जेवण सुरू झालं की, मौन पाळावे.
अजिबात बोलू नये. काही हवे असल्यास आधीच वाढून घ्यावे. परतवाढीचे घ्यायचे नाही, म्हणजे आतूनही खुणा करून बोलायचे नाही. मनानेपण मौन पाळायचे.
मौन पाळणे ही कला आहे. बाहेर न बोलल्यामुळे आतमधे संवाद सुरू होतो. आणि मनाची ताकद जबरदस्त वाढते.
कधीतरी अवयवांशी संवाद साधावा. आतमधे जागा किती आहे. घेतलेल्या आहाराने सारे अवयव खुश आहेत ना, घेतलेला प्रत्येक कण आतमधे उपयोगी पडतोय ना, त्याचे रक्तात, हाडामधे, मनामधे रूपांतर करताना त्याला किती आनंद होतोय,
याचे मोजमाप कधी करणार ?
मौनात हे सर्व साधते.
जेवताना एकमेकांना स्पर्श करू नये, शिंकू नये, आळस देऊ नये, जांभई देऊ नये, डाव्या हाताने वाढून घेऊ नये, एकमेकांचे उष्टे खाऊ नये, एकदा पानावर बसलो की ऊठायचे पण नसते,
जेवणाचे हे एवढे नियम आहेत.?
पण एवढे कडक नियम सांगायला लागलो तर……
“आजपासून आरोग्यटीप वाचायचेच बंद करूया.
अज्ञानात सुख होते.
मस्त चापून जेवत होतो,
जेवताना तरी गप्पागोष्टी होत होत्या.
उगाच या फंदात पडलो..”
असंही मनात येईल काही जणांच्या.
तर काहींना, काहीजणांनी मौन पाळल्याचा खूप आनंदही होईल.
“बरं झालं, आईचं मौन आहे ते, नाहीतर जेवायला सुरवात केली की, हीची आपली अभ्यासाची विचारपूस सुरूच. मग काय आमचे मौनच !”
“चला, आता जेवताना तरी हिच्या आवाजाची कटकट होणार नाही”
“बरं झालं हे मौनात आहेत, नाहीतर सारखं रोज ऐकून घ्यावं लागायचं, मीठच कमी, तिखटच जास्त, काही शिकवलेच नाय का आईने ? ”
सत्य कटू असते.
पण जे सत्य आहे, त्याचा अनुभव एकदातरी घेऊन बघावा ना !
कारण हे सर्व नियम चांगल्या आरोग्याशी निगडीत आहेत.
जंतुसंसर्ग टाळणे, अन्नाचे पचन नीट होणे, पचन झालेले अन्न अंगी लागणे, इ. फायदे नक्कीच दिसतात.
टीव्ही पहात जेवणे, फिरतफिरत खाणे, एकमेकांना अनावश्यक भरवणे, फूड किंवा कुकरी शो मधे एकमेकांचे उष्टे खाणे दाखवणे, दोन्ही हातानी चपाती भाकरी तोडणे, वाढलेल्या अन्नावर टीका करणे, न आवडलेले अन्न ताटात टाकणे, बुफेमधे, स्वतःच्या हातानी अनावश्यक वाढून घेऊन टाकणे, उष्ट्या उजव्या हाताने वाढून घेणे, इ. अनेक ढळढळीत दिसणारे दोष, सांगितल्याशिवाय कसे कळणार ? आणि सांगायचे तरी कोणी ? बरं सांगितले तर राग येतो.
हे नियम आमच्या घरात, आमचे फादर पिढीजात सांगत आलेले होते. पण काही घरात त्यामागील शास्त्र न सांगितले गेल्यामुळे,
हे असे का करायचे?
हे असेच का वागायचे ?
याची उत्तरे देताना, एका पिढीने नको तिथे, मौन पाळल्यामुळे, काही प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. आपापल्या परीने याची वैज्ञानिक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा.
चला, या निमित्ताने, जेवत असताना, आठवड्यातून एकदा तरी असे भोजनमौन किंवा एखादा भोजन नियम पाळून पहावा. आणि आनंद घ्यावा.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
15.09.2016
Leave a Reply