतारोधकही असतात.

बऱ्याच ठिकाणी पॉलिकार्बोनेटपासून बनविलेले, वापरायला हलके व सुटसुटीत, पारदर्शक मुखवटे आगीशी झुंजताना वापरले जातात.

बऱ्याच वेळा आगीत उष्णतेमुळे डोळ्यांना नुकसान पोहोचू शकते. तीव्र आगीकडे दीर्घ काळ टक लावून पाहणेसुद्धा आपल्या डोळ्यांना हानिकारक आहे, हे आपण जाणतोच. त्यामुळे आग व उष्णता या दोन्हींपासून संरक्षण करणारे काळे चष्मेसुद्धा आवश्यक आहेत. जर आग लागलेल्या ठिकाणी विषारी वायू असतील, तर श्वसनासाठी स्वयंपूर्ण उपकरणे वापरावी लागतात. त्यांच्यासाठी लागणारी हवेची/ ऑक्सिजनची नळकांडीसुद्धा खांद्यावर वाहून न्यावी लागतात. या नळकांड्यांत हवा किंवा ऑक्सिजन – उच्च दाबाखाली भरलेला असतो. त्यामुळे अग्निलोळात सापडून त्या नळकांड्यांचा स्फोट होऊ शकतो, तो टाळायला हवा. अन्यथा, त्या संबंधित जवानाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय, स्फोटामुळे आगही भडकू शकते. यामुळेच अशा कामाकरिता वापरल्या जाणाऱ्या नळकांड्याची अग्निरोधकता आणि उच्च दाब सहन करण्याची क्षमता अत्युच्च दर्जाची असावी लागते. इथे दर्जाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

शिरस्त्राण आणि मुखवट्यानंतर क्रम येतो तो अंगावर घालायच्या वस्त्रांचा. ही वस्त्रे जशी अग्निरोधक हवीत, तसेच त्यांच्या शिलाईसाठी वापरलेले धागेही अग्निरोधक हवेत. इतकेच नव्हे, तर बटणे, कॉलर या इतर गोष्टीही अग्निरोधकच हव्यात. अंगावरील गणवेश पुरेसा सैल असायला हवा, म्हणजे त्या जवानाला हालचाली करणे सोयीचे जाते, तसेच त्याला मजबूत असे खिसे असायला हवेत. ह्याचा उपयोग इतर उपकरणे ठेवायला होतो. अलीकडेच मुंबईत चुकीच्या मापाचे गणवेश आणल्यामुळे १७०० गणवेश फुकट गेले. याचे कारण हेच आहे, हे लक्षात ठेवायला हवे.

हाताच्या पंजासाठी अग्निरोधक हातमोजे लागतात. तेसुद्धा योग्य मापाचे आणि जलद हालचालीसाठी सोयीस्कर असले पाहिजेत. आणि अग्निरोधक गणवेशातील शेवटचा, पण तितकाच महत्त्वाचा घटक आहे अग्निरोधक पादत्राणे! या बाबतीत बऱ्याचदा दुर्लक्ष होते; कारण आपण आपल्या पायाकडे दुर्लक्ष करतो. पण सुरक्षित पायांशिवाय आगीशी लढणे ही जवळजवळ अशक्य गोष्ट आहे.

पायांच्या बाबतीत दुर्लक्ष केलेल्या एका आगीचे उदाहरण पाहू. म्हणजे ह्याचा अधिक चांगला खुलासा होईल. सुमारे वीस वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताची घटना. बडोद्याजवळ असलेल्या एका नायलॉनचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याच्या बहुमजली इमारतीत, सर्वांत वरच्या मजल्यावर असलेल्या, बहुवारिकांची निर्मिती करणाऱ्या रिअॅक्टरमध्ये वायूचा दाब वाढून आग लागली. त्यातली वितळलेली रसायने पूर्ण मजल्यावर पसरली. त्याचा एक जाड थरच निर्माण झाला. कंपनीच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने वरच्या मजल्यावर पोहोचले आणि त्यांनी पाणी मारत आग विझवण्यास सुरुवात केली. पण, थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आले, की त्यांचे पाय त्या गरम व चिकट रासायनिक थरांमध्ये रुतले आहेत आणि त्यांना पावलांमध्ये मरणप्राय वेदना होत आहेत.

