विशेष निमित्ताने विविध वयाच्या आणि नात्याच्या माणसांना शुभेच्छा देण्याचा कल आता वाढतोच आहे. पैशांना काही मोलच राहिले नाही. कितीही पैसे खर्च केले तरी आपल्याला आणि उत्सवमूर्तीला विकत घेतलेली वस्तू आवडेलच याचा नेम नसतो. मग “हटके ” असे काही द्यावे असे वाटते.त्यासाठीच मी अलीकडेच काही वेगळ्या वस्तू बनवून दिल्या त्याची ही थोडी झलक !
फक्त महत्वाचे म्हणजे हे काम मिरवून कौतुक करून घेण्याचे आता माझे वय नाही आणि तो उद्देशही नाही. पण याआधी मी जेव्हा अशी माहिती शेअर केली तेव्हा अनेकांनी तशा वस्तू स्वत: बनवून आनंद घेतला. त्यावरून आपल्याला आणखी चांगल्या वस्तू सुचल्याचे कळवले. कांही मुलींनी सुट्टीत अशा वस्तू बनवून विकल्या आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत जमवली. आनंद वाटण्याचा एवढाच माझा उद्देश आहे .
मला आईवडिलांसारखे असलेल्या परांजपे दांपत्याने नुकताच लग्नाचा साठावा वाढदिवस साजरा केला.त्यांच्यासाठी मुंडावळ्यांचा ६० आकडा तयार करून सजविलेले पाकीट मलाच भरभरून आशीर्वाद देऊन गेले. ऑफिसमधील एका चेनस्मोकर मित्राला त्याच्या वाढदिवसाला जाड कार्डबोर्डची सिगारेट बनवून त्यात पुष्पगुच्छ अडकवून दिला. देताना अशा शुभेच्छा दिल्या की पुढच्या वाढदिवसापर्यंत मधली ही सिगारेट कायमची जाऊ दे आणि मला थेट पुष्पगुच्छ देता येऊ दे ! एका वकील मित्राला ” ऑर्डर ऑर्डर “वाल्या हातोड्यात घालून पुष्पगुच्छ दिला.नुसता नारळ देतांना त्याला जर एखादी नक्षीदार लेस बांधून दिली तर त्याचे मोल वाढते. ५००/६०० रुपयांचा खरा पुष्पगुच्छ २ /३ दिवसात फेकून द्यावा लागतो.पण हंस / बदकाच्या आकाराच्या टोपल्यात सजवून दिलेला कृत्रिम फुलांचा गुच्छ कांही वर्षे आपली आठवण ठेवतो.
एकाच गुच्छाला दोन मुठी ठेवून बनविलेला गुच्छ हा लग्नाच्या रौप्य महोत्सवासाठी ! तोपर्यंत संसार ही २ मुठींची तलवार नाही हे पटलेले असते.
–मकरंद करंदीकर.
Leave a Reply