नवीन लेखन...

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग १९

खावे. पण गरज असेल तर खावे.
खावे. पण आवडत असेल तर खावे.
खावे. पण हितकर असेल तर खावे.
खावे. पण सहज उपलब्ध असेल तर खावे.
खावे. पण भूक असेल तर खावे.
खावे. पण पचवू शकत असेल तर खावे.
खावे. पण तयार करता येत असेल तर खावे.
खावे. पण जिभेला चव असेल तर खावे.

सगळ्या यातना काढतोय त्या पोट भरण्यासाठीच !
आणि आपल्या कृतीने जर..
पोटच बिघडत असेल तर, कशाला खावे ?
पचवू शकत नसू तर, कशाला खावे ?
गरज नसेल तर, कशाला खावे ?
आवडत नसेल तर, कशाला खावे ?
पिकतच नसेल तर, कशाला खावे ?
विकतचे आणून कशाला खावे ?
तोंडाला चव नसेल तर कशाला खावे?

केवळ आस्य आहे म्हणून ?

मुखी घास घेता करावा विचार,
कशासाठी मी, हे अन्न सेवणार ?
प्रत्येक घास खाण्यापूर्वी असा विचार करावा.

जीभ हा अत्यंत स्वार्थी अवयव आहे.
“मला बरं वाटतंय म्हणून मी खातेय,
इतरांना होणाऱ्या यातनांचे मला काय ?
असा अविचार जीभ करते.

ज्या एकीमुळे अवयवांची युती तुटत असेल, तिचे काय करायचे ? असे ठरवून बाकीचे सगळे अवयव त्याच्याकडे मागणी करतात, तो सर्व शक्तीमान तिला शिक्षा फर्मावतो, आणि जीभेची चवच काढून घेतो.
कठोर शिक्षा !
तिच्यावर बहिष्कार.
“तिला जे हवंय ते द्यायचं नाही, जोपर्यंत बाकीच्या अवयवांच्या यातना संपत नाहीत, पुनः युती होत नाही, तोपर्यंत तिला विसरून जा.”
आणि तो तिची चवच काढून घेतो.

आता यापलीकडे जाऊन जो हट्टाने खाणार त्याला प्रमेहासारखी शिक्षा तोच देणार.

डाॅक्टरांकडे गेल्यावर त्यांना पहिल्यांदा बघावीशी वाटते तीला. जीभेला. तपासायला दाखवायला सांगतात ती जीभ. तिला तपासल्यानंतर डाॅक्टरना सहज कळते, आत हिने काय काय घोटाळे करून ठेवले आहेत ते !
आणि डाॅक्टर देखील पथ्य सांगतात, जोपर्यंत अवयवांची तिच्याशी परत युती होत नाही, तोपर्यंत, हे अजिबात खाऊ नका. तमुक पिऊ नका.
हे युती तुटणे अगदी पुरातन काळापासून चालत आलेले आहे. हे ज्याला कळले तो तरला.

आपले पूर्वज देखील काही कमी खवय्ये नव्हते. वेगवेगळ्या चवींचे, वेगवेगळ्या संस्कारांचे, एकाहून एक सरस पदार्थ तयार केले जात होते. ते लिखित स्वरूपात क्षेमकुतुहल सारख्या ग्रंथात पहायला मिळतात. त्यावेळेच्या पदार्थांची नावे संस्कृत मधील होती. आता बोलीभाषेत वेगवेगळी तयार झाली. आणि सर्व पदार्थ उत्तमात उत्तम द्रव्ये वापरून केले जात होते. साजूक तुपातल्या जिलब्या, गावठी गाईच्या दुधाची रबडी, घरातल्या चक्क्याचे रवाळ रसाला म्हणजे श्रीखंड, घरात जात्यावर ओव्या म्हणत दळलेल्या पीठाचे वडे किती सांगू ?
आता फक्त फरक एवढाच आहे की सगळे पदार्थ विकतचे, पामतेलात तळलेल्या जिलब्या आणि डालड्यात तळलेले कृत्रिम गुलाबाचा वास घातलेले गुलाबजाम. फरक आहेच ना !

जिभेचे चोचले नव्हते ते, त्यावेळची गरज होती. श्रम पण तेवढेच होते ना ! आता श्रम कमी झाले आणि खाण्याचे पदार्थ अति झालेत. परिणाम आजुबाजुला दिसतोच आहे.

आणखी एक फरक लक्षात येण्याजोगा, तो म्हणजे पूर्वी पुरणपोळीसाठी होळी पौर्णिमेच्या दिवसाची वाट पहावी लागत असे. गुळपोळ्या फक्त संक्रांतीला, श्रीखंड फक्त पाडव्याच्या मुहूर्तावर. लग्न मुंज असेल तरच लाडू. नाहीतर नाही.

आता बाजारात केव्हाही जा.
जो जे वांछिल तो ते सर्व काळ !
सर्व मधुर रसाचे पदार्थ चाॅकलेट पासून गुलाबजाम पर्यंत, मुबलक प्रमाणात समोर हजर असतात.

आपल्या सणांची रचना त्या त्या वातावरणातील हवामानावर आणि उपलब्ध साधनसामुग्री वर केली गेली आहे. त्यामुळे त्यावेळी ते पदार्थ खायलाच हवे असतात. आता जानेवारी फेब्रुवारी मधे अगदी रथसप्तमी पर्यंत तीळाचे लाडू मिळतात, ते आत्ताच, या सीझनला खाण्यासाठीच असतात.

सणांच्या निमित्ताने खाल्ले तर मनाची, वातावरणाची, परवानगी घ्यायची बिलकुल गरज नाही.
नाहीतर नंतर या मधुर सुखाच्या यातना ठरलेल्याच !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.02.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..