काळी सावळी. कपाळावर रुपया एवढे मोठे ठसठशीत कुंकू. नाकात लोंबणारी नथ, गळ्यात मंगळसूत्र. हातभार बांगड्या आणि कडव्याची माळ घालून एक आराधीण यायची. ढळजेत बसून हातातील परडी खाली ठेवून हातात तुणतुणे (एक तारी) आणि खणखणीत आवाजात म्हणायची. मला पहिल्या ओळी आठवत नाहीत. आराधी आल्याति दारात. मागते जोगवा मंगळवारात शुकीरवारात. असे म्हणायला सुरुवात केली की वाड्यातील कुणी तरी एक जोगवा वाढत असत. आम्ही त्या वाड्यात भाड्याने रहात होतो. माझी मोठी मुलगी चार पाच वर्षाची असेल. ती खूप मन लावून ऐकायची. अगदी डोळ्याची पापणी न लवता.एकदा मी कामात होते म्हणून तिला जोगवा वाढायला सांगितले होते. तिने पटकन एका ताटात तांदूळ घेऊन बाहेर गेली व जोगवा घालून नमस्कार केला. खर तर असे कुणी केलेले नव्हते. नंतर जेव्हा जेव्हा आराधीण जोगवा मागायला आली की मला म्हणायची माझ्या आईकडून मला जोगवा पाहिजेल. कारण विचारले तर सांगितले होते की ज्या दिवशी तिने जोगवा घातला होता त्या दिवशी तिला खूप ठिकाणी जोगवा भरपूर प्रमाणात मिळाला होता. आणि ती माझ्या मुलीला कुंकूं लावायची परडीतील.
नाही तर त्यांची पद्धत असते जोगवा आणलेल्या ताटात थोडे कुंकू व त्यातीलच चार दाणे ताटात परत घालून द्यायची.
लहानपणापासूनच अशा व्यक्ती आयुष्यात आल्या की खूप काही शिकवून जातात. जोगवा थोडा असला तरी ते मोठ्या ताटात. सुपात घालून द्यायचे. ते ताट म्हणजे मोठे मनाचे प्रतिकच. ओंजळीतून नाही. त्यामुळे देणाऱ्याचा हात वर तर घेणाऱ्याचा हात खाली असतो. त्यामुळे मनात एक प्रकारचा अंहभाव व कमी पणाची जाणिव होऊ नये यासाठी. आणि काही दिले तर काही तर काही तरी मिळतेच. जोगव्याच्या बदलात कुंकू देऊन अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद मिळतो. आणि चार दाणे परत आपल्याच घरात जणू अन्नपूर्णेच्या रुपात अखंड राहणार आहे. अगदी असेच असते सामाजिक बांधिलकी जपली तर. काही नाही तर निदान मानसिक समाधान तर नक्कीच.
वास्तविक माझ्या सासरी म्हणजे तुळजापूरला असे आराधी रोजच असतात. आणि नवरात्रात नऊ दिवस काही घरी जोगवा मागतात. किंवा काही इच्छीत कामा साठी जोगवा मागण्याचा नवसही करतात. या वेळी अगदी प्रतिष्ठीत घरातील बायका देखिल हातात परडी. कवड्याची माळ गळ्यात घालून घरोघरी जोगवा मागतात. अगदी भक्ती भावाने पंरपंरा जपतांना कमीपणा जाणवत नाही असे दिसून येते. तर जोगवा घालताना भेदभाव केला नाही जात नाही. आराधीला जेवढे तेवढेच यांनाही. भजनी मंडळात देखील आईचा जोगवा जोगवा मागेन म्हणत एका विशिष्ट पद्धतीने तालावर पायाचा ठेका धरुन. एखादी सुशिक्षित आणि सुसंस्कृत बाई मंडळातील प्रत्येक बाई समोर येऊन वाकून पदर पसरवून जोगवा मागत मागत फिरत असते. हे सगळे पाहतांना अंगावर शहारे येतात. देवाचा धावा करताना तुकाराम महाराज असेच तल्लीन होऊन नाचायचे. आणि गोरा कुंभार यांनी तर भक्ती रसात आपल्या पायाखाली आपलेच मूल आहे हे पण विसरुन चिखलात आणि भक्ती रसात डुंबून गेले होते तेव्हा काय घडले होते हे आपल्याला माहित आहे तुकोबांचे अभंग पाण्यातून तंरगून वर आले आणि गोरोबांना मूल मिळाले . अशी शिकवण देणारी माणसं समाजात पूर्वी होती. आणि मला अभिमान वाटतो की लहानपणी माझ्या मुलीवर ज्या आराधीणीने नकळत जे संस्कार केले होते ते अनेक वेळा अनेक प्रसंगी दिसून येतात. आता आराधीण दिसत नाहीत. वॉचमन सोसायटीत येऊ देत नाहीत. आणि जोगवा मोठ्या मनाने घातला नाही. कोणाचा कोणावर विश्वास नाही.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply