उन्हाळा कडक जाणवू लागला आहे पारा दिवसागणिक वाढू लागला आहे. कडकडीत उन्हामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण तहानेने व्याकुळलेले असताना तहान भागवण्यासाठी बहुतेकांची पावले सहजपणे शीतपेयांच्या दुकानांकडे वळू लागत आहेत. याशिवाय नारळपाणी, कलिंगड इत्यादी तहान भागवण्यासाठी पारंपरिक उपायही योजले जात आहेत. या उष्म्यामध्ये तहान भागवण्यासाठी तसेच शरीराला थंडावा देण्यासाठी ताडगोळे खरेदी करण्यालाही अधिक पसंती आहे. कोकणातून येणारे ताडगोळे बाजारात जागोजागी दिसू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा तडाखा शरीरातील उर्जा कमी करतो. अशावेळेस आहारातून, फळांमधून, भाज्यांमधून शरीरात पाण्याचा आणि उर्जेचे समतोल राखण्यासाठी प्रयत्नपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे. शहाळ्याचं गोड पाणी आणि पातळ मलई जशी आपल्याला रिफ्रेश करते. तसेच भारतीय किनारपट्टीवर ‘ताडगोळा’ हे फळ या दिवसात मुबलक प्रमाणात आढळते. लिचीप्रमाणे आवरण असणारे पारदर्शक आणि पाणीदार लहानसे फळ म्हणजे ताडगोळा. पाल्म किंवा ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा हे होय. याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे. याला फ़ॅन पाम असेही म्हणतात. हे फळ महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी प्रामुख्याने लागवड होते. बंगालमध्ये ‘ताल’, तेलगूमध्ये ‘ताती मुंजलू’, तामिळमध्ये ‘नुन्गू’, इंग्रजीमध्ये ‘आइस अॅ्पल’ तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावाने ओळखलं जातं. आशिया, न्यु गिनी आणि आफ़्रिकेतही हा आढळतो. याच्या पानाचे अनेक उपयोग होतात. पंखे, चटया, ताट्या वगैरे करण्यासाठी उपयोग होतो. पुर्वापार याची लागवड केली जातेय, कंबोडियाच्या जगप्रसिद्ध अंगकोर मंदिरसमुहाच्या परिसरात या झाडांची लागवड केली आहे. भुर्जपत्र करण्यासाठी याच्या पानांचा उपयोग होतो. ही पाने हळद आणि मिठाच्या पाण्यात उकळुन वाळवतात. मग त्याना दगडाने पॉलिश केले जाते. अनेक जुने ग्रंथ या पानांवर लिहिलेले आढळतात. तामिळनाडु मधे अनेक जणांचे भविष्य असे लिहुन ठेवलेले आहे. लोक तिथे हौसेने ते वाचायला जातात. आणि ती व्यक्ति तिथे कधी येणार आहे तेही, त्या पत्रांवर लिहुन ठेवलेले आहे. याच्या पानाच्या दांड्यांचा कुंपणासाठी उपयोग होतो. या पासुनच जाडसर काथा निघतो आणि त्याचा ब्रश वगैरे करता येतो, झाडाचे लाकुडही मजबुत असते आणि घरबांधणीत त्याचा उपयोग होतो. या झाडापासुन ताडी मिळते, ती आंबवुन मादक पेय करतात. याही झाडापासुन नीरेसारखे पेय मिळते. ते आटवुन गुळही करता येतो, तो गुळ उसापासुन केलेल्या गुळापेक्षा चवदार लागतो. आपल्यापेक्षा तामिळनाडुमधे या झाडाचा खाण्यासाठी जास्त उपयोग होतो. या झाडाचे कोंब, कोवळी रोपे खातात. तसेच झाडाच्या टोकाशी एक मऊ गर तयार होतो, तोही खातात. या झाडाची पानं सदाबहार हिरवीगार आणि आकाराने मोठी असतात. ताडगोळे हे अतिशय मऊ, रसदार असून त्यावर जाड साल असते. ही साल काढणं म्हणजे कंटाळवाणं काम असतं. सालीचा रंग पिवळसर केशरी असून आतील गराचा रंग करडा किंवा पांढरा असतो. चवीला गोड असून प्रकृतीने थंड असणारं हे फळ आहे. पाणीदार फळ असून ते कापायची गरज भासत नाही. या फळाची प्रवृत्ती थंड असून हे फळ उन्हाळ्यात खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. यात खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि ए, बी, सी या जीवनसत्त्वांचा भरपूर साठा आहे. त्यामुळे एकंदरीतच शरीराला अतिशय उपयुक्त ठरतं. ताडगोळा हे चवीला गोडसर असते.
