माणूस या जगात येतो तोच मुळी एका निर्विवाद अन् अतूट नात्यातून. आई… हे त्याचं पहिलं नातं! आईचं वर्णन देवादिकांपासून अनेकांनी केलेलं आहे. अशा स्थितीत भगवान जेव्हा आपले नातेसंबंध सुरळीत करण्यावर भर देतात, तेव्हा माझ्यासारख्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. ज्या माऊलीनं आपल्याला स्वतःच्या उदरात स्थान दिलं, हालअपेष्टा, अवहेलना, यातना सहन केल्या, जी आणि मी कधीच वेगळे नव्हतो, त्या आईशी माझ्या नातेसंबंधात अडसर असल्याचा काहीतरी संबंध आहे का, असा प्रश्न येतोच कुठे? पण अम्मा-भगवानांच्या वन्नेस विद्यापीठात प्रशिक्षणासाठी दाखल झाल्यावर मात्र मला माझ्या आईशी असलेल्या संबंधातलं वास्तव जाणवू लागलं. नातेसंबंध सुरळीत करण्याची पहिली पायरी आईच आहे, याचं भान आलं. कारण मी मुलगा, ती आई असली तरी नात्यातले अडसर आता मला जाणवले होते. आईला आपण अजाणताच नव्हे तर जाणतेपणीही किती यातना दिल्या, याचा साक्षात्कार मला झाला होता. मी वयाच्या दहाव्या वर्षापासून आईपासून दूर होतो. आताही आहे. माझ्या या दूर असण्यालाच एक दुखरी किनार होती. त्यामुळंच मी माझ्या दूर असण्यावरून आईशी असं काही बोलत असे, की त्याचा तिला त्रास व्हायचा. या त्रासाची जाणीव मला आनंद देत असे. मी दूर आहे, याचं दुःख तिला नव्हे तर मलाच आहे असं मी समजायचो. माझं तिच्याशी असलेलं वागणं असो वा भावा-बहिणीशी, याचा तिला काय त्रास होत असेल याची जाणीवही मला झाली नव्हती. नातेसंबंध सुरळीत करण्यासाठी आधी त्या व्यक्तीच्या भूमिकेत जा अन् त्या अनुभवांची अनुभूती घ्या, असं भगवान म्हणायचे. असं झाल्यावर मी आईला कधी, किती अन् कसे दुखावले याची चित्रफीतच डोळ्यांपुढे येऊ लागली. कधी आपण आईला दुखावले तर कधी आपण आईमुळे दुखावलो. दुःख, वेदना, सल यांच्या या दोन तर्हा; पण भगवानांनी प्रशिक्षणात त्याची जाणीव दिली. भगवान म्हणतात, ‘‘आईला जो त्रास तुम्ही दिला तो आठवा. तो स्वतः सहन करा आणि अशा यातनांसाठी आईची क्षमा मागा. ज्या घटनांमुळे तुम्ही दुखावलात त्यांचं स्मरण करा. त्या दुःखाचा तेवढ्याच तीव्रतेने पुन्हा अनुभव घ्या आणि त्यासाठी आईला क्षमा करा. माझं वन्नेस विद्यापीठातलं प्रशिक्षण संपताच मी स्वतः हा प्रयोग केला. आईची माफी मागणं आणि तिला माफ करणं, हे किती आनंददायक असतं, याचा अनुभव मी घेतला. माझ्या कुटुंबातही तो घेतला आणि आमच्या नातेसंबंधातलं सारं मळभ, सारे अडसर दूर झाले. मला माझी आई अन् तिला तिचा मुलगा पुन्हा भेटला. आजही मी फोनवर तिच्याशी बोलतो तेव्हा आईच्या कुशीची ऊब मला जाणवते. तिच्या वृद्ध शरीराला माझ्या आश्वासक आवाजाचा आधार जाणवत असावा. आनंदाच्या घटनेत ऊर भरून येतो तेव्हा ती बोलू शकत नाही, मीही सैरभैर होतो. दुःखाच्या प्रसंगात केवळ आवाजही धीर देऊन जातो. हे सगळंच अनुभवायला हवं! सगळ्यांनीच अनुभवायला हवं!
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply