नवीन लेखन...

आजच्या जाहिराती आणि त्यांची अभिरुची

आजकाल जाहिरात केल्याशिवाय कोणत्याही उत्पादनाची विक्री होत नाही. या जाहिरातींचे प्रकारही वेगवेगळे. उडदामाजी काळे गोरे या उक्तीप्रमाणे जाहिरातीही वेगवेगळ्या.

अभिरुचीसंपन्न; घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून पहाण्यासारख्या; सामाजिक संदेश देणार्‍या; उत्पादनाची खरीखुरी माहिती देणार्‍या.

किंवा

अत्यंत हीन अभिरुचीच्या; मूर्खपणाचा कळस करणार्‍या; ग्राहकांची दिशाभूल करणार्‍या; विशिष्ट वर्गाला अपमानित करणार्‍या; वाटेल ते दावे करणार्‍या; अवैज्ञानिक दावे करणार्‍या.

आपली उत्पादने खपवण्यासाठी जाहिरातीं करणे हा उत्पादकाचा हक्क आहे असं मानलं तरीही वाटेल ते दावे करणार्‍या किंवा अभिरुचीहीन असलेल्या जाहिराती करून ग्राहकाची दिशाभूल करण्याचा, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गाला अपमानित करण्याचा किंवा स्त्रीदेहाचे हीन प्रदर्शन करण्याचा या जाहिरातदारांना अधिकार त्यांना नाही. अशा मूर्ख जाहिरातींना आळा घालण्यासाठी शहाण्या ग्राहकांनीच पुढाकार घेतला पाहिजे.

जाहिराती कशा असाव्यात आणि नसाव्यात याविषयी काही नियमावली अस्तित्वात आहे. अभिरुची ही देश-काल-समाज-परिस्थिती याप्रमाणे वेगवेगळी असते. योग्य-अयोग्य याबाबतचे निकषही वेळोवेळी बदलत असतात. छापील माध्यमातील अथवा रेडिओवरील जाहिरातींपेक्षा टिव्हीवरची जाहिरात मोठ्या प्रमाणात पाहिली जाते आणि जास्त परिणामकारकही असते. टिव्हीवरच्या जाहिरातींचा सततचा मारा प्रेक्षकांवर होत असतो. अक्षरश: दर दहा-पंधरा मिनिटांनी तीच-तीच जाहिरात आपल्याला बघायला लागते.

आपण जी जाहिरात दाखवताय ती अत्यंत अशोभनीय, आक्षेपार्ह, अभिरुचीहिन, अवैज्ञानिक वगैरे आहे हे जाहिरातदारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ज्या उत्पादनाची जाहिरात दाखवली जाते त्याचा आणि जाहिरातीचा काही संबंध असणे हेही महत्त्वाचे आहे. काही जाहिराती तर इतक्या मूर्खपणाच्या असतात की प्रेक्षकांनाही वेड लागायची पाळी येते.

एखाद्या कार्यक्रमात जाहिराती किती वेळ दाखवाव्यात यावर बंधने घालणारे नियम आले असले तरी त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी या विरोधातही आवाज उठवणे आवश्यक आहे. टिव्ही चॅनलवरील कार्यक्रम पहाण्यासाठी ग्राहक पैसे देत असतातच. वर पुन्हा ज्या जाहिराती आपण पाहतो, त्याचे पैसेही आपल्याच खिशातून अलगदपणे काढले जातात, कारण उत्पादनांच्या किमतीत त्यांचा अंतर्भाव केलेला असतोच. म्हणजे ग्राहक दोन्ही बाजूने लुटला जातो आणि जाहिरातदाराची आणि टिव्ही चॅनेल्सची चंगळ होते.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या जाहिराती केव्हा दाखवाव्यात याचे कोणतेही सोयरसुतक जाहिरातदाराला आणि टिव्ही चॅनेल्सवाल्यांनाही नसते. रात्री ८ ते १० च्या मध्ये बरेचजण जेवायला बसतात आणि समोर टिव्ही सुरु असतो. नेमके याचवेळी टॉयलेट क्लिनरची जाहिरात करण्यासाठी हे जाहिरातवाले आपल्याला थेट संडासातच घेउन जातात. हा तर अगदी कहरच असतो.

जाहिरातींमध्ये जे दाखवले जाते ते ‘खरे’ असते, असा गैरसमज करुन घेणारी प्रचंड लोकसंख्या, हे जाहिराती करणार्‍या उत्पादकांचे टार्गेट असते. प्रत्यक्षात मात्र तसे नसते, याची बरींच उदाहरणे दाखवता येतील. कपड्यांची फॅशन असो की खाण्या-पिण्याच्या सवयी, त्यावर जाहिराती परिणाम करतातच.

आक्षेपार्ह जाहिरातींबद्दल तक्रार करण्याचीही सोय सरकारने करुन दिली आहे. मात्र याची पुरेशी माहिती ग्राहकवर्गाकडे पोहोचतच नाही आणि त्यामुळेच या मूर्खपणाचा कळस करणार्‍या जाहिरातदारांचे फावते.

आक्षेपार्ह जाहिरातींबद्दल ASCI (अडव्हर्टायझिंग स्टँडर्डस् काऊन्सिल ऑफ इंडिया) कडे लिखित स्वपरुपात किंवा ई-मेल द्वारे तक्रार करता येते. त्यांच्या वेबसाईटवरही (www.ascionline.org/) ही सोय आहे. तक्रांरीमध्ये ही जाहिरात कोणत्या उत्पादनाची आहे व ती कधी (तारीख- वेळ), कुठे (चॅनल नाव/ वर्तमानपत्र इ.) पाहिली हे द्यावे. तसेच ती आक्षेपार्ह का वाटते, ते थोडक्यात सांगावे.

अवैज्ञानिक दावे (क्लेम्स) करणार्‍या खाद्यान्नांच्या जाहिरातींवर तर कडक निर्बंध आहेत. हे दावे ग्राहकांनी नीट वाचावेत व त्या संदर्भात कंपनीकडे स्पष्टीकरणही मागावे. त्याचप्रमाणे FSSAI कडे (www.fssai.gov.in) या वेबसाईटवर तक्रारही करता येते. अन्न व औषधांच्या भुलवणार्‍या तसेच मोठमोठे दावे करणार्‍या जाहिरातींविरुद्ध महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) सुद्धा तक्रार करता येते.

— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..