१) वृद्धापकाळातील सामान्य नियम –
रोगानुसार आहार, पथ्यपाणी, व्यायाम किंवा दिनचर्या या सर्व गोष्टींमध्ये बदल करावे लागतीलच, परंतू काही गोष्टी उतारवयात सर्वांनीच कराव्यात. त्यात प्रामुख्याने लक्षात ठेवून करण्याच्या गोष्टी कोणत्या ते समजून घेऊया.
१. साजूक तूप आहारात नियमितपणे घ्यावे. आयुर्वेदानुसार तूप म्हणजे वृद्धमित्र. वजन वाढेल किंवा कॉलेस्टेरॉल वाढेल या भीतीने बरेच लोक तूप / तेल कटाक्षाने टाळतात. वास्तविक शरीराचा वातकाळ सुरू झाल्यामुळे स्निग्ध पदार्थांची गरज या वयात जास्त असते हे विसरू नये. म्हणून तूप आणि तेलाचा वापर आहारात आवर्जून करावा. साध्या तिळाच्या तेलाने नियमितपणे अभ्यंग करावे.
२. गहू – तांदूळ किंवा अन्य कोणतेही धन्य किंचित भाजून मगच आहारात वापर करावा. धन्य भाजल्याने पचायला हलके होते आणि त्यातील पोषक घटक सहजतेने पचन यंत्रणेत शोषले जातात. याने शरीराला बोजडपणा येत नाही, उत्साह वाढतो, शक्ती जाणवते.
३. रात्री झोप लागत नाही अशी तक्रार उतारवयात बऱ्याच लोकांची असते. म्हणून दुपारी झोपण्याची सवय लागते. वास्तविक दुपारची झोप आरोग्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत वाईट असते. त्यासाठी एक सोपा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे तो म्हणजे बसल्याबसल्या आरामखुर्चीत डुलकी घेणे. याने रात्री तर झोप लागतेच आणि दुपारच्या झोपेचे दुष्परिणामही सहज टाळता येतात.
४. अभ्यंग अर्थात संपूर्ण शरीराला साध्या तिळाच्या तेलाने मालीश करणे. वतावरणातल्या तपमानानुसार तेल थंड किंवा कोमट असावे.
५. कुंकुम घृताचे २ – २ थेंब सकाळी आणि रात्री कोमट करून नाकात टाकावेत. मेंदूची आणि ज्ञानेंद्रियांची क्षमता उत्तम ठेवण्यासाठी या नस्याचा प्रयोग पन्नाशी नंतर सर्वांनीच करावा. याला औषध न समजता एक चांगली सवय म्हणून नियमितपणे करणे जरुरीचे आहे.
६. उतारवयात शक्ती कमी होते म्हणून व्यायामाचा उत्साह किंवा इच्छा कमी होते. अशावेळी मानसिक निर्धार करून झेपेल तेवढा व्यायाम करावा, आळस करू नये. शक्ती नाही म्हणून व्यायाम नाही आणि व्यायाम नाही म्हणून स्नायूंमध्ये शक्ती नाही हे विषचक्र आहे. शेवटी अंथरूणात निष्क्रीय पडून राहण्याची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर व्यायाम हा एकमेव मार्ग आहे. ‘थांबला तो संपला’ म्हणून व्यायामाला पर्याय नाही हे पक्के ध्यानात ठेवावे. वृद्धाश्रमात जास्तीत जास्त काम फिजिओथेरपिस्टना करावे लागते. फिजिओथेरपिस्ट म्हणजे दुसऱ्याच्या मेहनतीचे पैसे घेणारे डॉक्टर. यातील विनोदाचा भाग सोडा पण आपण कीती व्यायाम करतो यापेक्षा किती नियमितपणे करतो हे अधिक माहत्वाचे आहे. व्यायाम नेहमी अर्धशक्ती करावा असे आयुर्वेदात वर्णन आहे. अती प्रमाणात व्यायाम करणाऱ्यांचे एकंदरीत आरोग्य चांगले रहात नाही. व्यायाम केल्यामुळे शरीरातल्या मांस धातूला पोषण मिळते आणि त्यापाई इतर धातू कुपोषित राहतात. म्हणजे घरात एकाच मुलाला भरपूर खाऊपिऊ घातले तर तो धष्टपुष्ट होतो मात्र बाकीची भावंडे मात्र कुपोषित राहतात.
