रस्त्यावर वाहनांची, लोकांची वर्दळ.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले.
तेथे हुज्जत घालणारे , गर्दी करणारे असंख्य.
कोलाहल. हॉर्नचा कर्कश्य आवाज.
मी कसाबसा तोल सावरीत बाईकवर.
मी वळलो आणि थांबलो.
हेल्मेट हाती घेतलं आणि गाडी उभी केली.
शेजारी , वाहतूक सुरळीत करणारे दोन हवालदार.
चेहरे थकलेले. दमणूक झालेली स्वच्छ दिसत होती.
तरीही नेटाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती.
शिटी वाजवून कुणाला तरी मास्क घालण्यासाठी नम्रपणे आर्जव.
कुणाला रस्त्यावरून नीट चालण्याविषयी आग्रह.
चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणाऱ्यांना दमदाटी.
आणि हो , मोकाट फिरणाऱ्या जनावरांनासुद्धा रस्त्याच्या एका बाजूला वळवून वाहतूक सुरळीत करणं…
बिनबोभाट सगळं सुरू होतं.
जबाबदारी पार पाडत असताना स्वतःच्या शरीराचे , मनाचे काय हाल होत असतील ते कुणाला सांगता येत नव्हते.
पण चेहऱ्यावरून ते जाणवत होते.
मी वळलो आणि त्यांच्याकडे गेलो.
त्यातला पुरुष हवालदार माझ्याकडे आला.
” काय मदत हवीय का ?”
त्याने विचारले.
मी खिशात हात घातला आणि दसऱ्याचं सोनं म्हणून आपट्याची पानं दोघांना दिली.
ते माझ्याकडे बघत राहिले.
मी त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
त्यातली दोन पाने घेऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि नमस्कार केला.
” आज सणाला पहिल्यांदाच कुणीतरी आमची आठवण काढली ”
डोळे टिपत ती हवालदार म्हणाली.
पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं.
मी नमस्कार करून गाडीकडे वळलो.
गाडी सुरू करताना सहज म्हणून पाठी पाहिलं.
दोघेही हसत होते आणि हात हलवून निरोप देत होते.
आजची संध्याकाळ माझ्यासाठी खास झाली होती.
दसरा माझ्यासाठी अविस्मरणीय झाला होता…!
— डॉ. श्रीकृष्ण जोशी
रत्नागिरी
९४२३८७५८०६
Leave a Reply