बदललं, सारंच बदललं.
ते गोरे इंग्रज काय येऊन गेले,
तथाकथित स्वातंत्र्य आम्हाला देऊन गेले
पण जाताना आमचे भारतीयत्व घेऊन गेले.
आमची सर्व दिनचर्या बदलली,
रात्रीचर्या बिघडली,
ऋतुचर्या ही बिनसली,
आचार बदलला
विचार बदलला
उच्चार ही बदलला
आहार बदलला
विहार बदलला
जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोनच बदलला.
एवढा बदलला कि आपण बदलतोय, बदललोय हे कधी लक्षातही आलेलं नाही.
आपल्या डोळ्यासमोर वाढणाऱ्या मुलांमधील बदल आपल्या कधी लक्षातही येत नाहीत. जेव्हा पूर्वी येऊन, मुलांना पाहून गेलेला पाहुणा जेव्हा परत येतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की हा मुलगा बारीक झालाय, उंच झालाय वगैरे.
आपला आरसा आपल्याला बदल कधीही दाखवत नाही. तरी देखील आम्ही आमच्या आरशावर विश्वास ठेवू लागलो. कालचा आरसा आजही तसाच दिसत आहे, आम्हालाही तसेच वाटत गेले, की आपणही तसेच आहोत.
पण हाय दैवा काय झाले,
बालपण संपले, तारूण्यही संपले.
लक्षातही कधी न आले.
आपलं जीवन कसं बदलले.
काळ वेगानं पुढे जातो आहे.
त्याच्या गतीत आपली गती मिसळली नाही तर आपण मागे पडणार हे नक्की. याचा अर्थ असा नव्हे की, चुकीच्या गोष्टींचं समर्थन करत, हो ला हो म्हणत, काळाबरोबर जायचं.
योग्य वेळी योग्य शब्दात, योग्य सुरात, योग्य संधी साधत, सावधपणे पावलं उचलणं गरजेचं आहे.
बदललेलं जसं हळुहळू बदलत गेलं, तसंच चक्र उलट फिरवायचं झालं तरी, ते हळूहळूच सुलटं फिरवावं लागेल. त्यासाठी थोडा काळ द्यावा लागणार आहे.
आता आरोग्याचे शत्रू वाढले आहेत. काही वेळा गोड बोलून, काही वेळा सामोपचाराने सांगून, काही वेळा छुप्या गनिमी पद्धतीने, काही वेळा समोरासमोर युद्ध करून, काही वेळा सर्जिकल स्ट्राईक करून, तर काही वेळा आरपार की लढाई करावीच लागेल.
युद्ध करायचेच आहे. लढायचेच आहे आणि हरण्यासाठी नव्हे, जिंकण्यासाठी. कारण मागेपरतीचा दोर आता कापूनच टाकलेला आहे.
मागे फिरलात तर मृत्यु ….
आणि
फिरून पुढे गेलो तर विजय !
आपला संकल्प,(शंभर वर्ष आयुष्य ) आपलं ध्येय ( निरोगी निरौषधी आयुष्य ) निश्चित असताना आणि सर्व शक्तीमान परमेश्वर आपल्यासोबत असताना घाबरण्याचे काय कारण ?
भीती न आम्हा, तुझी मुळी ही, कडकडणाऱ्या नभा, असे बेदरकारपणे सांगणाऱ्यांचे आम्ही वंशज आहोत.
गरज आहे ती एका सुरात, एकसाथीने, एकदिलाने म्हणण्याची ….
फक्त
हरहर महादेव !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
02.12.2016
Leave a Reply