शब्द अन् त्याचे अर्थ याविषयी खरं तर खूप काही बोलता, लिहिता येईल; पण त्याची ही जागा नव्हे आणि तसा हेतूही. तरीही संवादासाठी शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. जेव्हा तुम्ही अशा देशात किंवा प्रदेशात जाता तेव्हा शब्दही मुके होऊन जातात. रशिया, जपान एवढंच काय दक्षिणेतल्या ग्रामीण भागात गेल्यावर शब्दांना अर्थ उरत नाही आणि मग अभिनयाचा कस लागतो. तरीही आपण बोलतो. म्हणजे शब्दाचा वापर करतो. काही वेळा वाटू लागतं शब्दांना अर्थ प्राप्त होण्यासाठी संस्कार व्हावे लागत असावेत. ज्यावेळी लहान मुलांना बोलताही येत नसतं त्यावेळी ते सभोवतालच्या संभाषणाचा, संवादाचा अन् शब्दांचा अन्वयार्थ लावत असावेत. `तू छान दिसतोस’ आणि `घाण दिसतोस’ यामध्ये केवळ एका शब्दाचा फरक आहे; पण तो एखाद्याचे भावविश्वच बदलून टाकू शकतो. भाषासंस्कारानुसार त्याचे परिणामही बदलतात. कोल्हापूर भागात `रांडच्या’ हा शब्द प्रेमानं वापरला जातो. त्यातला जिव्हाळा सर्वत्र सारखाच असेल असं नव्हे. याचाच अर्थ या शब्दाबद्दलचे संस्कार सर्वत्र समान नसावेत. तुमच्या मनात सहजी आलं असेल, की शब्द, अर्थ आणि संस्कार अशी ही एवढी प्रस्तावना कशासाठी? पण त्याला कारणही तसंच आहे, संदर्भही शब्द, अर्थ अन् संस्काराचे आहेत. परवा `वसंत विशेष’ या `लोकमत’च्या उन्हाळी विशेष पानासाठी मी काही लिहावं अशी सूचना माझ्या सहकाऱयानं केली. त्याला म्हटलं, “तू सांग. काय हवं ते लिहून देतो.” तो म्हणाला, “आयुष्यात एखादी गोष्ट हरवून जाते अन् मग कधी तरी आठवते, त्या गोष्टीची रूखरूख वाटत राहते, असं काही तरी लिहा.” मी “हो” म्हटलं; पण अशी एकही घटना, गोष्ट, प्रसंग किंवा इप्सित आठवेना, की जे हरवून गेलेलं असावं. एखादी गोष्ट हरवलीय म्हटलं, की ती आपली होती असं वाटू लागतं किंवा तो क्षण तरी पुन्हा जगावासा वाटतो; पण कसं शक्य आहे ते? ज्या क्षणाला ही अक्षरं उमटली तोच क्षण पुन्हा मिळत नाही म्हणून तर त्याला आयुष्य म्हणतात, जीवन म्हणतात. पाण्याच्या प्रवाहात पाय टाकून बसतो आपण आणि आपल्या पावलांना पाण्याचा स्पर्श सुखावून जातो. हाच आनंद अनेकवेळा घेता येतो माणसाला; पण पाण्याचे तेच बिंदू पुन्हा तेच असतील का? तसंच काहीसं क्षणांचं आहे. ते क्षणोक्षणी हरवतच असतात.
मुळात ते आपले आहेत असं वाटतं आपल्याला; पण त्यांचं प्रवाहित होणं हेत त्यांचं उद्दिष्ट असतं. आपण मात्र भविष्यातल्या दुःखांना याक्षणी कवटाळू पाहातो किंवा भूतकाळातल्या आनंदाला वास्तवात आणू पाहतो. ते आहे तिथंच असतात. आपण मात्र आनंदी किंवा दुःखी होतो. हाती आलेला क्षण आपण उपभोगीतच नाही आणि मग ते मला मिळालं नाही म्हणून दुःख करीत बसतो. खूपच तात्त्विक किंवा आधात्मिक होतंय ना हे सारं; पण विषयच काही तरी हरवण्याचा होता. त्यात काय काय सापडतंय हे शोधण्याचा होता. तर सांगायचा मुद्दा असा, की माझं काय हरवलंय हे काही केल्या मला सापडत नव्हतं. आता हे लेखन करण्याच्या काही क्षण ते आठवलं आणि घेतलं लिहायला. माझं हरविलेलं कदाचित तुमचंही असेल किंवा कदाचित नसेलही; पण हे असं आठवणं महत्त्वाचं.
मी माझ्या घरात थोरला. माझ्यापेक्षा मोठी बहीण. आमचं बालपण गेलं कोपरगाव-शिर्डी भागात. राहाता, दहिगाव ही आयुष्याच्या प्रारंभीची गावं पुसटशी आठवतात. त्यावेळी आमचं एकत्र कुटुंब होतं. वडील-आई आणि आमचे काका एकत्र असत. गावातल्या आया-बाया-बापे घरी यायचे, संवाद साधायचे. वडील सतत भ्रमंतीवर. स्वाभाविकपणे सर्वाधिक संवाद व्हायचा तो माझ्या आईशी. त्याकाळी वडिलांशी संवाद कमी आणि त्यांच्या अस्तित्वाचा धाकच अधिक असायचा. तर माझ्या आईला माझे काका वहिनी म्हणायचे. ते स्वाभाविकही होतं. आईचं वय त्यावेळी फार तर 24-26 असावं. ती गावातल्या सगळ्यांचीच वहिनी होती आणि वडील होते दादा. वडिलांचा उल्लेख आईकडून अहो किंवा ते नसताना दादा असाच व्हायचा. माझ्यापेक्षा मोठी बहीण-मंगल. तीही आईला वहिनी म्हणे. स्वाभाविकपणे आईची माझी जी ओळख झाली ती वहिनी म्हणनूच. ती माझी आई आहे ही माहीत होतं मला; पण ती माझ्यासाठी वहिनी होती. जसं जसं वय वाढत गेलं, `आई’ या शब्दाविषयी ऐकत, वाचत गेलो तसं तसं या शब्दाचा अर्थ कळू लागला; पण `आई’ या शब्दाचा जो संस्कार त्या वयात व्हायला हवा होता तो मला वाटतं राहूनच गेला. पायाला ठेच लागली तर `आई गं’ असं व्हायचं; पण मनाच्या गाभाऱयात त्या आईचा चेहरा नसायचा. जेव्हा केव्हा मी मित्रांकडे, सहकाऱयांकडे जायचो त्यावेळी त्यांची हाक असायची आई, हे बघ कोण आलंय!’ त्यांच्यासारखी, तशीच आई माझीही होती. तिनंही माझ्यासाठी सर्वकाही केलं होतं की जे आई करते; पण माझ्या ओठावर आई नव्हती. आज माझ्या वयाची पन्नाशी पार केल्यावरही जर काही हरविलेपण जाणवत असेल, तर ते `आई’ या शब्दाचं.
तुम्ही तुमच्या आईला आईच म्हणता ना? नसेल, तर आजच मोठ्यानं हाक मारा तिला आई! उद्या माझ्यासारखं हे असं हरविलेलं लिहिण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये.
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.
Leave a Reply