रुतलेले पाय बाहेर काढताना त्यांच्या पावलांच्या त्वचेची सालटी तर निघालीच; पण काही जणांचे पावलांचे मांसलभाग निघून, त्यांतून आतली हाडे दिसत होती. सगळ्या जखमींना सहा ते आठ महिने इस्पितळात पडून राहावे लागले.

याबाबत चौकशी केली असता समजले, की त्यांना दिलेले शूज हे पुरेशे अग्निरोधक नव्हते.

उपरोक्त उदाहरणामुळे पादत्राणे अग्निरोधक असणे किती गरजेचे आहे, यावर अधिक सांगायला नको. सेफ्टी शूजबाबत आपण बरेच प्रकार पाहत असतो, त्याबाबत ऐकत असतो. त्या शूजवर एक धातुसदृश आवरण लावून ते मजबूत केलेले असतात. पण आगीशी झुंज देणाऱ्या जवानांसाठी नुसते सेफ्टी शूज कामाचे नाहीत. त्याबरोबर त्यांची उष्णतारोधक आणि अग्निरोधक क्षमता उत्तम असायला हवी. या सर्व अग्निरोधक साधनांच्या दर्जाच्या बाबतीत, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मानके नेमून दिली आहेत. अशा साधनांच्या उत्पादकांची उत्पादने ही या मानकानुसार आहेत की नाहीत, हे ठरवण्यासाठी कडक चाचण्यांना सामोरे जावे लागते. त्याशिवाय त्या उत्पादकांना त्यांची उत्पादने आवश्यक दर्जाची असल्याचे प्रमाणपत्र मिळत नाही. म्हणूनच फक्त अशी प्रमाणित उत्पादनेच अग्निशमन दलाने खरेदी करायला हवीत. इथेसुद्धा काटकसर करणे आणि दर्जाशी तडजोड करणे योग्य नाही. सगळ्या एकशे पंचवीस कोटी मुंबईकरांचे आगीपासून संरक्षण करायला खरे तर ५००० अधिकारी व जवानांचे अग्निशमन दल असायला हवे. परंतु, मुंबईच्या अग्निशमन दलात फक्त सुमारे २३०० जागा उपलब्ध आहेत. त्यांमध्येही काही जागा रिकाम्या आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांकरिता असा अग्निरोधक सामग्रीचा एक संच खरेदी करावयाचा असेल, तर त्यांपैकी प्रमुख साधनांचा अंदाजे खर्च पुढीलप्रमाणे आहे. यांतील मुख्य गोष्टी आहेत त्या पुढीलप्रमाणे: जॅकेट रु.३६,०००, टी-शर्ट – रु. ५,५००, पादत्राणे – रु. १६,०००, शिरस्त्राण –
– रु. ४,५००, टॉर्च – रु. ६३० . हे सर्व व त्याच्या अनुषंगाने लागणाऱ्या पॅन्ट, मुखवटा इत्यादी काही साधनांचा खर्च लक्षात घेता, एका संचाकरिता एकूण खर्च होतो सुमारे एक लाख रुपये.

एका जवानाने शौर्याने आगीशी सामना करायचा असेल आणि इतर संकटग्रस्तांचे जीव वाचवताना त्याचा जीव धोक्यात यायला नको असेल, तर हा खर्च सयुक्तिक ठरत नाही का? आणि एका व्यक्तीच्या आयुष्याची आगीत आहुती पडली तर त्यासमोर हा खर्च नगण्यच म्हणायला हवा की नाही? आगीत प्रशिक्षित आणि अनुभवी जवान, तसेच अधिकारी यापुढे आपल्याला गमवायचे नसतील, तर शिरस्त्राणापासून पादत्राणापर्यंत नखशिखान्त स्वरूपाचे अग्निरोधक आणि प्रमाणित गणवेश त्यांना उपलब्ध करून द्यायला हवेत. गोकूळ हाउसच्या आगीपासून तरी आपण हा धडा घ्यायला हवा आणि या अधिकाऱ्यांच्या बलिदानापासून हा एक दंडकच पाळायला हवा. नाहीतर, अग्निशमन दलाच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बलिदान व्यर्थच गेले असे म्हणावे लागेल.

