चव समजण्यासाठी जीभ हा एक अतिशय महत्वाचा अवयव आपल्याला त्याने दिलेला आहे. त्याचा यथायोग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे.
चव कळण्यासाठी लाळ पण तेवढीच आवश्यक आहे. जेवढा वेळ अन्न तोंडात घोळले जाईल, तेवढी लाळ चांगली मिसळली जाईल, परिणाम पुढे पचन सुलभ होईल. आपल्या पोटात काय जाणार आहे. हे चवी मार्फत त्याला आधीच कळत असते. “त्याला” फसवून काहीही करू नये. चेक पोस्ट वरून नोंद न करता एकही वाहन जाऊ नये. तसंच काहीसं आपल्या अन्नाचं असतं. ही जीभ आणि लाळ म्हणजे जणु काही सीसीटीव्हीच असतात. आत काय येणार आहे. हे त्याला आधीच समजलेले असते.
यासाठी त्याचे डोळे, कान, बोटे, नाक हे अन्य गुप्तहेर पण काम करत असतातच.
किमान 100 वर्ष जर राज्य करायचे असेल तर, केवळ एकाच यंत्रणेवर पूर्णपणे विसंबून, अवलंबून न राहाता, अन्य पूरक यंत्रणेच्या सर्व शक्तींचा पुरेपुर वापर करून घ्यावा. ही चाणक्यनीती ज्या राजाला कळते, त्याला नमो नमो करावेसे वाटते. (उगाच नाही, निवृत्त आयकर अधिकाऱ्यांना परत बोलावून घेतलेय !!! )
कोणत्या चवीला पचवायला, किती प्रमाणात, कोणते द्राव, पोटात पाहिजे, हे आधीच कळल्याने येणाऱ्या अन्नाच्या स्वागताला ही सर्व यंत्रणा कामाला लागलेली असते.
घास इकडून तिकडून फिरवत बत्तीस वेळा चावावा असे म्हटले जाते.
……” तुमचे प्रत्येकाचे इथे वेगवेगळे काम आहे, तुमची प्रत्येकाची आम्हाला गरज आहे, वुई ऑल लव्ह यु, आम्हाला सोडून जाऊ नका.” असे या बत्तीस दातांना, सूचक सांगितले तर जात नसावे.?
वाढलेल्या ताटातील सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सरमधून फिरवून, आचूषकाच्या ( स्ट्राॅ च्या) सहाय्याने ओढुन थेट घश्याखाली ओतले असते तर कॅलरी वाईज चौरस जेवण पूर्ण झालेच असते ना ! स्ट्राॅ ने कॅलरीज मिळतील, पण तृप्ती मिळणार नाही.
आणि अश्या ( बफेलोचं आंबोण ) पद्धतीने जेवण्याची, कल्पना सुद्धा करवत नाही. इथेच वेगवेगळ्या चवीने जेवण्याचे महत्व लक्षात येते.
त्याने दिलेल्या या सर्व यंत्रणेचा योग्य तो सन्मान आपण राखला पाहिजे. ज्याचे काम त्याच्याकडून करवून घेतले पाहिजे.
इसी मे तो मजा है !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
30.11.2016
Leave a Reply