नववीच्या वर्गात शिकणारी प्रतीभा आज वर्गात अस्वस्थ दिसत होती. वर्गात शिक्षक फळयावर काय शिकवित आहेत याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं. ती कोणत्या तरी मोठया संकटात सापडल्याप्रमाणे चेहरा करून विचार करत गप्प बसली होती. नेहमीच गालाला सुंदर खळी काढून हसणा-या प्रतिभाचा उदास चेहरा पाहुन तिच्या मैत्रिणीही आपसात कुजबुज करू लागल्या होत्या ” आज नक्कीच शाळेत येण्यापूर्वी प्रतिभाचं कोणाबरोबर तरी भांडण झालं असांव” पण तिला तिच्या दुःखाच कारण विचारण्याची हिंमत कोणाला होत नव्हती कारण प्रतिभा मुळातच खुप तापट स्वभावाची तर होतीच त्याचबरोबर विनाकारण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणे तिला आवडत नसे. प्रतिभाचा स्वभाव तापट असूनही वर्गात सर्वांबरोबर हसून-खेळून वागत असल्यामुळे वर्गातील सर्वजणी तिच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. वर्गात प्रतिभा अतिशय हुशार असण्याबरोबरच वकृत्व आणि अभिनय याचीही तिला योग्य जाण होती. शाळेत होणाऱ्या वत्कृत्व आणि नाटयस्पर्धेत ती नेहमीच भाग घेत असे त्यात तिला बक्षीसही मिळत असे आपल्या यशाचे श्रेय प्रतिभा नेहमीच आपल्या आईला देत असे . ते देताना ती म्हणे ” माझ्या आईने मला नेहमीच मी मुलगी असूनही एखादया मुलाप्रमाणे स्वतंत्र दिलं ! ती नेहमीच माझ्याबरोबर माझी आई म्हणून नव्हे तर मैत्रिण म्हणून वावरली. माझ्या आवडी निवडी तिने जोपासल्या. माझ्या यशा – अपयशा पेक्षा तिन मला अधिक महत्व दिल म्हणून माझी आई मला वेगळी वाटते. माझ्या आईने माझ्याकडून कोणत्या अपेक्षा केल्या नाहीत कारण तिला खात्री आहे तिची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्यास तिची मुलगी नक्कीच समर्थ आहे”.
प्रतिभाच्या मैत्रिणी समजत होत्या तसं प्रतिभाचं शाळेत येण्यापूर्वी कोणाबरोबर भांडण वगैरे झालं नव्हत. तिच्या दुःखाच कारण थोडं वेगळच होतं. प्रतिभाच्या शाळेतच दहावीच्या वर्गात शिकणा-या स्वप्नीलने तिला प्रेमपत्र लिहल होत. रात्री झोपता-झोपता ते पत्र ती वाचत होती. पत्र वाचुन झाल्यावर ते उशाखाली ठेवून ती झोपी गेली. सकाळी उठल्यावर ते उचलून दुसरीकडे ठेवायला ती विसरली. शाळेत आल्यावर तिला त्या पत्राची आठवण आली. आता अंथरूण सरळ करताना ते आईला सापडले आणि आई ते पत्र बाबांना दाखवेल तर ? आई-बाबा आपल्यावरील अतिविश्वासाबद्दल आणि आपल्याला दिलेल्या अवास्तव स्वातंत्रबद्दल स्वतःला दोष देतील. कदाचित उद्यापासून आपल्यावर अनेक बंधनेही लादली जातील ते पत्र स्वप्नीलच्या आईबाबांना दाखवून त्यालाही ताकीद दिली जाईल , कदाचित आतापर्यंत गुलदस्त्यात असणार आमच प्रेम चोहीकडे उधळलं जाईल. आम्ही दोघं आमच्या मित्र-मैत्रिणींच्या टीकेचा विषय होऊ असा विचार मनात मनात येऊन प्रतिभा अस्वस्थ होत होती. शाळा सुटायला पाच-दहा मिनिटे असताना प्रतिभा अधिकच अस्वस्थ झाली शाळा सुटल्यानंतर