अग्निरोधक गणवेशांची गरज
अग्निरोधक गणवेश हे फक्त अग्निशमन दलाच्या कामगारांसाठीच नव्हेत, तर ज्वालाग्राही पदार्थांच्या सान्निध्यात काम करणाऱ्या सर्वांनाचा आवश्यक आहेत. या बाबतीतले हे एक

उदाहरण:
गुजरातमधील एका तेलशुद्धीकरण कारखान्यात आठ वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. उत्पादन वितरण विभागात झडपा बदलण्याचे काम चालू होते. त्यापासून वीस मीटर अंतरावर एक फिल्टर बदलण्याचे वेगळेच काम सुरू होते. या कामाकरिता ग्राइंडरचा उपयोग करायचा होता. झडप बदलताना १५० ते २०० लिटर नाफ्था अचानक बाहेर पडला. दुर्दैवाने वाऱ्याच्या झोतामुळे नाफ्थ्याच्या वाफा नेमक्या ग्राइंडरच्या संपर्कात आल्या. त्यामुळे अचानक उडालेल्या आगीच्या भडक्यात (फ्लॅश फायर ) चार कामगार तत्क्षणी मरण पावले, दोघे ऐंशी टक्के भाजले, आणखी सोळा जण दहा टक्के ते साठ टक्के भाजले. जास्त भाजलेल्या कामगारांना विमानाने मुंबईला हलवले; पण ते वाचू शकले नाहीत. इतर अनेकांना कायमचे अपंगत्व आले.

या सर्व कामगारांना जर अग्निरोधक गणवेश दिले असते, तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती.

‘फ्लॅश फायर’
बऱ्याच ज्वालाग्राही रासायनिक पदार्थांपासून निघणाऱ्या वाफा जेव्हा आजूबाजूच्या वातावरणात पसरतात, तेव्हा जर त्या वाफा एखाद्या ठिणगीच्या संपर्कात आल्या तर लागलीच पेट घेतात. अशा आगीला ‘डिफ्लॅग्रेशन’ व ‘फ्लॅश फायर’ असे म्हणतात. या आगीची तीव्रता किंवा धग खूप जास्त असते. या आगी गळतीच्या मूळ स्रोताकडे प्रवास करतात (बॅक फायर्स). अशा आगी इंधनाअभावी कधीकधी भडका उडून विझतात. या आगी खूपच वेगवान असतात; त्यामुळे अशा आगींशी झुंजण्याची संधी बऱ्याचदा मिळत नाही. अशा आगींच्या कचाट्यात सापडलेल्या व्यक्ती वाचू शकत नाहीत. मनुष्यहानीबरोबर साधनसामग्रीचापण जळून कोळसा होतो. यासाठीच अशा कारखान्यातील कामगारांना अग्निरोधक गणवेश आणि शूज दिले जातात आणि ते वापरणे सक्तीचे केले जाते. हायड्रोजन, पेट्रोल, स्वयंपाकासाठी वापरला जाणारा द्रवरूप पेट्रोलिअम वायू ही काही ‘फ्लॅश फायर’ निर्माण करू शकणाऱ्या पदार्थांची नावे लक्षात ठेवावीत. मे २०१५ मध्ये नागपूर येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल टँकर रिकामा करत असताना लागलेल्या आगीत संपूर्ण पेट्रोलपंप जळून खाक झाला, हे या प्रकारचे उदाहरण होय.

-अभय गुजर

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..