नवीन लेखन...

प्रमुख आहार सूत्र – भाग ४

दुधाचा जो उल्लेख या सूत्रात केलाय, ते नक्की देशी गाईचेच आहे का ? अशी विचारणा काल काही गोप्रेमींनी, काही राजीव दीक्षितजीच्या अनुयायांनी केली. मला कोणाच्याही व्यक्ती भावना दुखवायच्या नाहीयेत, पण जे चुकतंय त्याची दुरूस्ती केल्याशिवाय पूर्ण आरोग्याची प्राप्ती होणार नाही, हे लक्षात घ्यावे.

काय झालंय, ज्याला त्याला प्रत्येकाला आपण सांगतोय तेच बरोबर असे वाटतेय. आणि मूळ सूत्र बाजुलाला पडते. वाग्भटजींना नेमकेपणाने काय सांगायचे आहे, तो मुळ मुद्दा मुळ ग्रंथातून कोणीच वाचलेला नसतो. केवळ राजीवजी दीक्षित सांगतात, म्हणजे ते बरोबरच, असा हेका धरून नाही, चालणार !

सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की, मी आज जे लिहितोय, बोलतोय, विचार करतोय, तो फक्त आणि फक्त राजीवजींच्या प्रभावामुळेच. जर राजीवजी माझ्या आयुष्यात आले नसते तर आजचा मी, असा घडलोच नसतो. मी एवढा भाग्यवान आहे, की प्रत्यक्ष राजीवजींबरोबर मी स्वतः सहा वर्षे काम केले आहे. राजीवजी माझे सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावहारिक, बौद्धिक गुरू आहेत. वर्ध्यापासून अगदी राजस्थान, गुजराथ, कर्नाटक सर्वत्र त्यांच्याबरोबरीने फिरलोय. आजादी बचाओ आंदोलनाच्या स्थापनेपासून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय. अनेक गोष्टींवर आमची चर्चा होत असे. राजीवजी हे होमियोपॅथीमधले उत्तम निष्णात होते. तशी पदवीसुद्धा त्यांच्याकडे होती. आमच्या चर्चेमधून देशी स्वदेशी विदेशी बद्दल जेव्हा चर्चा व्हायची, तेव्हा होमियो औषधे परदेशातूनच आयात करावी लागतात, त्यापेक्षा स्वदेशी आयुर्वेदातील सूत्रांचा आपण आपल्या भारतीय पद्धतीने का विचार करू नये, हा विचार राजीवजींना पटला, आणि या चर्चेनंतर त्यांना वाग्भट हा ग्रंथ पुणे येथील जागतिक आयुर्वेद परिषदेच्या वेळी सप्रेम भेट दिला. त्यानंतर आमची दूरध्वनी वरून काही विषयावर चर्चा व्हायची. तेव्हा एखाद्या ग्रंथाचा अभ्यास कसा करायचा असतो, हे मला शिकायला मिळाले. आम्ही ग्रंथ अभ्यासला तो केवळ परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी. पण राजीवजींनी भारतीय पद्धतीने हेच भारतीय ग्रंथ कसे अभ्यासायचे हे शिकवले.

फक्त या आयुर्वेदीय ग्रंथाची शैली ही केवळ शब्दशः भाषांतर अशी नसल्याने काही वेळा नेमकेपणाने भाषांतर केले तर अर्थ बदलतात आणि अर्थाचे अनर्थ होतात. श्लोकांचे इन बिटवीन द लाईन्स अर्थ वेगळे होतात, ते अर्थ अगोदरच्या आणि नंतरच्या श्लोकांच्या आधारे, तर्काने लावायचे असतात, हे पण राजीवजीना पटले होते. पण दुर्दैवाने त्यांच्या चेन्नई येथील व्याख्यानानंतर ! तोपर्यंत त्यांच्या आरोग्यावरील वाग्भटजींच्या व्याख्यानांच्या सिडीज प्रसारीत सुद्धा झाल्या होत्या. आणि नंतर, नियतीनेपण ही चुक सांगायला आणि सुधारायला संधीच दिली नाही. आज भारतामधे होत असलेला सकारात्मक बदल पहायला आणि पुढे मार्गदर्शन करायला राजीवजी हवेच होते पण……..
या पणपाशी नियतीने आम्हाला थांबायला सांगितले.
.
.
.
.
.

वाग्भटजी पूर्वी देखील अनेक शास्त्रकार होऊन गेले, चरक सुश्रुत यांनी लिहिलेल्या ग्रंथातील काही सोपी आणि व्यावहारिक सूत्रे वाग्भटजीनी संकलीत केली. त्यातील चरकाचार्यांनी प्रमेह प्रकरणामधे सांगितलेले हे अत्यंत महत्वाचे सूत्र. मधुमेह होऊ नये या करीता सांगितले गेलेले हे सूत्र आता विस्ताराने बघूया. कोणतेही पूर्वग्रहदूषित न ठेवता या सूत्राचा नव्याने अभ्यास करूया. राजीवजींनी जी दृष्टी दिली ती आपल्यामधे उतरवण्याचा प्रयत्न करूया, पुनः एकदा इतिहासातील वैभवशाली भारत अभ्यासूया, आणि भारताला आरोग्यसंपन्न भारत बनवूया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

मूळ सूत्र असे,

आस्यासुखं स्वप्नसुखम् दधिनी
ग्राम्यौदकः आनूपरसः पयांसि ।
नवान्नपानं गुडवैकृतंच
प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम ।।

पय म्हणजे दूध. म्हणजे देशी गाईचे दूध असा अर्थ होतो. जिथे जिथे दूध असा उल्लेख येतो, ते दूध म्हणजे गाईचे. आणि गाय देशी. जिथे घृत असा उल्लेख येतो, तिथे गाईचे तूप, दही, ताक, लोणी, मूत्र, शेण याच्या बाबतीत जाणावे असे एक सूत्र ग्रंथामधे आधी येऊन गेले आहे. परत परत आम्ही सांगणार नाही. असे वाग्भटजी म्हणतात. जिथे बदल अपेक्षित असेल तिथे आमच्याकडून नेमकेपणाने सांगितले जाईल. अन्यथा दुग्धादि सर्व गाईचेच जाणावे.

जसे कोणत्याही कार्यक्रमामधे सुरवातीला जो प्रास्ताविक करतो, त्यानेच व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाचे पद आणि नाव यांचा उल्लेख करायचा असतो. अगदी थोडक्यात त्याची प्रतिष्ठा सांभाळायची असते. पण एकदा खुर्चीवर बसलेल्या अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मा.खासदार आमदार, अमुक बॅकेचे चेअरमन, तमुक गावचे सरपंच, मा. पोलीसपाटील असे सांगून झाले की, नंतर व्यासपीठावर स्वागतासाठी येणाऱ्या, किंवा अन्य प्रमुख वक्ते, अध्यक्ष, चेअरमन, आणि आभार प्रदर्शन करणाऱ्यांनी फक्त आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सज्जनहो, असे म्हणून आपला विषय पुढे सुरू करावयाचा असतो. येणारा प्रत्येक वक्ता जर स्टेजवर बसलेल्या सर्वांची नावे घेऊ लागला तर ते श्रोत्यांना कंटाळवाणे होते. तसेच……
म्हणजे इथे जो पय असा उल्लेख केला आहे तो गाईचे दूध असाच होतो. आणि त्याकाळी गाईंचा वर्णसंकर न झाल्याने या सर्व गाई देशीच होत्या. हो आणखी एक गोष्ट. मूळ सूत्रात पय असे न म्हणता पयांसि असा शब्द वापरला आहे, याचा अर्थ केवळ गाईचेच नव्हे तर म्हैस, शेळी, मेंढी, या अन्य सर्व दुधांचे अतिसेवन हे मधुमेहाचे कारण आहे.

ज्याचे अन्न फक्त दूधच आहे असे बालक सोडून अन्य पालक वर्गाने याचा विचार करावा.
आजच्या पुरते खूप झाले. आज एवढे लक्षात ठेवूया,
चहातले दूध चालते, पण दुधाचा चहा नको.

वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.01.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..