नवीन लेखन...

आईबाबांनो, भांडा; पण जरा जपून, मुलं शिकताहेत!

आई-वडिलांचे भांडण ही मुलांची जागतिक समस्या आहे. भांडण बघताना मुलांच्या रक्तात कॉर्टिसॉल नावाचे तणाव निर्माण करणारे इंद्रियक्रियाप्रवर्तक (हॉर्मोन) वाढते. मुलाला असुरक्षित वाटू लागते. वादविवाद, शिव्याशाप, धक्काबुक्की, मारहाण, फेकाफेकी अशा घटना वारंवार घडल्यास त्यांच्या मनांवर, शिक्षणावर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होतो.


तणावग्रस्त मुले

आई-वडिलांच्या भांडणांत मुले काळजीने घेरली जातात. घाबरतात, भेदरतात. त्यांना वाटते, त्यांच्यामुळेच भांडणे होत आहेत. त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते. आई-वडील विभक्त होतील, घटस्फोट घेतील अशी त्यांना भीती वाटते. या तणावाखाली ती शाळेपेक्षा भांडणावरच आपले लक्ष केंद्रित करतात. वर्ग पुढे जातो. ती अभ्यासात मागे पडतात. त्यांची एकाग्रता कमी होते. अवधान काळ कमी होतो. त्यांची वर्तणूक बदलते. ती एकलकोंडी होतात. हसत नाहीत. कशात रस घेत नाहीत. हरवतात. चिडचिड, उलट बोलणे, उद्धटपणा, बेफिकीर वृत्ती, कुठेही दुखणे, अस्वस्थता, नैराश्य, नखे खाणे, गादी ओली करणे, बोबडेपणा, शाळा बुडविणे, आक्रमकता, इतरांशी न पटणे अशा पायरी-पायरीने गंभीर मानसिक समस्या येऊ लागतात.

मुलांच्या शैक्षणिक पीछेहाटीसाठी, वर्तणूक समस्यांसाठी मुलांना दोष देण्याआधी त्यात कौटुंबिक भांडणांचा भाग किती याचा विचार करायला हवा. आई-वडिलांनी भांडताना स्वतःवर मर्यादा घालून घ्यायला हव्यात. त्या पाळायला हव्यात.

भांडणप्रसंगी काय करावे?

शांत राहावे. एक ते दहा आकडे म्हणून रागावर ताबा मिळवावा. राग शांत झाल्यावर समस्येवर चर्चा करावी. मोजूनमापून, स्पष्टपणे, योग्य शब्दांत बोलावे. माफी मागायला व माफ करायला शिकावे. सहसंमतीने मधूनच ‘पाणी’, ‘चहा’, ‘इतर’ यांसाठी ‘भांडणविश्रांती’ घ्यावी.

भांडणप्रसंगी काय करू नये?

मारहाण, धक्काबुक्की, धमकावणे नको. शिवीगाळ, निंदानालस्ती, सात पिढ्यांचा उद्धार नको. निघून जाउ नये. त्याने प्रश्न सुटत नाही. किंचाळून, खेकसून बालणे नको. जाहीर भांडण नको. मुलांना भांडणात ओढायला नको.

फक्त वयस्कांचे ‘लैंगिक’, ‘पैसे’, ‘सासुरवाडी’ असे विषय मुलांसमोर नको. जुन्या चुका, जुने मुद्दे उकरून-उकरून भांडण नको.

सुसंवाद हवा

थोडीशी नोंकझोंक, वादविवाद हवेच. तो संसाराचाच एक भाग असतो. अगदी बंद दाराआड कुजबुजत भांडायची काही गरज नाही. आपल्या रागाला कुणाशी तरी बोलून वाट मोकळी करून देणे आवश्यक असते. कुटुंबीयांनी आपल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करायला हव्यात. रागाच्या भरात बोललेले सगळेच खरे नसते हे मुलांना सांगायला हवे.

कितीही भांडले तरी आईवडील एकमेकांवर प्रेम करतात हे त्यांना समजायला हवे. मुलांनी आई-वडिलांना भांडताना बघितल्यावर जुळवून घेतानाही बघायला हवे. त्यातून तडजोड किती जीवनावश्यक आहे, जुळवून कसे घ्यावे हे धडे ते शिकतील.

पण भांडणे वारंवार, जास्त काळ चालणारी, जास्त तीव्रतेची होऊ लागली तर सल्ला घ्यावा. दोघांचाही विश्वास असेल अशा वडीलधार्‍यांचा किंवा मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा. त्यातच संपूर्ण कुटुंबाचे हित आहे. भांडणाचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक समस्या, दारूचे हाताबाहेर गेलेले व्यसन, जुगार, पावित्र्याबद्दल शंका असे प्रश्न समुपदेशनातून उघड होतात व त्यांचे निवारण करता येते.

म्हणून म्हणतो, आईबाबांनो, भांडा; पण जरा जपून! तुमची मुलं बघताहेत, ऐकताहेत, शिकताहेत.

डॉ. अनिल मोकाशी
बालरोगतज्ज्ञ, बारामती.
भ्रमणध्वनी – ९४२३५८४०६२
इ-मेल :
dranilmokashibaramati@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..