तिचे पाय वर्गातून बाहेर पडत नव्हते पण शेवटी नाइलाजाने वर्गातून बाहेर पडून घराच्या दिशेने चालू लागली. जस जसे तिच घर जवळ येऊ लागलं तस तसे तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. तिने घरात पाऊल ठेवताच नेहमीप्रमाणे आईने तिच दप्तर घेतल. तिचे हात पाय धुवून झाल्यावर तिला जेवण वाढलं क्षणभर प्रतिभाला वाटलं आईला चिठ्ठी सापडली नसावी म्हणूनच आईच्या वागण्यात काही बदल झाला नाही. जेवण झाल्यावर संपूर्ण खोली पालथी घालूनही तिला ती चिठ्ठी सापडली नाही त्यामुळे प्रतिभा अस्वस्थ झाली. त्या अवस्थेत ती तेथेच बिछान्यावर आडवी झाली आणि गाढ निद्रेच्या अधिन झाली. संध्याकाळी झोपेतून जाग आल्यावर तिच्या मनात अनेक विचार थैमान घालू लागले. ती स्वतःशिच म्हणाली स्वप्नीलची चिठ्ठी आईला सापडली असणार यात शंका नाही. पण ती सापडूनही आईच्या स्वभावात बदल झाला नाही म्हणजे केला नाही ! याचा अर्थ रात्री बाबा आल्यावर बरसण्याचा विचार दिसतोय.
आपल्या मुर्खपणाबद्दल स्वतःला दोष देत प्रतिभा स्वतःशीच म्हणाली, ‘‘स्वप्नीलने आपल्याला हे काही पहिलं प्रेम पत्र लिहलं नव्हतं. त्याने पहिल्यांदा जेव्हा आपल्याला प्रेमपत्र लिहलं तेव्हाच त्याला पुन्हा तसं न करण्याची सूचना दयायला हवी होती पण तस मी केल नाही कारण त्यान प्रेमपत्रात माझ्या सौंदर्याच केलेल वर्णन वाचून मला स्वतःलाच माझ्या सौंदर्याचा हेवा वाटू लागला होता. स्वप्नील आपल्या प्रेमात पडण्याला आपणच तर जबाबदार होतो. त्याने लिहलेल्या नाटकात आपण त्याचाच हिरोईनचा रोल केला नसता किंवा त्याच्या अभिनयाला सतत दाद देण्याबरोबर स्वतःकडे काही न राखता अभिनय केला नसता तर तो आपल्यावर मोहीत झाला नसता. आपल्या सौंदर्यापेक्षाही आपल्या अभिनयावर त्याचं जास्त प्रेम आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही. आपणही स्वप्नीलच्या सौंदर्यावर मोहीत झालो होतो म्हणून सतत त्याच्या संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यावेळी आपण त्याच्या प्रेमात वगैरे पडलोय याची जाणीव झाली नव्हती. पण स्वप्नीलने प्रेम पत्रे लिहील्यावर ती वाचून आपण स्वप्नीलच्या प्रेमात पडलोय याची जाणीव झाली. म्हणून आपण त्याच्या प्रेमाला विरोध करण्याऐवजी त्यांच्या प्रेमाला अबोल प्रतिसाद देत राहिलो त्याचाच हा परिणाम आहे. या विचारात गुंग असतानाच प्रतिभाची आई चहा घेऊन आली. चहा पिऊन झाल्यावर प्रतिभा फ्रेश होऊन आभ्यासाला बसली. थोडयावेळाने प्रतिभाचे बाबा ऑफिसमधून आल्यावर प्रतिभाच हृदय धडधडू लागल. पण ! आई तिच्या बाबांना काहीच न बोलल्यामुळे प्रतिभाला आश्चर्य वाटलं. रात्री जेवण झाल्यावर उलट प्रतिभाच्या बाबांनी प्रतिभाच्या आवडीच आईसक्रीम तिला आणून दिल. रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा प्रतिभाची आई तिच्या खोलीत आली तेव्हा ती धास्तावली पण ! तिची आई तिच्या डोक्यावर हळूवार