आहाराचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम गीतेमध्ये अतिशय सुंदर शब्दात वर्णन केला आहे.
दीपो भक्षयन्ते ध्वान्तं
कज्जलंच प्रसूयते ।
यद् अन्नं भक्षयेत् नित्यं
जायेते तादृशी प्रजा ।।
ज्या प्रमाणे दिवा जळतो आणि काजळी तयार होते, तसा जसा आहार तशी परिणति होते.
जसा दिवा तशी काजळी.
म्हणजे जर दिवा तेलाचा असेल तर काजळीचे प्रमाण वेगळे.
जर दिवा तुपाचा असेल, तर काजळी वेगळी.
जर राॅकेलचा असेल तर काजळी वेगळी होते. जर स्पिरीटचा असेल तर काजळी बनणारच नाही.
विमानाचे इंधन वापरले तर कदाचित ज्वालाही दिसणार नाही.
तसेच आपला आहार जसा असेल तसे परिणाम दिसतात.
आहार सात्विक असेल तर, परिणाम सात्विक
आहार राजसिक असेल तर परिणाम राजसिक.
आहार तामसिक असेल तर परिणाम तामसिक दिसेल.
आता सात्विक राजसिक तामसिक म्हणजे काय हे समजवायला इथे जागा जाईल. याची नेमकी उदाहरणे समजून घेण्यासाठी दासबोध वाचा. पूर्ण अध्याय आहेत. प्रॅक्टिकल अध्यात्म कळेल.
तोपर्यंत अगदी थोडक्यात लक्षात घेऊया.
सत्व म्हणजे उच्च विचार
रज म्हणजे मध्यम विचार
तम म्हणजे हीन विचार.
आपण भुकेलेले राहून अतिथीला खाऊ घालणे हा सत्व गुण.
आपण दोघे मिळुन खाऊ हा रज गुण.
माझं मी खातोच, तुझंही अन्न मला कसे मिळेल याचा विचार करणं हा तमोगुण.
हाॅटेलमधे पैसे देऊन विकत घेतलेले तयार असलेले अन्न तामसी गुणाचे,
घरीच बनवलेले पण बाईने बनवलेले राजस गुणाचे आणि आईने प्रेमापोटी बनवलेले सत्व गुणाचे !
आत्ताच बनवलेले गरमागरम अन्न हे सात्विक,
सूर्योदयाला तयार केलेले आणि सुर्यास्तापूर्वी संपवलेले राजसिक, तर रात्र उलटून गेलेले तामसिक होय.
या सर्व प्रकारच्या भोजनातील कॅलरी मोजल्यास त्या कदाचित समानच भरतील, पण सत्व रज तमाचा विचार हा या कॅलरीचार्ट पेक्षा वरचढ ठरतो.
“अतिथी देवो भव ” या भारतीय संस्कृतीमधे या गुणांचा विचार करावाच लागतो. मनातील भाव देखील अन्नावर परिणाम करणारा असतो. तो अगदी धान्य रूजत घालण्यापासून, अन्न ताटात येईपर्यंत, त्यावर होणारा सत्व रज तम या गुणांचा परिणाम कोणत्या मोजपट्टीने कसा मोजता येईल ?
आपण दुसर्याला फसवतोय, हे जेव्हा मनात येते तेव्हा त्याचा परिणाम नकारात्मक होणार हे वेगळे सांगायला नकोच. अगदी अन्नावर देखील !
म्हणूनच भीती बाळगून अन्न खाऊ नका. परान्न सेवन करू नका, विकतचे अन्न खाऊ नका, पैशाच्या मोहाने बनवलेले अन्न यामधे उत्तम गुण असत नाहीत, असे सांगितले जाते ते याच मुळे.
जो भाव मनात असतो तो केवळ पचनापर्यंतच नाही तर पोषणापर्यंत काम करत असतो.
घेतलेल्या आहारातून काजळी कमी आणि प्रकाश, उर्जा जास्त मिळाली की झाले.
सतचित्आनंद मिळालाच म्हणून समजा. !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
01.09.2016
Leave a Reply