आशाबाईंचा वाढदिवस!! त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी इथे देत असलेल्या, मी स्वत: काढलेल्या आशा भोंसलेंच्या फोटोची माझ्या आठवणीत राहणारी एक अतिशय गंमतीदार अशी रोचक कथा आहे. फेसबुकवर बरीच नवीन फेबु-मित्रमंडळी सतत येत (आणि जातही) असतात म्हणून त्यांच्यासाठी या निमित्ताने माझी ही आठवण मी पुन्हां एकदां (किंवा पुन्हां एकदांही असेल कदाचित) देत आहे.
ठाण्याला ब-याच ब-याच वर्षांपूर्वी कांही निमित्ताने ठाणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या एका समारंभात ‘गडकरी रंगायतनला’ आशा भोसलेंचा सत्कार होता. मंचावरच्या शासकीय वगैरे मान्यवरांची उबगवाणी वैतागवाडी कोरडी भाषणे (या ठिकानी, याठिकानी. निश्चितपने..निश्चितपने, नागरिकांसाठी पायाभूत सुखसुविधा..) एकदांची संपली आणि आशाबाई बोलायला उभ्या राहिल्या आणि क्षणार्धात तोपर्यंत अंधारात कोपरे आणि भिंती धरून उभे असलेल्या पत्रकारितेतल्या (आणि हौशी) छायाचित्रकारांची (त्यावेळी मोबाईल कोणाच्या स्वप्नातही आले नव्हते) झुंड धांवून आली आणि त्यांची एक पाठमोरी भिंतच्या भिंत रंगमंचावर उभी राहिली. एकमेकांना ढकलून (कारण त्यांच्यात एक अदृश्य अशी व्यावसायिक स्पर्धा ही असतेच) फोटो काढण्यासाठी स्पर्धा सुरूं झाली. कचाकचा फ्लॅश उडूं लागले, त्यांचे फोटो सेशन संपतां संपेना आणि त्यांचे आशाबाईंचे भाषण सुरूं होईना.
शेवटी प्रेक्षक वैतागले, त्यांनी फोटोग्राफर्सना शिव्या घातल्या आणि आतां ते त्यांच्यावर चपला फेकून मारतात कीं काय अशी परिस्थिती निर्माण झाली. (त्यावेळी चपला फेकून मारणे कोणाला परवडत नसावे) शेवटी आशा भोसले यांनीही (अर्थात मोठ्या ‘व्यावसायिक हुषारी’ने फोटो वगैरे काढून झाल्याची खात्री झाल्यावर मगच त्यांनी फोटोग्राफर्सना (सात्विक संतापाने) झापले. (“अरे.. अरे… काय लावलाय काय तुम्ही, प्रेक्षक आतां मारतील तुम्हांला”… वगैरे वगैरे). या सगळ्या गदारोळात मला फोटो काढायला मिळालाच नाही, पण मला अंदाज आला कीं फार फार तर त्या खोट्या खोट्या चिडतील पण फोटो काढून देणारच आणि तसंही प्रेक्षक करून करून काय करणार, मला चपला मारणार थोडेच ? ही संधी पुन्हां मिळाली नसती.
त्या खरं म्हणजे मनांतून खूष झाल्या होत्या. मी नेमकं हे त्यांच्या चेहे-यावरून हेरलं आणि सगळे फोटोग्राफर्स निघून गेल्यानंतर मी जराही वेळ न घालवतां सगळे धैर्य एकवटून आगदी जाहीर अपमानाची तयारी ठेवूनच अगदी एकटाच शांतपणे पुढे झालो, त्यांना साळसूद निरागसपणे दयनीय चेहेरा करून (मला चेहेरा मुद्दाम दयनीय करायला लागला नाही ही गोष्ट आणखीनच वेगळी) ‘फक्त एक.. एकच फोटो’ अशी खूण केली आणि फोटो काढून पटकन फोटो काढून मी तिथून शांतपणे निघून गेलो, प्रेक्षकही माझ्या या निगरगट्ट आणि निर्लज्ज धैर्याला हंसलेच, कांही टाळ्याही पडल्या आणि आशा भोंसलेही ‘आतां काय म्हणावं या माणसाला ?’ अशा अर्थाने खळखळून हंसल्या .. तोंच हा दुर्मिळ क्षण !
यांतली गंमत अशी कीं त्या अशा खळखळून हंसल्या हे मला दोन दिवसांनी निगेटिव्हचा रोल ‘धुवून’ (?) हातात प्रत्यक्ष फोटो प्रिंट मिळाली तेव्हां कळलं, तोपर्यंत जीवात जीव नव्हता, कां ते त्या काळात निगेटिव्ह-रोल फोटोग्राफी करीत असलेल्यानांच समजेल.
— सुभाष जोशी, ठाणे
Leave a Reply