आई जगदंबे…. तुझ्या सहस्रावधी रुपांच्या दर्शनाची आस आहे . तुझ्या अस्तित्वाचा ध्यास आहे माऊली , तुझ्या प्रसन्न आशीर्वादाचा वरदहस्त नित्य लाभावा आणि मायेचा ओलावा आमच्या हृदयात पाझरत रहावा , यासाठी जगदंबे , दोन्ही कर जोडून ही विनवणी करतो आहे .
हे परब्रह्मप्रबोधिनीस्वरूपिणी माते
आमची संवेदना जागवण्यासाठी , आमच्या संस्कृतीतील विशाल ज्ञानभांडार आमच्या आकलनात येण्यासाठी , त्याचे व्यवहारात उपयोजन होण्यासाठी हे माते , आमचं प्रबोधन कर .
हे कालरूपिणी , त्रिशुळवरधारिणी माते
– अजूनही मानवातील राक्षसी वृत्ती संपलेली नाही . मानवातील श्वापदांची असह्य आपदा निवारली गेलेली नाही . अबला अजूनही असहाय आहेत , त्यासाठी हे गुणगंभीर माते आमच्या रुधिरात स्वाभिमान , अंगार पेरून माताभगिनींचे रक्षण करण्याची सद्बुद्धी दे .
हे सूरवंदिते , सप्तस्वरमयी देवी
हा समाज, हे राष्ट्र सुसंस्कृत , संपन्न आणि स्वर्गीय करण्यासाठी जे जे काही असेल त्यासाठी प्रयत्न करण्याची , राष्ट्र सर्वोपरी होण्यासाठी अंतिम श्वासापर्यंत प्रयत्न करीत राहण्यासाठी हे आदिमाये मानसिक , शारीरिक बळ दे !
हीच विनवणी आजच्या या गीतातून !
आदिमाये शक्तीरूपे जन्म घे तू भूवरी ।। धृ ।।
गूढ गर्ता षड् रिपुंची , सोडवी माहेश्वरी ।।
धर्मदा तू कामदा तू मोक्षदा तू ज्ञानदा ।
पाहसी तू श्वापदांची दाटलेली आपदा ।
हो कृपेचा दीप आणि मार्ग दावी सत्वरी ।
आदिमाये शक्तीरूपे जन्म घे तू भूवरी ।।१।।
अंतरीचा वन्ही माते जाळतो गे भावना ।
मत्त झाले क्रूरकर्मे गोठली संवेदना ।
ये वधाया रिपुसी माते खड्ग घे आता तरी ।
आदिमाये शक्तीरूपे जन्म घे तू भूवरी ।।२।।
अष्टभुजा शस्त्रधारी तूच गे रणरागिणी ।
तूच कमलवासिनी अन् तूच गे नृपनंदिनी ।
ये जगाला वाचवाया उद्धरी भवसागरी ।
आदिमाये शक्तीरूपे जन्म घे तू भूवरी ।।३।।
नावासह सर्वांना पाठवायला हरकत नाही .
–डॉ . श्रीकृष्ण जोशी,
रत्नागिरी
९४२३८७५८०६
Leave a Reply