नवीन लेखन...

आहे मनोहर तरी.. (भाग तिसरा)

केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून पहिल्या तीनेक वर्षात विकासाची कामे झाली, नाही असं नाही. काही सुपरिणाम डोळ्यांना प्रत्यक्ष दिसू लागलेत, तर काही आगामी काळात दिसतील याविषयी मला शंका नाही. त्याचमुळे सरकार आल्यापासूनच्या पुढच्या तीनेक वर्षात झालेल्या बहुतेक सर्व पातळीवरच्या निवडणूक भाजपने जिंकल्या. याला ब्रेक लागला तो गुजरात निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या कर्नाटक, राजस्थान आणि मध्यप्रदेशातल्या निवडणुकांत. गुजरातमध्ये भाजपाला सत्ता राखण्यात जेमतेम यश आलं असलं तरी, भाजपचा जनाधार कमी झालेला दिसतो आहे. इतर दोन मोठ्या राज्यांतली सत्ता भाजपने अगदी थोड्या फरकाने गमावली. हा फरक बहुतकरून ‘नोटा’ या पर्यायाला प्राधान्य देणाऱ्या मतदारांच्या वाढत्या संख्येमुळे होता, असं मानायला जागा आहे. ते हेच मतदार होते, ज्यांनी २०१४ च्या निवडणुकीत व त्यानंतरच्या तीनेक वर्षांत झालेल्या इतर पातळीवरच्या निवडणुकांत जात-पातधर्म-पंथ-प्रांत विसरून बहुसंख्येने भाजपाप्रणित एनडीएला मतं दिलेली होती. तर मग त्याच मतदारांनी, गेल्या दीडेक वर्षांत झालेल्या निवडणुकांत भाजपचा जनाधार काढून घ्यायला का सुरुवात केली, हा प्रश्न भाजपचा मतदार म्हणून मला सतावतो. ह्या प्रश्नावर जेंव्हा मी त्यांच्या जागी मला कल्पून विचार करतो, तेंव्हा काही महत्वाची वाटणारी कारण माझ्या ध्यानात येतात. त्यापैकी काही कारणांची चर्चा मी गेल्या दोन स्वतंत्र भागात केली आहे. सदरच्या तिसऱ्या भागात तेवढ्याच महत्वाच्या कारणांची चर्चा मी करणार आहे.

भाजपचा जनाधार कमी होत जाण्यामागे सर्वात महत्वाचं कारण आहे म्हणजे भाजपचे वाचाळ भगवे नेते, भाजपशी नातं सांगणाऱ्या काही संघटना आणि सोशल मीडियावर सुरळसुळणारे भाजपचे अतिउत्साही समर्थक, ज्यांना कुचेष्टेने भक्त असाही म्हटलं जात. हे सर्वजण आपण भाजपचे अधिकृत प्रवक्ते आहोत असाच समजून आपल्या अकलेचे तारे तोंडात असतात. याचा दुष्परिणाम काय होऊ शकतो, हे त्यांच्या ध्यानात येत नाही. केंद्रातले सरकार फक्त पाच वर्षांसाठी असते आणि दार पाच वर्षांनी त्याची परीक्षा असते हे यांच्या गावीही नसते. आपली सत्ता आता कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही अशी यांची कल्पना असते की काय कुणास ठाऊक..!

ह्यातील बहुसंख्य लोक आता हे हिंदू राष्ट्र झालेच अशा थाटात वावरत असतात. भाजपचे राज्य आले म्हणजे हिंदू राष्ट्र झाले किंवा पुढच्या पाच वर्षात ते नक्की येणार आहे, असा अर्थ सहज निघू शकेल अशी स्टेटमेंट्स किंवा पोस्ट यांच्याकडून येताना दिसतात. त्यांच्या या खोडसाळ वागणुकीला, ‘आता हे लोक संविधान बदल णार’ अशी हाकाटी उठवून देशातले विरोधी पक्ष खतपाणी घालताना दिसतात आणि त्यामुळे लोकांच्या मनात उत्पन्न झालेल्या संशयाला बळकटी मिळते. तशात भाजपची पुर्वापार ओळख ‘हिंदू पार्टी’ आहे हे, ह्या पोस्ट किंवा विधानं वाचणाऱ्या लोकांना अशावेळी नेमकं आठवत आणि असं खोडसाळ बोलणं त्यांना खरं वाटू लागतं. त्याचा अपरिहार्य दुष्परिणाम जनमानसावर होतो आणि त्यामुळे भाजपचा मतपेटीतला जनाधार कमी होत जाताना दिसतो, असं मला वाटतं.

मला असं का वाटतं, ते सांगतो. भाजप समर्थकांकडून होणाऱ्या मागणीप्रमाणे हिंदूराष्ट्र जर होणार असेल, तर मग हिंदू धर्मीयांसाठी ती आनंदाचीच गोष्ट असायला हवी. तरीही ते होऊ नये आणि तशी मागणी करणारांना आपण पाठिंबा देऊ नये असं माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना वाटतं. आणि असं वाटणाऱ्यांत हिंदूच जास्त आहेत. त्याचं कारण म्हणजे हिंदूंमधली कायद्यात अस्तित्वात नसलेली, परंतु प्रत्यक्षात दिसणारी, जाणवणारी जाती व्यवस्था. हिंदू हा कधीच एकटा, सुटा नसतो. हिंदुत्वासोबत त्याची जातही अपरिहार्यपणे येतेच. सावलीसारखी. सावली कुठल्याही जातीची असो, ती काळीच असते. आणि जातीसोबत येणार हा अविभाज्य काळेपणा माझ्यासारख्या अनेकांना नकोस वाटतो. हिंदू राष्ट्राची कल्पना जेंव्हा काही उत्साही लोक रंगवतात, तेंव्हा हिंदूंमधील जातीयतेचे वास्तव त्यांनी विचारात घेतलेले असते किंवा नाही याची कल्पना येत नाही, परंतु त्यामुळे माझ्यासारख्या जात न मानणाऱ्या काही लोकांच्या उरात धडकी भरते हे मात्र खरं कारण काहीही कर्तृत्व नसताना जन्मजात मिळालेल्या स्व-जातीबद्दल अतोनात अभिमान आणि तेवढीच इतर जातीबद्दलची तुच्छता या देशातील बहुसंख्य सुशिक्षित-अर्धशिक्षित-अशिक्षित हिंदूंमध्ये अनुभवायला मिळते. जातिधारित हिंदू राष्ट्राची कल्पना अनेकांना भीतीदायक का वाटते, त्याच एक उदाहरण देतो.

नुकतंच काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला आरक्षण मंजूर केलं. वास्तविक तो निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळाचा होता, एकट्या मुख्यमंत्र्यांचा नाही. परंतु मंत्रिमंडळाचे प्रमुख ह्या नात्याने असा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करत असतात आणि ते श्रेय मुख्यमंत्र्यांना मिळत. ही प्रथा आहे. आपले मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आहेत. परंतु, मराठा समाजाला हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ”एका ब्राह्मणाने मराठ्यांना आरक्षण दिलं’ किंवा ‘ जे आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याला जमले नाही, ते ब्राह्मण मुख्यमंत्र्यानी करून दाखवले’ किंवा ‘आरक्षण मराठा जातीला, ते पण हिंदू मराठा, त्यातही ते ब्राह्मणांनी दिलं आहे’ असं स्पष्टपणे म्हटलेल्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या. वास्तविक आरक्षण मंत्रिमंडळाने दिलेलं होत, एकट्या श्री. देवेंद्र फडणवीसांनी नाही. श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना मी एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री म्हणून पाहतो, ब्राह्मण म्हणून नाही. त्यांच्या जातीचा उल्लेख करायचं काहीही कारण नव्हतं. तरीही ते झालं आणि त्यातून उठून दिसली, ती भाजप समर्थकांची उन्मादी जातीय मनोवृत्ती. असं कुणी इतरांनी म्हटलं असत तरी ते एकवेळ खपूनही गेलं असतं, पण जेंव्हा माझ्या परिचयाच्या भाजपच्या काही खंद्या समर्थकांकडून जेंव्हा हे वाचायला मिळालं, तेंव्हा मला जर काही वाटलं असेल, तर ते दुःखच..! सोशल मीडियावरच्या ह्या पोस्ट जेंव्हा मी वाचल्या तेंव्हा माझ्या मनात संशय उत्पन्न झाला. माझ्यासारख्याच आणखीही अनेकांनी त्या पोस्ट वाचल्या असणार. त्यांचं मन कलुषित झालं नसेलच असं म्हणता येणार नाही.

भाजप समर्थकांच्या म्हणण्यानुसार पुढे हिंदूराष्ट्र, म्हणजे जातीयतेचं राष्ट्र खरोखरच अस्तित्वात आलं, तर मग हिंदूमधल्या कोणत्या जाती पुढे जाणार आणि कोणत्या जाती मागे राहणार, कुठल्या जातीला राज्य करायची संधी मिळणार आणि मग त्या राष्ट्रात इतर जातीचे स्थान काय असणार, आरक्षणाचं काय होणार, इत्यादी संशयग्रस्त प्रश्नांची मालिका कुणाच्याही मनात उभी राहणं अगदी स्वाभाविक आहे. त्याहीपुढे जाऊन इतर धर्मीय, जसे मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, जैन, बौद्ध इतर धर्मियांचं स्थान काय असणार, ते देशात राहणार की वेगळ्या राष्ट्राची मागणी करणार, खलिस्तानची चळवळ पुन्हा डोकं वर काढणार का असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उत्पन्न होऊ शकतात. भाजपच्या विकासाच्या अजेन्डाला २०१४ साली आणि त्यानंतर तीनेक वर्ष जात-पाट-धर्म-पंथ-प्रांत इत्यादी भेद विसरून खंबीर पाठिंबा देणाऱ्या ,मतदारांनी असा विचार केला आणि ते भाजप पासून दूर होऊ लागले, तर तो दोष कुणाचा? संशयाला दिशा नाही, तो कुठेही भरकटत जाऊ शकतो. अर्थात ह्या गोष्टीच भाजपने किंवा भाजपच्या आय. टी. सेलने समर्थन केलेलं नाही, हे जरी खरं असलं तरी, त्याचं खंडनही केलेलं दिसलेलं नाही. त्यामुळे येत्या निवडणुकांतून भाजपाला मत द्यावं कि नाही याचा विचार लोकांनी केला तर तो चुकीचा कसा?

भाजपचा कमी होत जाणारा जनाधार येत्या निवडणुकांतून आणखी कमी झालेला दिसला तर, त्याला जबादार भाजपचे वाचाळ नेते, कसलाही पाचपोच नसलेला त्यांचा सोशल मीडिया सेल आणि स्वत:ला भाजपचे समर्थक (ह्यांना काहीजण भक्त असंही म्हणतात) म्हणवणारे अतिउत्साही आहेत हे खुशाल समजावं. भाजपाला जनतेच्या मनातून उतरवण्याचं सामर्थ्य या क्षणाला कुठल्याही व्यक्ती किंवा पक्षाकडे नाही. ते सामर्थ्य आहे फक्त आपण काय करतो आहेत, याच भान नसणाऱ्या किंवा बेभान झालेल्या भाजप नेत्या-समर्थकांमध्येच. भाजपच्या विकासाचा वेगाने चाललेला रथ हे अतिउत्साही समर्थक लोक रस्त्यावरून खाली उतरवणार, अशी मला दिवसेंदिवस खात्री वाटू लागली आहे.

यात भर पडते ती विरोधी पक्षाची आणि त्यांच्या नेत्यांची असंसदीय भाषेत टिंगल टवाळी करणे, कुठले नेते हिंदू आहेत किंवा नाही याची सांगड त्यांच्या जानव्याशी घालणे, कोणी एखाद्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला की त्याला लगेच देश सोडून जाण्याचा सल्ला कम आदेश देणे, कुणी एखाद्या विषयावर वेगळं मत मांडलं की त्याची हुर्यो उडवणं, अर्वाच्य भाषेत त्याच्यावर तुटून पडणे, त्याला विरोधी पक्षाचं ठरवणे ह्या गोष्टी भाजपाला लोकांपासून नकळत तोडताहेत असं मला वाटत.

अर्थात विरोधी पक्ष आणि त्यांचे समर्यथकही काही कमी आहेत असं नव्हे. पंतप्रधानांना चोर म्हणणाऱ्या या देशात, सर्वच लोकांनी सर्वच बाबतीत पातळी सोडलेली दिसते. हे जरी खरं असलं तरी, भाजप ही ‘पाटी वुईथ डिफरन्स’ आहे हे विसरता काम नये. सुसंस्कृत वागणं हा देखील वेगळेपणा आहेच का. लोक भाजपकडे विकासाच्या आशेने पाहात आहेत. अशा वेळी राजकारणाची पातळी उंचावण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला पाहिजे, इतर खाजगी पक्षाकडून ती अपेक्षा मला करता येत नाही. तसं झाल्यास भाजपच्या मतांचा टक्का नक्की वाढू शकतो.

भाजपचा जनाधार कमी होण्यामागचा मला वाटणारा दुसरा मुद्दा म्हणजे अयोध्येतल्या राम मंदिराचा. ह्यात समर्थकांना बळ मिळतं, ते भाजपच्या शीर्सस्थ नेत्यांचं, तेथील मुख्यमंत्र्यांचं आणि भाजपशी संबंधित संघटनांच. देशातील इतर लोकांप्रमाणेच अयोध्येत राममंदिर व्हावं ही माझीही भावना आहे. पण ती देशासमोरची प्राथमिकता नसावी. ज्या विकासाचे नारे देत भाजपने देशातील जनतेचा विश्वास २०१४ साली कमावला, तो विकास राम मंदिरापेक्षा महत्वाचा आहे. गरिबी दूर होणं महत्वाचं आहे, सर्व थरातील लोकांना दोन वेळचं जेवण मिळणं महत्वाचं आहे असं मी समजतो.

राम मंदिराचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, हे जगजाहीर आहे. असं असूनही भाजपशी संबंधित मोठे नेते, बड्या संघटना, साधू संत इत्यादी मंडळी बिनधास्त राम मंदिराच्या बांधकामाच्या तारखा जाहीर करत असतात, सरकारला अंतिम इशारे देत असतात. राम मंदिरासाठी कायदा करावा असा दबाव जनतेच्या नावाने सरकारवर आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि सरकार ते शांतपणे सहन करते हे अनाकलनीय आहे. याचा नकारात्मक परिणाम भाजपच्या काही मतदारांवर होतो. ‘सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू’, असं ह्या खोडसाळ लोकांना सरकारने ठणकावून सांगायला हवं. राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपाला मत मिळतील अश्या भ्रमात भाजपच्या नेत्यांनी व समर्थकांनी यापूढेराहू नये, कारण माझ्यासारखे असे अनेक जण असतील, ज्यांना मंदिरापेक्षा देशाचा विकास महत्वाचं वाटतो व तो सोडून मंदिराच्या मागे जाणे योग्य नाही असं वाटतं. ‘लगेच मंदिर बांधा’ अशी मागणी करून, बांधकाम सुरु करण्याच्या तारखा जाहीर करणाऱ्या अति उत्साही लोकांनां आणि संघटनांना भाजप सरकारने चापही लावला पाहिजे. राम मंदिरापेक्षा देशाचा विकास आपल्याला जास्त महत्वाचा आहे आणि मंदिर न्यायालयाच्या निर्णयानुसारच होईल, हे पंतप्रधान मोदींनी ह्या सर्वाना ठणकावून सांगायला हवं, तरीही भाजपचा पाया मजबूत होईल

शबरीमाला मंदिरात स्त्रियांना प्रवेश द्यावा की नाही, ह्या मुद्द्यावर भाजपने घेतलेली भूमिका माझ्यासारख्या अनेकांना पटलेली नाही. ह्यात भाजपने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापेक्षा लोकभावनांच्या बाजून उभे राहणे स्वीकारले. वास्तविक केंद्र सरकार म्हणून भाजपने न्यायालयाच्या निर्णयाच्या बाजूने ठाम उभे राहून कायद्याचं पालन होईल, असं जनतेला सांगायला हवं होत. पण भाजप तेथील लोकभावनांच्या बाजूने राहिला. मुसलमान समाजातील तीन तलाक विरोधात भूमिका घेऊन, मुस्लिम समाजातील स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध विधेयक आणणाऱ्या भाजपाची भूमिका, शबरीमलात मात्र हिंदू स्त्रियांच्या विरोधात होती. तीन तलाक मुस्लिम स्त्रियांवर अन्याय करणारा होता म्हणून मोदी सरकार त्याच्या विरोधात कारदेशीर पावलं उचलत होत, त्याचवेळी शबरीमाला प्रकरणात ‘महिलांना मंदिर प्रवेश नाकारणं हे घटनाबाह्य आहे’ असा निर्णय

देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्द भूमिका घेत होतं, हे अनाकलनीय आहे. मुसलमानांतील तीन तलाक या घातक प्रथे विरुद्ध भुमिका घेणारा भाजप, शबरीमलात मात्र हिन्दुंच्या स्त्रियांसाठी अन्यायकारक असलेल्या प्रथांच्या बाजूने उभा राहातो, यातून समाजात काय ‘धार्मिक’संदेश गेला असेल याचा अंदाज सरकारला नसेल असं नाही. तसा अंदाज असूनही मातांच्या लालसेने सरकारने तसं केलं असेल, तर मग ती आत्महत्या आहे. ‘धर्म’ सत्ता टिकू देणार नाही. यात केरळ सरकारला शह देण्याचं राजकारण असावं हे गृहीत धरूनही मला भाजपने कायद्याच्या विरुद्ध घेतलेली भूमिका पटली नव्हती. विकासाचं नाणं खणखणीत वाजत असताना, अशी लोकप्रिय भूमिका या प्रकरणात घेणं काहीच गरजेचं नव्हतं. त्याऐवजी न्यायप्रिय भूमिका केंद्र सरकारने घेतली असती, तर ते जास्त उचित झालं असतं, असं मला वाटतं. असं वाटणारांची संख्या मोठी आहे.

