तुमचं आमचं नातं कधी
एका जन्माचं गुलाम नव्हतं
ऋणं आपली फेडता फेडता
बंध पावले गाढ दृढता ॥ १ ॥
मनाचा कुठला कोपरा काही
जिथे तुमचा ठसा नाही
तुमच्या लावल्या वळणांनी
सरळ झाले मार्ग जीवनी ॥ २ ॥
दुर्धर दुर्गमशा वाटेवरती
काजळलेल्या निराशराती
संस्कारांचा दीप सोबतीला
आशीर्वादाचा कवडसा ओला ॥ ३ ॥
तुम्ही आम्हा दिलं नाही
असं काही उरलं नाही
ज्याने ओतावी कृतार्थ भरपाई
माप शोधून मिळत नाही ॥ ४ ॥
आयुष्यवाट मळता मळता
विराम खचित येणार खरा
मोकळा श्वास घेऊन मांडू
पुन्हा एकदा डाव सारा ॥ ५ ॥
गळ्यात आपले घालून गळे
मनाला करु कणकण मोकळे
छोट्यामोठ्या आठवणींचे
आनंद मोहोळ कल्लोळमळे ॥ ६ ॥
पांग आम्ही फेडावे कसे
ऋणांतून होऊनया उतराई
लिमप्रा जन्म पुढील बदलून पाहू
होऊनिया तुमची आई ॥ ७ ॥
(आईच्या ७२व्या वाढदिवसासाठी लिहिलेली.)
– यतीन सामंत
Leave a Reply