ताडगोळ्याचे आरोग्यदायी फायदे
ताडगोळा थंड स्वरूपाचा असल्याने शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेचा या दिवसात त्रास होण्यापासून बचाव होण्यास मदत होते.
ताडगोळ्यामध्ये सोडीयम,पोटॅशियम यासारख्या मायक्रोन्युट्रीअंट्सचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारा डीहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास कमी होतो. परिणामी थकवा जाणवत नाही. यात भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबरचा साठा असतो. हे फळ तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं, त्याचबरोबर शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. उन्हाळ्याच्या दिवसांत या फळाचे आवर्जून सेवन करावे. उष्णतेमुळे होणारी पोटातली जळजळ कमी होण्यास मदत होते. उन्हामुळे लहान मुलांना किंवा मोठय़ा माणसांनाही त्वचेवर पुरळ किंवा अॅयलर्जी होते. ताडगोळ्यांचा गर पुरळ आलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम पडतो. उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ आवर्जून खावं, कारण या दिवसांत काही जणांना उन्हाळे लागतात, ही जळजळ कमी होते. हे फळ या दिवसांत फ्रीजमध्ये साठवून ठेवावं. बाहेर ठेवल्यास हे लवकर खराब होतं. त्यामुळे त्याची साल न काढता फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास दीर्घकाळ टिकतं. सुट्टीच्या दिवसांत मुलं अधिक वेळ घराबाहेर असतात, अशा वेळी त्यांना हे फळ खाऊन मगच बाहेर पडायला सांगावं. ताडगोळ्याचा फेसपॅकही अतिशय उत्तम होतो. यासाठी चंदनाची साल उगाळून घ्यावी. त्यात थोडं नारळपाणी आणि ताजा ताडगोळा कुस्करून घालावा. याची चांगली पेस्ट तयार करून ती चेह-याला लावावी. फ्रेश वाटतं आणि उन्हामुळे रापलेली त्वचा उजळते. किडणीच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून शरीराला नको असलेली द्रव्यं याच्या सेवनाने बाहेर फेकली जातात. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. कांजण्या आलेल्या रुग्णांनी हे फळ खावं म्हणजे कांजण्यांमुळे अंगाला येणारी खाज कमी होते. शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. याचं सेवन केल्यावर अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
ताडगोळ्याचे घरगुती उपयोग
उष्णतेमुळे लघवी जळजळ होत असेल तर कोवळा ताडगोळा खडीसाखर घालून खावा.
डोळ्यांची आग होत असल्यास ताडगोळा त्याच्याच पाण्यात वाटून तो लेप पापण्यांवर लावावा.
गळू पिकत नसल्यास जून ताडगोळा वाटून त्यात हळद घालून गरम करावा व त्या गळूवर बांधावा.
ज्या व्यक्तींना शरीरात वात वाढल्याने संडासला घट्ट होत असेल अथवा साफ होत नसेल तर जेवणापुर्वी व जेवणानंतर काही वेळाने १ ताडगोळा खावा. अंगामध्ये उष्णता वाढणे,हातापायांची आग होणे,पोटात आग होणे ह्यात ताडगोळा खाण्याने फायदा होतो. ताडगोळा अतिमात्रेत खाल्ल्याने सर्दी,खोकला,जुलाब होतात.
सीताफळ – ताडगोळा मूस कस्टर्ड
साहित्य. :५०० ग्रॅम सीताफळ आइस्क्रीम, २०० ग्रॅ. ताडगोळे (बारीक तुकडे केलेले), ४० ग्रॅम जिलेटिन पावडर, ५०० मिली दूध, १०० ग्रॅम साखर, २ अंडी, २ चमचे व्हॅनिला इसेन्स.
कृती. : एका भांडय़ात साखर, अंडी, व्हॅनिला टाकून मिक्स करावे. जिलेटिन पावडर अर्धा कप पाणी घेऊन त्यात भिजत ठेवावी. सीताफळ आइस्क्रीम मेल्ट करून घ्यावे. एका भांडय़ात दूध घेऊन गॅसवर उकळत ठेवावे. एक उकळी आल्यानंतर लगेच काढून साखर व अंडी त्या मिश्रणात घालून मिक्स करावे. त्यातच लगेच भिजवलेली जिलेटिन पावडर टाकावी. सर्व नीट मिक्स करून गाळून घ्यावे. त्यात आइस्क्रीम व ताडगोळ्याचे तुकडे टाकून काचेच्या भांडय़ात ओतून फ्रीजमध्ये ४ ते ५ तास ठेवावे. व्यवस्थित सेट झाल्यावर थंड सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नमस्कार,
आपला लेख वाचला. पूर्ण माहिती मिळाली पण हे फळं पुण्यात कुठे उपलब्ध होऊ शकेल याची थोडी माहिती मिळू शकते का?
धन्यवाद.