कधी कश्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल माहित नसते. तशी फारसी श्रीमंती नव्हती. पण खाऊन पिऊन तिचे कुटुंब सुखी होते. प्रेमळ नवरा, गोंडस मुलगा, समाधान घरात नांदत होत. आणि तो ‘काळा दिवस’ उगवला. क्षुल्लक आजाराचे कारण होऊन नवरा तिला आणि मुलाला अनाथ करून गेला. आभाळ कोसळ तिच्या डोक्यावर.
या पाच वर्षाच्या कोकराला कसे सांभाळू? दोन वेळेस जेवायला दिले म्हणजे, ‘सांभाळ’ होत नसतो. शिक्षणाची सोय करावी लागते. चांगले संस्कार करावे लागतात. जमेल का हे ‘शिवधनुष्य’ पेलणं? एक कुटुंब म्हणून एकत्र बांधून रहाणं सुद्धा हल्ली कठीण झालाय. पण आता हे करणे तिला क्रमप्राप्त होते.
ती आपल्यापरीने त्याच्यावर संस्कार करत राहिली. नीती कथा, थोरामोठ्यांचा आदर, चांगलं-वाईट यातला फरक. सगळंच त्याच्या कोवळ्या मनावर बिंबवत राहिली. पोर चुकलं तर ‘बाप’ होऊन शिक्षा करत असताना, ‘आई’ रडत असायची.
दिवस जात होते. तिचा बाळ आता आठ वर्षाचा झाला होता. त्याच्या शाळेने ‘मातृदिना’ निमित्याने, शाळेत एक कार्यक्रम आयोजित केला होता. सगळ्यां विद्यार्थ्यांच्या ‘मातांना’ विशेष आमंत्रण होते. ती हि शाळेत हजार होती.
शाळेने अनेक छोट्या छोट्या मातीच्या कुंड्यात सुंदर फुल असलेली झाड, एका ओट्यावर ठेवली होती. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या लाडक्या आईसाठी, त्याला आवडेल त्या झाडाची कुंडी आईला मातृदिनाच्या भेट द्यायची. असे त्या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
प्रत्येक विद्यार्थी आपल्या आई साठी सुंदर फुल असलेले रोप भेट देत होते. आपलं पिल्लू माझ्या साठी कोणतं रोप ‘भेट’ म्हणून उचलणार? सुंदर लाल गुलाब, नाजूक लिलीची फुल, का जांभळ्या फुलाचं रोप? तिची उच्छुकता शिगेला पोहंचली. मुलाकडून मिळणारी पहिली भेट किती सुंदर कल्पना?
शेवटी तिच्या बाळाचा नंबर आला. तो त्या रोपांच्या ओट्या जवळ बराच वेळ निरीक्षण करत उभा राहिला. त्याची निवड होण्यास उशीर होत होता. तश्या सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. याला इतका वेळ का लागतोय? शेवटी त्याने एक कुंडी उचली. आणि आपल्या आईच्या हातात दिली.
त्याच्या निवडीचे आश्चर्य करत, त्या बाळाची वर्गशिक्षिका जागेवरून उठून त्याच्या आई जवळ पोहंचल्या. त्याच्या आईच्या हातात, एक मलूल पडलेले रोप होते. त्या रोपाला, सुकण्याच्या बेतात असलेली, काही पाने होती. ते झाड खूप अशक्त आणि रोगट होते.
“अरे, हे काय करतोस? आज आईचा सन्मान म्हणून, तिला ‘भेट’ चांगलं फुलाचं रोप द्यायचं सोडून, हे मरगळलेले झाड का देतोयस? जा बदलून घेऊन ये!” त्याची वर्ग शिक्षिका त्याला म्हणाली. त्याचा आईचाही अशी ‘भेट’ पाहून चेहरा उतरला होता.
“नाही मॅडम, बाकी सगळी रोप चांगली आहेत. फक्त या याच रोपाला ‘आईची’ गरज आहे असे वाटले, अन माझी आई सगळ्यात ‘बेस्ट’ आहे. म्हणून मी हे तिला दिले!”
तिच्या डोळ्यात पाणी तरळले. सगळ्या मुलांनी रोप, आईला ‘भेट’ दिली होती. या मुलाने त्या आजारी रोपाला, ‘आई’ भेट दिली होती. तिचे संस्कार वाया गेले नव्हते. आज तिला मातृदिनाच्या अनमोल भेट मिळाली होती.
मित्रांना हि झाली गोष्ट. त्या सुकलेल्या रोपांसारखी, खूप जणांना ‘आईची’ गरज आहे. निसर्गाच्या नावाने खडे फोडण्या पेक्षा, जर शक्य असेल तर, तुमच्या ‘मातृत्वाचा’ तुम्हीच सन्मान करून घेतला तर, खऱ्या अर्थाने ‘मातृदिन’ साजरा होईल.
Happy Mother’s Day!
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहात आहे. पुन्हा भेटूच. Bye.
(मूळ कल्पना नेट वरून.)
Leave a Reply