आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात, बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकतो ?
एक.
दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिली तर….
दोन अडीज मोसंबी.
यापेक्षा जास्त खाल्ली जाणारही नाहीत.
आणि हल्ली कोणाचे एवढं प्रेम ऊतु जाणारही नाही !
पण मोसंब्याचा ज्युस (रस ) काढून दिला तर ?
एक ग्लास अगदी सहज.
आग्रहाने, स्पेशल कोणी आणून दिला तर…
दोन ग्लास पण नक्कीच पिऊ….
मराठी गझलकार भाऊसाहेब पाटणकरांच्या गझलेच्या भाषेत सांगायचे तर ….
मला तर तो “रस” नकोच होता
मला तर तो “रस” नकोच होता,
पण
तू दिलेला रस
रस घेऊन
घेतला नाही तर….
.
..
…
तुझा विरस होणार होता
आणि नंतर तुझा,
माझ्यातला “रस” कमी होणार होता….
म्हणून प्यावा लागला.
मोसंब्याचा दोन ग्लास रस येण्यासाठी किती मोसंबी लागतात ?
तब्बल सात ते आठ.
माझी रसनेंद्रियांची तृप्ती फक्त एक नाहीतर दोन मोसंबी खाऊन होणारी होती, तिथे सात आठ मोसंब्यांचा ऐवज जर पोटात ओतला गेला तर ?
पचेल का तो ?
नाही ना.
मग ??
आधीच आहे अप्सरा
बटेने झाकला चेहरा
केसात माळला गजरा
चेहराही मंद हसरा
त्यात जरासा नखरा
हाऽय हाऽय्ऽ
काय हा नजारा
फेसाळलेला रस काढलेला
ग्लास समोर भरलेला
त्यात आल्यालिंबाचा रस पिळला
पुनः वरून चाट मसाला भुरभुरवला
गरज नसताना स्ट्राॅ ही घातलेला
एवढासा ग्लास तो किती नटवला
बाकी चवींनी एवढा का सजवला ?
पचायला जड होणारा पचवायला.
स्नेहन, प्रीणन, तर्पण, बृंहण, दीपन, पाचन, व्यवायी, विकासी, आणि ह्रद्य
असे सारे गुण एकाच वेळी, एकाच ग्लासात व्यक्त व्हायला लागले तर रसाजीर्णच व्हायचे. !
फळे हवीत चावून खायला
एवढंस मर्म सांगायला
एवढं हवं होतं का घोळवायला.
असं ज्युस पिणे म्हणजे, स्वतःचा बंगला असताना, बंगल्यात अप्सरा असताना, बंगला अप्सरा सोडून, झोपडीतील खत्रूड मड्डमेवर प्रेम केल्यासारखंच नाही का ?
तोंडात स्वतःचे बत्तीस दात समोर हयात असताना, आणि तिला फसवून (जीभेला) डायरेक्ट घश्यात ज्युस ओतणे, हा शुद्ध अन्याय आहे.
चव निर्माण करणाऱ्यावर,
चव घेण्यासाठी “मी” आहे,
असे सांगणाऱ्या “मी” वर !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.12.2016
Leave a Reply