नवीन लेखन...

आहाररहस्य ५

छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत,
अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते. “अरे काय तू, आवरलंस एवढ्यात ? तू आणखी एक जिलबी खा, मी दोन जिलब्या जास्त खाईन…बघू कोण जास्त जिलब्या खाते ते ..”
“मान्य मला. बघ हा, मागे यायचं नाही, ”
झालं पैज लागली.
एकच गलका झाला.
पहिल्या पंगतीत जेवण झालेली काही मंडळी समोर येऊन उभी राहिली, ज्याचं जेवायचं होतं ती जागा अडवण्यासाठी अगोदरच मागे उभी राहिलेली होतीच.

झालं.
आता इज्जत का सवाल सुरू झाला. तू एक मी दोन चा डाव रंगू लागला.
तू पाच मी सहा जिलब्या खाता खाता, वाढणार्‍या पंजाबी ड्रेसना पण चेव चढू लागला.
दहा अकरा..
वीस एकवीस …
डाव रंगत होता,
समोरची मंडळी “खारे तू, आण ग अजून” म्हणत होती, तर मागे उभी राहिलेली मंडळी “आता पुरे, ऊठा आता, कायतरी व्हायला लागेल ” अस म्हणत, त्यांना लागलेल्या भूकेची जाणीव करून देत होती.

आता बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत पाढा पोचला होता, जिलबीच्या बरोबरीने, जिलबीचा अॅण्टीडोट मठ्ठा वाटीत ओतला जात होता.
पण दोन्ही जिलबी बहाद्दर मागे हटायला तयार नव्हते.

शेवटी एकाने हाफ सेंचुरी मारल्यावर डाव सोडला.
कौतुक दोघांचही झालं.
त्या हरण्यातही एक जिंकणं दडलेलं होतं.
जिलबी न खाता सुद्धा, बघ्या मंडळीचंदेखील पोट भरलं होतं.

“हल्ली असं जेवणारी मंडळी दिसतच नाहीत हो,”
“हो, प्रत्येक जण साखरसम्राट ! ”
“आता हगवण लागली नाही, म्हणजे मिळवलं, ”
“कमालच आहे बुवा, या जिलबी खाण्याची ! ”
काॅमेंटसच्या फैरीवर फैरी झडत होत्या..
पन्नास जिलब्यांचा आकडा ऐकूनच काही जणांच्या पोटात गदळू लागले होते.
पण ते दोघे जिलबी बहाद्दर सहजपणाने पुढच्या पंगतीत वाढायलादेखील लागले होते.
दोघांच्याही तब्येती अगदी ठणठणीत होत्या. काही सुद्धा धाड भरली नाही कुणाला….

पण त्या नंतरच्याच पंगतीत जेवायला बसलेल्या तरण्याबांड वाटणार्‍या वाघाला, अवतीभवती वाढणार्‍या एका हरिणीने वाढलेली एक जिलबीसुद्धा जात नव्हती. त्याने इज्जत का फालुदा होऊ नये म्हणून, शिल्लक राहिलेल्या जिलबीचा उरलेला एक तुकडा कसाबसा तोंडात कोंबलान नि धावत सुटला तो लोटा हातात घेऊनच !

पन्नास पन्नास जिलब्या सहजपणाने पचवल्या, आणि एक जिलबी एखाद्याला चक्क दोन नंबरला पळवते ?
असं का बरं झालं ?

…..ठरवून केलेले, मनापासून जेवलेले अन्न, सहजपणाने पचून जाते. मनाची शक्ती अश्या ठिकाणी कामी येते.
मग तिथे वात पित्त कफ यांचा प्रकोप होण्यापेक्षा, मनाची प्रसन्न अवस्था जास्त बलवान ठरते.

मग काम कोणतेही असो, वा भोजन. पण मनापासून केलं तर, कोणताही विकल्प मनात न आणता केलं तर, बहिरे होऊन, फक्त आतला आवाज ऐकत केलं तर, यश नक्की मिळणार, हे नक्की !

आपल्या मूळ सूत्रातील सत्व गुणाचे महत्व सांगण्यासाठी एवढ्या पंगतीत फिरवून आणावे लागले.
पचले ना !
पचणारच !!
मनापासून वाचले तर पचतेच !!!

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
16.08.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..