काळ म्हणजे ऋतु. वेळ !
ठराविक आजार ठराविक ऋतुमधेच होतात, अमावस्या पौर्णिमेला काही रोगाची जसे, दमा, त्वचाविकार, मानसरोग इ.ची काही लक्षणे वाढतात.
याला औषध काय ?
काळ हे सर्व प्रश्नांना रामबाण औषध आहे. असे म्हटले जाते.
ठराविक गोष्ट घडण्यासाठी काही काळ जाणं आवश्यक असते.
बापाची चप्पल मुलाच्या पायात व्हायला सोळा वर्ष जावी लागतात.
थोडं विषयांतर होईल पण सांगतो, आजकाल फळांचे भारीच फ्याड आले आहे.त्यात सगळ्यात जास्ती उड्या पडतात त्या नारळाच्या पाण्यावर ! नऊ महिने नऊ दिवस आणि बाळंत झाल्यानंतरदेखील नऊ महिने, पुढे अगदी फर्स्ट केजी पर्यत नारळाचे पाणी म्हणजे जणु काही अमृतच असे समजून प्याले जाते.
लेस काॅन्टॅमिनेशन, सहज उपलब्ध, टिकावू, अर्वाचीन शोधानुसार रीच इन मिनरल्स, फॅट फ्री इ.इ.
कितना अच्छा है ये नारियल पानी ?
अहो, सगळं खरं आहे.
पण हे सर्व गुण नारळाच्या पाण्याचे आहेत. शहाळ्याचे नाहीत, हे आधी लक्षात घ्यावे.
पाणी प्यायचेच असेल तर पिकलेल्या म्हणजे आपण स्वयंपाकात वापरतो त्या नारळाचे प्यावे. जास्तीत जास्त वाटीभर असते. शहाळ्यासारखे दोन दोन ग्लास नाही.
कोणतेही फळ पिकण्यासाठी जो काळ जातो, तो त्या फळातील गुण पूर्णपणे बदलवून टाकतो.
आले, सुंठ.
खजूर, खारीक.
कच्ची पिंपळी, पक्व पिंपळी.
कच्चा मुळा, जून मुळा.
कच्चे कारले, पिकलेले कारले.
कैरी आंबा, कच्चे केळे पिकलले केळे
द्राक्षे आणि बेदाणे
तसेच शहाळे आणि नारळ !!
उदाहरणादाखल या अश्या काही जोड्या आहेत, ज्यांच्यावर काळाचा परिणाम म्हणून आमूलाग्र बदल, बाह्यरूपात आणि अंतरंगात देखील होत असतो !
लक्षात काय ठेवायचे ?
नारळाचे पाणी म्हणजे शहाळ्याचे पाणी नव्हे.
अपक्व शहाळ्यापेक्षा, काळाचा परिणाम झालेला, पिकलेला नारळ कधीही चांगलाच !
कच्चे फळ पिकण्यासाठी काळ जावाच लागतो. तेवढा वेळ आमच्याकडे नाही. आज का जमाना इन्स्टंट का है , असे म्हणून शहाळ्याचा, नारळ लगेच थोडा होणार ?
तसेच आलेला ताप कमी होण्यासाठी काही काळ जावाच लागतो. कितीही घाई केली तरी ताप काही कमी होत नाही.
“गोळी घेतली तरी अजून ताप उतरतच नाय्यै हो,” असं डोक्याला ताप देणारे अनेक जण असतात.
औषधी पूर्ण क्षमतेने तयार व्हायला पण काही काळ जावा लागतो, आसव अरीष्टांची संधान प्रक्रिया, औषधांना भावना देणे इ. क्रिया, काही औषधे धान्याच्या राशीत पुरून ठेवणे, इ. साठी काळ जावाच लागतो.
अहो, साधा राग आला तरी एक ते शंभर आकडे मोजावेत असं म्हणतात. एक ते शंभर आकडे मोजले तर खरंच राग जातो का ?
नाही.
पण आकडे मोजायला जेवढा वेळ जातोय, तेवढा काळ राग कमी व्हायला पुरेसा असतो.
काळ हे अंतिम सत्य आहे.
थोडा काळ जाऊ दे ! सगळे काही ठीक होईल. म्हणून धीर धरा. जरा वाट पहा.
म्हणजेच “वाट पहाणे” हे पण औषध आहे तर !!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
18.08.2016
Leave a Reply