आपण आजारी कधी पडतो ?
….काही तरी चुकलं तर. !
काहीवेळा याचे कारण तात्कालिक असते, तर काही वेळा काही कारणांचा आधीपासून साठा /संचय झालेला असतो, कधीतरी ते निमित्त मिळून ऊफाळून वर येते, एवढेच !
म्हणून ही कारण शोधून काढली की झालं.
त्यातील एक कारण..
परान्न !
परान्न म्हणजे आपल्या समक्ष न बनवलेले अन्न. ते बनवताना नेमके कोणते संस्कार केले गेलेत, त्यात काय काय घातले गेले आहे ? त्याचे परिणाम दुष्परिणाम माहीत नाहीत, असे अन्न.
आजच्या भाषेत बाजारी टिकावू खाद्यान्न, बेकरी फूड, हाॅटेलचे खाद्य, डबाबंद खाद्यपदार्थ, अर्धतयार अन्न, म्हणजे अगदी स्पष्टच सांगायचं तर किंडर, जेम्स सारखी चाॅकलेटस्, लेज, कुरकुरे, दो मिनट नूडल्स, पेप्सीकोक, मॅक आणि पिझ्झा हट्टचे अन्न इ.इ.
हे सर्व तयार करताना कसली तेलं, पीठं पाणी वापरतात, कसं समजणार ? हे सर्व परान्न.
परान्न सेवन करू नये, असे एक वचन आहे. का ? कशासाठी?
जर आपण ठरवले की आपणाला शंभर वर्ष जगायचे तर त्यामधे येणारे अडथळे कोणी दूर करायचे ?
आपण जे अन्न खातोय ते आपल्या हिताचे आहे की नाही हे कोणी ठरवायचे ?
बाहेरून घरात येणारी फळफळावळ, धान्य, कडधान्ये, पालेभाज्या, गुळ, साखर, पावडर, यावर वापरली जाणारी रसायने ?
थेट आपल्या पोटात जातात. नीट धुतल्याने थोडा दोष कमी होईल पण यांची वाढ लवकर होण्यासाठी वापरलेली संप्रेरके आणि रासायनिक खतांचे काय ?
पण आपण आज ही परान्ने टाळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जेवढे शक्य आहे तेवढे या रसायनांपासून लांब राहू, तेवढी आपली प्रतिकार क्षमता वाढत जाणार आहे, हे नक्कीच !
नाहीतर बिचार्या एकुलत्या एका यकृताला आतमधे एवढे काम करावे लागतेय की, कामाच्या ओझ्याखाली दबून, यकृताचा काम करण्यातला आनंद आणि उत्साह देखील संपून जातो.
या आतील अवयवांचा, त्यांच्या यथोचित मागण्यांचा, वेळीच विचार केला नाही, आणि हे अवयव अचानक संपावर गेले तर ?
या शुद्धीकरणात महत्वाची भूमिका घेणार्या यकृत, किडनी, आतडी, या अवयवांवर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी हे परान्न टाळायला हवे.
यावर उपाय कोणता ?
एकतर आपल्या गरजा कमी करणं किंवा हे सर्व पदार्थ घरी तयार करण्याचा प्रयत्न करणे.
बाईनं तिचं पोट भरण्यासाठी केलेलं जेवण आणि आईनं घरातील सर्वांच पोट भरण्यासाठी केलेलं जेवण यात फरक आहेच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
20.08.2016
Leave a Reply