मी कोणता आहार घ्यावा ?
मांसाहार घ्यावा की घेऊ नये ?
जेवणात काय असावे ? नसावे ?
तेल कोणते वापरावे ?……
……
असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात अगदी श्रावण महिन्यातील पिंग्या प्रमाणे फेर धरून नाचत असतात.
या प्रश्नाचे नेमकेपणाने उत्तर देणे कठीण आहे.
दूष्यम् देशम् बलम् कालम् या सूत्रानुसार किमान दहा गोष्टींचा विचार, किमान दहा वेळा तरी करावा लागेल, तेव्हा कुठे हे “परम्युटेशन काॅम्बीनेशन ” थोडेफार जुळेल.
हे दहा घटक जुळतील, असा ग्रंथोक्त आहार, एका घरात सुद्धा घेणे, असे जेवण रोज बनवणे शक्य होणारे नाही.
आणि
इथे प्रत्येकाची प्रकृती वेगळी, प्रत्येकाचे वय वेगळे, प्रत्येकाची आवडनिवड वेगळी, प्रत्येकाची “अॅलर्जी” वेगळी, प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी, प्रत्येकाची मानसिकता वेगळी, प्रत्येकाची ताकद वेगळी, प्रत्येकाचे दैव वेगळे…
मुखी कुणाच्या पडते लोणी,
कुणामुखी अंगार..
बरं. एकवेळ हे सर्व जरी जुळवून आणले सुद्धा, पर यदी इस वक्त का खाना मेरे नसीब मे नही है तो, कुछ ना कुछ ऐसा होगा, की थाली मे परोसा हुआ भी मुॅह मे जाना, नसीब नही होता !
फिर क्या करे ?
एवढी विविधता जर एका घरात येत असेल तर, आहाराचे निश्चित धोरण ठरवणे, कठीण आहे.
याला व्यावहारिक स्तरावर एकच उत्तर सुचते, ते म्हणजे आपला आहार पारंपारीक घ्यावा.
या पारंपारीक आहाराचा फायदा असा होतो की, बाकी ग्रंथोक्त नियमावर बोट ठेवून वागावे लागत नाही. हमारी मान्यता ऐसी है ! ही योग्य सोयीस्कर व्यावहारीक वाट आहे.
जर आपल्या पारंपारिक पद्धतीने आहार बनवला गेला तर त्याचे काही फायदे आहेत.
अगदी जात पोटजात, धर्म यांचा विचार केला तरीपण या गोष्टी पचनी पडू शकतील.
जसे, एकाच चाळीत रहाणार्या दोन धर्मातील दोन कुटुंबाचा आहार वेगळा. दोन हिंदु कुटुंबांचा आहार वेगळा, म्हणजे एक कट्टर मांसाहारी तर दुसरा शुद्ध शाकाहारी. दोन जातींचा आहार वेगळा. ब्राह्मणाकडचा वेगळा, क्षत्रियांघरचा वेगळा, ..
एवढेच काय तर दोन ब्राह्मणांकडचा पण आहार वेगळाच असतो.
एकाच्या घरी वरणातील डाळ शोधावी लागते, तर एका घरी डाळीत फक्त पाणी घालून शिजवले की त्याला वरण म्हणतात. त्यात जिरे, नारळाचा रस, हिंग असं काही नसते.
लग्न होऊन दुसर्या घरी गेलेल्या प्रत्येक लक्ष्मीला हे बारकावे समजून येत असतील.
एवढी जर असेल विविधता.
तर आहाराचे एक सूत्र कसे येईल ठरवता ?
साधे सोप्पे उत्तर.
आईने ( किंवा आईंनी, म्हणजे सासुबाईंनी) शिकविलेल्या आपल्या पारंपारीक आहारतंत्राचा वापर युक्तीने आपापल्या स्वयंपाक घरात करायचा. आणि मनसोक्त पोटभर जेवायचे….
लमाणी लोक कसे हातावरच फक्त चटणी भाकर खात, मस्त पोटभर जेवतात आणि आपल्या चौरस आहारापेक्षा दुप्पट ताकद कमावतात…
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
22.08.2016
Leave a Reply