नवीन लेखन...

आजचा राम

आज दसरा. विजयादशमी. आपल्या साडेतिन मुहुर्तापैकी एक महत्वाचा मुहुर्त. श्रीरामाने रावणाचा वध केलेला दिवस. रामाने-रावणाचा केलेला वध म्हणजे चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय. या दिवशी अनेक ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या धामधुमीत साजरा होतो. पण होतं काय, की आपण सर्वच या एका दिवसापुरते राम बनून छाती काढून चालत असतो; बाकीच्या दिवशी मात्र आपण साक्षात रावणही लाजेल अशी कृत्य उजळमाथ्याने करत असतो. उजळमाथ्याने याचा अर्थ अगदी उघडपणे, निर्लज्जपणे. कारण आपल्याला रामाचा चेहेरा धारण करायला आवडतं परंतू काम मात्र रावणाचं करायला आवडतं. आता सर्वच रावणाच्या भूमिकेत असल्याने, कोण कोणाला बोलणार? मुखाने रामराज्याचा जप करायचा आणि अंतर्यामी मनिषा मात्र लंकाधिपती व्हायची बाळगायची ही आपली दुटप्पी भूमिका असते. राम कोणालाच बनायची इच्छा नाही. राम बनायचं तर वनवास भोगावा लागत, स्वतःच्या संसाराची धूळधाण करून घ्यावी लागते, वारंवार अग्निदीव्य करावी लागतात, मुलांची ताटातूट होते.कोण पत्करणार हे? त्यापेक्षा रावण बरा, कोणतेही नियम, नितीमत्ता पाळायची आवश्यकता नाही..!

पुढे जाणापूर्वी एक गोष्ट स्पष्ट कराविशी वाटते. राम आणि रावण ही अनुक्रमे चांगली आणि वाईटाची प्रतिकं आहे. रामायणातला राम आदर्श असला तरी रामायणातला रावणंही काही नितीनियम पाळणारा होता असं मला वाटतं. रामायणाचा तो कालच आदर्श होता. त्या काळातले चांगले-वाईट असे सर्वच लोक एक किमान नितिनत्ता पाळत असत. किंबहूना एक किमान नितिमत्ता पाळणं म्हणजेच रामराज्य अशी माझी कल्पना आहे. आतासारखा सरसकट बेशरमपणा तेंव्हा नव्हता. रावण याचा अर्थ वाईट वृत्ती येवढाच या ठिकाणी घ्यावा.

रावणवधाच्या आजच्या दिवशी आपला समाज आज नेमका कुठे उभा आहे, याचं उत्तर शोधन मला आवश्यक वाटत. मुखाने ‘श्रीरामा’चा जयघोष करत आणि रामराज्याच्या कल्पनेत रमलेलो आपण, रामायणात रावणाच्या वाटेला आलेली कृत्य बिनधास्त करत असतो. कालानुरुप त्या कृत्यांमधे बदल झाला असला, तरी वृत्ती तिच रावणी आहे. बाकीच्या गोष्टी सोड, पण अख्खं रामायण ज्या सितेमुळे घडलं, त्या आजच्या काळातील सितेची परिस्थिती काय आहे, याचाही विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे.

रावणाने काय त्या एकाच सीतेवर वाईट नजर ठेवली. खरं तर रावणाची नजर वाईट होती असं म्हणता येणार नाही. सीतेला त्याने अत्यंत सन्मानाने अशोक वनांत बंदीस्त केले होते. रावणाने तीच्यावर केंव्हाही अत्याचार, अन्याय, जोर-जबरदस्ती केल्याच माझ्या वाचनात नाही. शक्य असूनही तीला त्याने केव्हांही स्पर्श देखील केला नाही. तिची मान्यता असेल तरच रावण तिच्याशी विवाह करून तिला राणीचा सन्मान देणार होता. रावण शक्तीशाली असूनही त्याने विविध मार्गांनी तिचा अनुनय केला. याचा अर्थ एकाच, रावण सर्वशक्तीमान राजा होता, तरी त्याने संयम आणि एक किमान नितीमत्ता पाळली होती असा निष्कर्ष यावरून काढू शकतो. या पार्श्वभूमीवर, नुकत्याच ‘रामा’चं नांव लावणाऱ्या एका स्वयंघोषित रावणाने, त्याच्या सेवेत असलेल्या दोन साध्विंवर पाशवी बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीला आले. असे कितीतरी राम आज आपल्या समाजात उजळमाथ्याने वावरताहेत. आणि बाकीचा समाज, ज्यात आपणही येतो, तो तरी कासा वागतोय. नोकरी करणाऱ्या, सार्वजनिक वाहनाने प्रवास करणाऱ्या अनेक सितांशी जरा बोलून तर बघा. रोज अशा किती रावणांचा किळसवाणा स्पर्श त्यांना सहन करावा लागतो ते. कितीतरी नजरांचे बलात्कार आधुनिक सीताना रोजच्या रोज सहन करावे लागतात. वर तिने तक्रार करायची नाही कारण ती सीता आहे. केलीच, तर अग्निदिव्यही तीनच करायचं. रोज कितीतरी निष्पाप कळ्या अशा रावणवृत्तींकडून चुरगळल्या जातायत. बलात्काराची बातमी नाही, असा दिवस नाही जात सध्या. खरं म्हणजे अशा विकृतांची रामायणातल्या रावणाशी तुलना करणं, म्हणजे रावणाचा उपमर्द आहे हे मला कळतंय. रावणाऐवजी रावणवृत्ती म्हणू आपण. आज खुलेआम अनेक सीता स्वत:ला राम म्हणवणाऱ्या रावणवृत्तीला बळी पडतायत. आपल्या सीतेपुरता राम असलेला पुरुष तिच्या पलिकडे मात्र रावणवृत्तीने वागत असतो, हे सत्य आपण नाकारता कामा नये. प्रत्येकाला आपली पत्नी सीता असावी असं वाटतं, परंतू स्वत: राम बनण्याची मात्र कोणाचीच तयारी नसते.

रामाने पितृवचनालागी वनवास पत्करला. गादीचा, सत्तेचा मोह जराही बाळगला नाही. आणि आजचा रावण दहन करणारा राम कसा वागतोय..? सत्तेसाठी, सत्ता स्वत:च्याच ताब्यात राहावी म्हणून काय वाटेल ते करायची त्याची तयारी आहे. सत्तेलाठी बाहेरच्या शत्रुशी हात मिळवणी करायलाही तो मागेपुढे पाहात नाही. एवढंच कशाला, तर सत्तेसाठी प्रत्यक्ष सीतेलाही डावावर लावायची त्याची तयारी आहे. आजच्या सीतेच्या नशिबी हे रामायणात नसलेलं हे अग्निदीव्यही आलं आणि तिला ते वारंवार करावं लागतंय. तरीही तिनं सीता बनावं अशीच त्या राम नसलेल्याची अपेक्षा आहे.

राम आचरणात शुद्ध होता. रामराज्य यावं असं म्हणतात, त्यामागे राज्यातल्या सर्वांचं आचरण रामासारखं असावं अशीच अपेक्षा असते. आपले विचार आणि आचार खरंच रामासारखे आहेत का? तर नाही. भ्रष्ट आचार हाच तर खरा जगण्याचा पाया झालाय आज. मिळेल त्या किंवा जमेल त्या मार्गाने पैसा कमावून पुढच्या कितीतरी पिढ्यांच्या पोटापाण्याची आणि ऐशारामाची सोय आजच ककून ठेवण्यात आपण सारेच मग्न आहोत. आपल्या भविष्यातल्या पिढ्या निकम्म्या निपजणार याचा केवढा हा विश्वास..! तोंडाने मात्र श्रीरामाचा नाममंत्र सातत्याने सुरु आहे. आपलं राज्य भरताच्या हवाली करून वनवासात जाणारा राम आणि तेच राज्य गादीवर रामाच्या पादूका ठेवून चालवणारा भरत, यांचा नेमका कोणता आदर्श आजच्या दिवशी रावण दहन करणारे राम पाळतायत..?

— नितीन साळुंखे

प्रसिद्धी- 
दै. एकमत, मराठवाडा.
दि.३०, विजयादशमी

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..