सांगण्यासारख्या आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत. जसं पंतप्रधान मोदींच्या भाषणात वारंवार येणारा ‘गेल्या ७० वर्षात काहीच झालं नाही’ हा अयोग्य मुद्दा, सर्जिकल स्ट्राईकचं नको तेवढं केलं जाणारं भांडवल, गत सरकारमधील घोटाळेबाज नेत्यांवरील कारवाईतले आस्ते कदम, काॅग्रेस मुक्त भारताची भाषा, गांधी-नेहरुंबाबत नकारार्थी बोलणं, गो हत्येवकु माॅब लिंचिंग, आपल्या विचारांशी जे सहमत नाहीत त्यांच्या देशप्रेमाविषयी शंका घेणं इत्यादी बाबीही भाजपच्या विचारी मतदारांवर नकारात्मक परिणाम करतात. माझ्यासारखे मतदार, जे भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाला मत देणार नाही आणि ज्यांना गत पांच वर्षांच्या काळात विकासाच्या आघाडीवर केलेलं काम ‘आहे मनोहर’ प्रकारचं वाटतं, पण हिन्दुत्व, धर्म, राम मंदिर, शबरीमला, वाचाळपणा इत्यादी गोष्टींची वारंवारीता समोर येताना पाहून ‘तरी..’ म्हणून ‘नोटा’ पर्याय वापरून निषेध नोंदवावासा वाटतो.

पुढच्या काही महिन्यात भाजप, भाजपचे वाचाळ नेते, भाजपशी संबंधीत संघटना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल मिडियावरील भाजप भक्त यांना अावर घातलेला दिसला नाही, तर मग ‘नोटा’ च्या प्रमाणात वाढ होणार हे निश्चित..! ह्याचे परिणाम अर्थातच भाजपलाच भोगावे लागणार, कारण ‘नोटा’चा पर्याय वापरणारे बहुसंख्य भाजपचे मतदार आहेत आणि ते ‘नोटा’ वापरून आपला निषेध नोंदवतायत, असं मी माझ्यावरून समजतो.

विद्यमान पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी आणि भारतीय जनता पंक्ष यांची बरोबरी जाऊ दे, त्यांच्या जवळपासही जाऊ शकेल असा एकही नेता किंवा विरोधी पक्ष किंवा खाजगी पेढ्यांचा दर्जा असणाऱ्या विरोधी पक्षांची आघाडी आजच्या घडीला देशात नाही, हे उघड सत्य असतानाही भाजपाचा जनाधार कमी होत आहे. तसं का होतं असावं, याची मला वाटणारी कारणं या लेखमालेच्या तीन भागात मांडली आहेत. हे दोषदर्शन मी आपलेपणानं केलेलं आहे कारण भाजपविषयी माझ्या मनात आस्था आहे. मी पहिल्यापासूनच भाजपचा मतदार राहिलो आहे, केंद्रातलं विद्यमान सरकार उत्तम काम करत आहे, परंतू काही गंभीर मुद्द्यांवर चुकतही आहे, हे मला दाखवून द्यावसं वाटलं म्हणून. ह्यातील काही चुका दुरूस्त करता येण्यासारख्या आहेत, काही सहज टाळता येण्यासारख्या आहे. तसं व्हावं या अपेक्षेने हे तीन लेखांचं लिखाण केलेलं आहे.

हे मी राजकारणातील डांवपेचांतला तज्ञ नव्हे. मी एक सामान्य माणूस आहे आणि माझ्या रोजच्या निरिक्षणातून मला आलेल्या अनुभवांच्या आधारे मी शोधलेली ही कारणं माझ्यापुरती खरी आहेत. ह्या कारणांचा निराकरण येत्या निवडणुकांच्या पूर्वी करणं सहज शक्य आहे आणि ह्या पक्षाने ते करावं, ह्याच तळमळीने हे तीन लेख लिहिलेले आहेत. ह्यात व्यक्त केलेली मतं माझी आहेत आणि ती सवाना मान्य असलीच पाहिजेत हा काही माझा आग्रह नाही. यावर गांभीर्याने चर्चा होणार असेल तर त्याचं स्वागत आहे.

-नितीन साळुंखे
9321811091
21.02.2019

पहिला भाग लिंक – https://www.marathisrushti.com/articles/aahe-manohar-tari-part-1/
दुसरा भाग लिंक – https://www.marathisrushti.com/articles/aahe-manohar-tari-part-2/

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..