हात फिरवून गालात गोड हसून गुडनाईट करून झोपायला गेल्यावर प्रतिभाला काही कळेनास झाल. त्यानंतर स्वप्नीलन प्रतिभाला पुन्हा कधी प्रेमपत्र लिहले नाही कारण त्याच्याच दुस-या दिवशी पुन्हा आपल्याला प्रेमपत्र न लिहण्याची ताकीद स्वप्नीलला देण्याबरोबर मी फक्त एक मित्र म्हणून तुझा आदर करते असं प्रतिभानं स्वप्नीलला स्पष्टपणे सांगितलं होत. त्यानंतर प्रतिभाच शालेय शिक्षण पूर्ण होऊन प्रतिभा कॉलेजला जाऊ लागली. कॉलेजला शेवटच्या वर्षात शिकत असताना कॉलेजमध्ये झालेल्या नाटयस्पर्धेतील प्रतिभाचा अभिनय पाहून एका निर्मात्याने आमच्या नाटकात काम करशील का ? म्हणून विचारणा केली असता तिन चटकन होकार दिला. त्या निर्मात्यानं तीला आपल्या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून स्वप्नीलची ओळख करून दिली. जवळ – जवळ चार-पाच वर्षानंतर स्वप्नीलला पाहून प्रतिभा चक्रावली कारण स्वप्नील नावाच्या एका अल्लड मुलाच एका परीपक्व तरूणात रूपांतर झालं होत. जो आता पूर्वीपेक्षाही सुंदर दिसत होता. क्षणभर प्रतिभाच्या चेह-यावरून चोरीला गेलेल हसू पुन्हा तिला गवसलं याची जाणीव तिच्यासह सर्वांना झाली. थोडयाच दिवसात नाटकाचा पहीला शो ही झाला. नाटकाला प्रेक्षकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. नाटक संपल्यावर प्रतिभाची आई प्रतिभाला म्हणाली,” तुझ्या नाटकापेक्षा तुझ्या नाटकाचा हिरो मला खुपच आवडला. एक दिवस त्याला आपल्याकडे जेवायला का बोलवत नाहीस. आईच्या सांगण्याप्रमाणे प्रतिभाने स्वप्नीलला जेवायला आमंत्रण दिले असता एका रविवारी तो प्रतिभाच्या घरी गेला तेव्हा प्रतिभाच्या आईच्या पाया पडून म्हणाला, ”आज मला जे काही यश मिळाल आहे त्याच सारं श्रेय तुम्हाला जातं ! त्यावेळी तुम्ही मला योग्य ती समज देऊन माझ्यातील कलेची जाणीव करून देत माझं कर्तव्य पटवून दिल नसत तर कदाचित मी आज एवढा यशस्वी होऊ शकलो नसतो. हे दाराआडून ऐकणा-या प्रतिभाला काही कळेनास झालं. जेवन झाल्यावर प्रतिभा स्वप्नीलला सोडून येण्याचा बहाणा करून त्याच्याबरोबर निघाली. रस्त्यात ती स्वप्नीलला म्हणाली,” तुझ्या यशाचं श्रेय तू माझ्या आईला का देतोस ? मी दाराआडून सारं ऐकलय ! आज तुला ते सांगावच लागेल. त्यावर स्वप्नील हसून म्हणाला. तुला आठवतं मी तुला प्रेमपत्र लिहल होत आणि ते तुझ्या आईला सापडल होत. त्यानंतर दुस-या दिवशी तू जेव्हा मला तुला प्रेमपत्र न लिहण्याची ताकीद दिलीस आणि त्यानंतर मी पुन्हा कधी तुझ्या वाटेला गेलो नाही. तू मला पुन्हा भेटेपर्यंत . तुला असं वाटत असेल की तू मला ताकीद दिल्यामुळे मी पुन्हा पत्र लिहिले नाही किंवा भेटलो नाही पण तसं नव्हतं. त्याच्या दुस-या दिवशी तुझी आई आपल्या मुख्याध्यापकांची खास परवानगी काढून मला भेटली. मी तुला लिहलेल पत्र त्यांनी माझ्या हातात दिल ते पाहून माझे पाय थरथरु लागले तेव्हा माझ्या खांदयावर हळूवार प्रमाने