नवीन लेखन...

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७४

यहा सब कुछ चलता है !

पंजाबमधे मोदक, केरळमधे डाल बाटी, गुजरातमधे रस्सम, कलकत्याला पुरणपोळी, कसं विचित्र वाटते ना ऐकायला सुद्धा !

पण महाराष्ट्रात, सब कुछ चलता है
मक्के की रोटीपासून, सर्व डोसाआयटम, रोसगुल्ला, मख्खनवाला, बिर्याणी, पासून थाई, मेक्सिकन, इटालीयन, चायनीज पर्यंत सर्व पदार्थ घराघरात सुद्धा बनवले जात आहेत. ते एवढे अंगवळणी झाले आहेत, कि ते बाहेरून आले आहेत, हे सांगूनही खरे वाटणार नाही.

अगदी नाव घेऊन सांगायचे तर गव्हाची चपाती. ही कोकणासाठी एका काळी पक्वान्न होती. सणासुदीला गहू घरात यायचा. कारण कोकणात गहू पिकतच नव्हता, अजूनही पिकत नाही. म्हणून बाहेरून विकत आणायला सुरवात झाली. डाॅक्टरनी सांगितले म्हणून….

आणि कोकणी माणूस रोज पक्वान्न खाऊ लागला. एका बाजूने रोज शरीर पुष्ट करणारा गहू कोकणात घराघरात घुसला. आणि वैज्ञानिक क्रांतीची भेट म्हणून व्यायाम कमी करणारी उपकरणे थेट स्वयंपाकघरात ठाण मांडून बसली आणि दुसऱ्या बाजुला विकतचा व्यायाम करवणारी, वैज्ञानिक, आधुनिक उपकरणे असलेली जिम गावागावात गवगवा होत सुरू झाली.

आहारातील या ग्लोबल बदलाचे परिणाम रोग स्वरूपात भोगावे लागणार आहेत हे नक्की. बदलाचे परिणाम आपणा सर्वाना समोर दिसत आहेत. सुदृढ, काटक, कोकणी माणसाची पोटे सुटु लागली. बुद्धीजीवी, बैठे काम करणारा श्रमजीवी शेतकरी, मधुमेहासारख्या आजाराच्या फाईल्स, मोठ्या अभिमानाने डाॅक्टरांच्या टेबलवर आपटून टाकू लागला.

बदलंलय सारं…

वैद्यकीय बिरूदावली थोडा वेळ बाजुला काढून, शांत डोक्याने जरासा विचार केला तरी, मेंदूला झिणझिण्या येऊ लागल्या….

किती कमी वेळात, आमची विचारशक्ती बदलून गेलीय, औषधाशिवाय आम्हाला जगताच येणार नाही, अशी मानसिकता, आमची आम्हीच करून घेतलीय, नव्हे आम्हाला तशी करून दिली जाऊ लागलीय.

काय झालं एखाद्या रोगावरची औषधे कायम स्वरूपी घ्यावी लागली तर….
आता तर रोग पाचवीला पुजलेले आहेत….
हे रोग तर होणारच आहेत……
काही रोगांना आता मित्र मानले पाहिजे…
पथ्यापथ्य वगैरे आम्हाला काही जमणारे नाही, त्यापेक्षा एखादे औषधच आम्हाला द्या….
रक्तदाब, मधुमेहावरील औषधे ही, औषधे वाटतच नाहीयेत. ती तर…. अन्न, पाणी आणि श्वासासारखी….कायम स्वरूपीच घ्यायची असतात…..त्यांच्या अन्य रोगांना जन्माला घालणाऱ्या दुर्गुणांसकट !!!

इथपर्यंत मानसिकता बदलत गेलीय….

एक आहार बदलला तर त्याचे दूरगामी परिणाम इतके भयावह असतील असे वाटले नव्हते.

प्रांतीय, स्थानिक आहार हा जन्मापासूनच आपण सेवन करत असल्यामुळे तो त्रासदायक ठरत नसतो, हा नियम विसरू नये.

पण ओढून ताणून पिकत नसताना, विकत आणून, गव्हाचे मूळ चिकट, कफवर्धक गुणधर्म, गहू तरी सोडणार आहे का ? मग आमच्या पुढच्या पिढीला आम्ही जाणकारांनी नवीन रोगांच्या तावडीत का सापडू द्यायचे ?….

आपल्या डोक्याला कशाला ताण उगीचच, असे आपणच आपल्या मनाशी ठरवित, पुनः शिल्लक राहिलेल्या मेंदूवर, वैद्यकीय पदवीची बिरूदावली ओढून शांत झोपी जायचे….
वाळूत डोके खुपसून बसलेल्या शहामृगासारखे….

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
06.12.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..