७. सामान्यतः आरोग्यासाठी पालेभाज्या खण्यावर भर दिला जातो. विशेषतः उतारवयात कोठा साफ होत नाही अशावेळी पालेभाज्या जास्त खाण्याचा सल्ला तर हमखास दिला जातो. पलेभाज्यांनी पोट साफ होते खरे पण त्याचबरोबर आतड्यांमधला वंगणासारखा स्निग्धपणा किंवा ओलावा हळूहळू निघून जातो. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे टिपकागदाप्रमाणे कार्य होऊन स्निग्धांश शोषला जातो आणि आतड्यांचा स्तर अधिकच कोरडा होत जातो. परिणामी कायम काहीतरी रेचक औषध घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही अशी परिस्थिति निर्माण होते. मग बरेच डॉक्टर “भरपूर पालेभाज्या खा” असा सल्ला का देतात? याबद्दल थोडी माहिती सांगतो. २०१८ साली केलेल्या एका जागतिक सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की जगातील ९०% लोक मांसाहारी आहेत. फक्त २२% लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत. त्यामुळे आहारात रफेज म्हणजेच तंतुमय पदार्थ भरपूर असलेले अन्न अर्थात पालेभाज्या खाण्याचा सल्ला खूप लोकांना देण्याची गरज भासते. भारतात मात्र परिस्थिति वेगळी आहे. इथे शाकाहारी लोक भरपूर आहेत. मांसाहारी लोक पण ठराविक वारीच मांसाहार करतात, त्यातून संकष्टी, रामनवमी, गुरुपौर्णिमा, दत्तजयंती असे कितीतरी दिवस असतात की ज्या दिवशी लोक मांसाहार करत नाहीत. त्यामुळे पालेभाज्या खण्यावर जेवढा भर इतर देशांमध्ये देण्याची गरज आहे तेवढी गरज भारतात नाही हे लक्षात ठेवावे. आधुनिक वैद्यकशास्त्रातले सर्व नियम तिथले हवामन किंवा जीवनशैलीनुसार असतात. ते नियम आपल्या देशात जसेच्यातसे लागू होत नाहीत.
८. पिण्यासाठी फ्रीजमधले थंड पाणी पिणे पूर्णतः बंद करावे. स्वास्थ्याच्या दृष्टीने किंचित गरम पाणी पिणे योग्य आहे. विशेषतः उतारवयात हे पथ्य नक्कीच करावे. अशा वयात शरीरात कुठे ना कुठे दुखणे अर्थात वेदना सतत चालू असतात. शेकण्यामुळे दुखणे थांबते याउलट थंडपणामुळे दुखणे वाढते हे लक्षात ठेवावे. थंड प्रदेशात आपल्या हातापायाला जरासा धक्का लागला तर कीती वेदना होतात हे आपण जाणतोच. चीन, जपान, मलेशिया, इंडोनेशिया अशा कितीतरी देशांमध्ये दैनंदिन जीवनात कोमट पाणीच पिण्याची प्रथा आहे. अनेक रोगांपासून चार हात लांब राहण्यासाठी केवळ गरम पाणी प्यावे असा सल्ला चायनीज ट्रॅडीशनल मेडिसीन मध्ये दिला आहे. नोकरीला जाणारे लोक जेवणाच्या डब्याबरोबर गरम पाण्याचा थर्मास बरोबर नेतात. दुसरा एक प्रकार आहे सौरजल. काचेच्या बाटलीत पाणी भरून आठ तास उन्हात ठेवावे आणि पिण्यासाठी वापरावे. याने पाण्यातील सूक्ष्म जंतू नाहीसे होतात आणि त्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे विशिष्ट गुण पाण्यात उतरतात असा काही शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे.
९. उतारवयात पचनाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात. त्यादृष्टीने मैद्याचे पदार्थ (पाव, ब्रेड, बिस्किटे, केक, खारी इ.) खाणे वर्ज्य केलेले बरे. मैद्यामध्ये ग्लूटिन नावाचे एक घातक प्रथिन असते. याने आतड्यांच्या आतल्या स्तरावर एक प्रकारचा थर किंवा चिकट मुलामा जमा होतो, त्यामुळे अन्नमार्गात पाचकस्राव येण्यास अडथळा निर्माण होतो आणि शरीरसाठी आवश्यक असलेली व्हिटॅमिन्स (जीवनसत्व) रसरक्तात शोषली जात नाहीत. परिणामी काहीतरी मल्टीव्हिटॅमिन्स घेण्याची गरज निर्माण होते आणि मग त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आपल्या दैनंदिन आहारतून सर्वप्रकारची मल्टीव्हिटॅमिन्स शरीराला मिळू शकतात त्यासाठी अन्न योग्यप्रकारे चावून मगच गिळावे. अनावश्यक मल्टीव्हिटॅमिन्स घेण्यामुळे बद्धकोष्ठता, जुलाब, पोट बिघडणे किंवा मळमळ अशी लक्षणे उद्भवू शकतात.
१०. मोठे शहर असो वा लहान गांव, अस्वच्छतेमुळे डास सर्वत्र आढळतात. डासांपासून संरक्षण करण्यासाठी अनेक प्रकारची उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे किंवा विशिष्ट वायूमुळे डास मारून जातात किंवा खोलीच्या बाहेर जातात. कालांतराने अशा धुराचा/ वायूचा परिणाम आपल्या फुप्फुसांवर होतो. त्यातून पुढे खोकला, दमा, घसा दुखणे असे आजार होऊ शकतात. डासांचा प्रतिरोध करणाऱ्या त्वचेला लावण्याच्या काही क्रीम पण मिळतात. त्यांचाही परिणाम त्वचेवर होण्याची शक्यता असते. म्हणून मच्छरदाणीचा वापर हा सर्वात सुरक्षित आहे. डास चावल्यामुळे होणारे उपद्रव आणि त्यावर करायला लागणारे उपचार उतारवयात फार त्रासदायक होतात. म्हणून मच्छरदाणी जरूर लावावी, आळस करू नये.
-डॉ. संतोष जळूकर
वैयक्तिक सल्ल्याकरिता फोन +91 7208777773
Leave a Reply