हात ठेवत तुझी आई म्हणाली,” तुझं शाळेतील शेवटच वर्ष आहे . तेव्हा अभ्यासाकडे लक्ष दे ! मला माहीत आहे तू चांगला लेखक – अभिनेता आहेस पण जर तुला खरोखरच एक मोठा लेखक – अभिनेता व्हायचं असेल तर शिक्षणाचीही गरज आहे. मला माहीत आहे एक मोठा लेखक – अभिनेता होण हे तुझ स्वप्न असणार मग ! असं प्रेमपत्र लिहीण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी आपलं स्वप्न कसं पुर्ण होईल याचा विचार करण्यात वेळ घालव. भविष्यात जर तुझ स्वप्न पूर्ण झाल तर प्रतिभासारख्या कितीतरी तरुणी तुझ्यासमोर रांगेत उभ्या राहतील. मला खात्री आहे तू नक्कीच यशस्वी होशील ज्या दिवशी तुला भरभरुन यश मिळेल तेव्हा तुला आपला जावई करुन घेण्यास माझ्यासारख्या कितीतरी जणी उत्सुक असतील. तुला वाटत असेल तुझ्या आणि प्रतिभाच्या मैत्रिला माझा विरोध आहे पण तस अजिबात नाही पण तुमच्या प्रेमाला माझा विरोध आहे कारण प्रेमाचा खरा अर्थ कळल्याखेरीज प्रेमात पडणं हा निव्वळ मुर्खपणाच ठरतो. ज्या दिवशी तुम्ही दोघ ख-या अर्थाने प्रौढ व्हाल आणि प्रेमाचा खरा अर्थ तुम्हाला उमगला असेल त्या दिवशी तुमच्या प्रेमाला माझा नक्कीच विरोध नसेल. त्यानंतर शाळेय शिक्षण पूर्ण झाल्यावर अभ्यासाबरोबर मी अभिनयाकडे जास्त लक्ष केंद्रीत केलं आणि ते करता करता मी सतत तुझ्या आईच्या संपर्कात राहीलो. त्यामुळे योग्यवेळी तुझ्या आईच योग्य मार्गदर्शन मला मिळत राहिलं . तुझ्या आईनेच एका नाटय निर्मात्याबरोबर माझी ओळख करुन दिली आणि त्यानंतर मला मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही. आपल्या दोघांची पुन्हा भेट घडवून आणण्यात तुझ्या आईचाच हात आहे. त्यांच्या सांगण्यावरून आपल्या नाटकाच्या निर्मात्यांनी तुला नाटकात काम करशील का म्हणून विचारणा केली. तुला आश्चर्य वाटेल पण आपल्या नाटकाचे निर्माता विजय जाधव तुझ्या बाबांचे वर्गमित्र आहेत. तू कॉलेजला जाऊ लागल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरील उदासी सतत तुझ्या आईला जाणवत राहिली. ती असह्य झाल्यावर एक दिवस तुझी आई मला म्हणाली , ”तू प्रतिभाला पुन्हा भेट आणि तिच्या चेहऱ्यावरून चोरीला गेलेल हसू तिला परत कर पण तेव्हा मी स्पष्ट नकार दिला होता कारण तोपर्यंत मला प्रेमाचा खरा अर्थ समजला होता आणि तुला समजण्याची वाट पहात होतो. आज तुलाही प्रेमाचा खरा अर्थ नक्कीच समजला असेल पण माझ्यापेक्षा जास्त त्रास तुला सहन करावा लागला कारण मला माझं प्रेम मिळणार याची खात्री होती आणि तुला आपल प्रेम गमवल्याचं दुःख होत. तुझ्या आईने आपल्या दोघांना सावरण्याबरोबर आपल भविष्यही सुरक्षित केल. ते करताना आपल प्रेमही यशस्वी होईल याची दक्षता घेतली. खरंच तुझ्या आईसारखी आई नशिबानेच मिळते . त्यावर प्रतिभा पाणावलेले डोळे पुसून गालात गोड हसत प्रतिभा म्हणाली ” हो ! हे खरंच !! माझी आई जगात भारी !!!
— निलेश बाामणे
Leave a Reply